पणजीतला आठरा जून रस्ता हा सदा वर्दळ असलेला भाग. याच रस्त्यावर तुम्हाला सर्व प्रकारची खरेदी करता येईल अशी दुकानं दिसतील. शिवाय वेगवेगळ्या प्रकारची रेस्टोरंट देखील याच रस्त्यावर आहेत. पणजीतला हा बऱ्यापैकी महत्वाचा रस्ता आहे. इथेच ''शेर ए पंजाब'' नावाचं पंचावन्न वर्ष जुन रेस्टोरंट आहे. हे रेस्टोरंन्ट माझ्या विस्मृतीत गेलं होतं.
अमृतसर वरून नुकतीच काही मित्र मंडळी गोव्यात फिरायला आली होती. साहजिकच त्यांनी उत्तम ''फिशकरी राईस'' कुठे मिळते याबद्दल विचारलं होतं आणि गोव्यात चांगलं पंजाबी रेस्टोरंट कुठलं हे देखील विचारलं आणि ''शेर ए पंजाब'' आठवलं. अगदी अस्सल पंजाबी पदार्थ खायचे असतील तर ''शेर ए पंजाब''ला जायला हवं. आठवडा भरासाठी फिरायला येणारी पंजाबी मंडळी रोज फिशकरी राईस आणि समुद्रीय पदार्थ खाऊन कंटाळणार.
ज्याला त्याला आपलं ''कम्फर्ट फूड'' हवं असतं. तसं पंजाबी मंडळी आपले पदार्थ शोधणारच. ''शेर ए पंजाब''ला पर्याय नाही हेच मी त्यांना सांगितलं. जेव्हा मी मासळी खात नव्हते, पूर्णपणे शाकाहारी होते तेव्हा या ''शेर ए पंजाब''मध्ये वरचेवर जाणं व्हायचं. पण मासळी खायला सुरुवात केली आणि ''शेर ए पंजाब''ला जाणं थांबलं.
ब''ला जाणं थांबलं.
''शेर ए पंजाब'' नावाचं रहस्य
जगात तुम्ही कुठेही जा. त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय रेस्टोरंटमध्ये एकतरी ''शेर ए पंजाब'' नावाचं रेस्टोरंट असतंच. शीख समाजातील सर्व मंडळी आपल्या रेस्टोरंटचं नाव ''शेर ए पंजाब'' असं का ठेवत असतील? याबाबत मला कुतूहल होतं आणि मी जेव्हा अमृतसरला गेले होते तेव्हा हा प्रश्न तिथल्या एका रेस्टोरंट मालकाला विचारला होता.
शीख समाज ज्यांना आदर्श मानतात, ज्यांचं अनुकरण करतात त्या महाराजा रणजित सिंग यांना ''शेर ए पंजाब'' म्हणून ओळखलं जातं. ''शेर ए पंजाब'' ही महाराजा रणजित सिंग यांना मिळालेली पदवी आहे. महाराजा रणजित सिंग यांची आठवण म्हणून ही मंडळी आपल्या रेस्टोरंटला ''शेर ए पंजाब'' असं नाव देतात. जसं महाराष्ट्रात नाथ संप्रदायातील मंडळी त्यांनी सुरु केलेल्या रसवंतीगृहाला (उसाचा रस देणारी दुकानं) ''नवनाथ रसवंतीगृह'' हे नाव देतात तशीच हि ''शेर ए पंजाब''ची गोष्ट आहे.
अस्सल पंजाबी पदार्थ
कुलदीप सिंग यांनी १९६९ ला पणजीत ''शेर ए पंजाब'' सुरु केलं. आता त्यांचा मुलगा मनदीप सिंग ''शेर ए पंजाब''चा सर्व व्यवहार बघतो. ''शेर ए पंजाब'' हे पणजीतलं सर्वात पाहिलं पंजाबी रेस्टोरंट. अस्सल पंजाबी पदार्थ खायचे असतील तर इथंच जावं. पंजाबी पदार्थां इतकेच इथले इंडो चायनीज आणि गोवन पदार्थ देखील चांगले आहेत. पण इथं जाऊन पंजाबी पदार्थ खाण्यातच मजा आहे. खास तंदुरमध्ये बनवलेले पदार्थ हि यांची खासियत आहे. चुलीवर केलेला स्वयंपाक आपल्याला आवडतो तसा पंजाबी माणूस तंदुरमधल्या पदार्थांना पसंत करतो. तंदुरी चिकनचे इतके वेगवेगळे प्रकार इथं आहेत की खाणाऱ्याला प्रश्न पडतो नेमकी कोणता प्रकार खावा.
अस्सल पंजाबी मसाले आणि पदार्थांमध्ये वापरताना त्यांचं योग्य ते प्रमाण यामुळे इथले अनेक पंजाबी पदार्थ अतिशय चविष्ट बनतात. चिकन टिक्का, बटर चिकन, मुर्ग मसाला फ्राय, मुर्ग दो प्याजा, मुर्ग पेशवारी, मुर्ग कलमी मसाला (बोनलेस), मुर्ग बगदादी, मुर्ग कस्तुरी, मुर्ग मस्सलम असे असंख्य प्रकार आहेत आणि यातील प्रत्येकाचा मसाला वेगळा, बनवण्याची पद्धत वेगळी. याच्या सोबत तंदुरी रोटी, कुलचा, परांठा, नान असं काहीही खाऊ शकता.
यामध्येही असंख्य प्रकार आहेत. तंदुरी रोटी घ्यायची ठरवली तर साधी रोटी आहे, बटर रोटी आहे, मग लसूणी रोटी, मेथी रोटी, मक्के दि रोटी, गूळ घालून केलेली रोटी असे कितीतरी प्रकार आहेत. सरसोंचा हंगाम असेल तर सरसों का साग आणि मक्के दि रोटी इथं अवश्य खावी. कारण खास पंजाब वरून सरसोंची भाजी मागवतात. गोव्यात देखील सरसोंची (सांसवा) पानं मिळतात. पण पंजाबमध्ये पिकणाऱ्या सरसोंच्या भाजीला जी चव आहे तशी चव इथल्या भाजीला येत नाही. त्यामुळे जर संधी मिळाली तर सरसोंची भाजी खाऊन बघा.
इथले जीरा आलू, पराठे आणि छोले कुलचे माझे आवडते. आलू परांठा, पुदिना, मेथी, मिक्स भाज्यांचा परांठा छान असतो. तंदुरी परांठा असल्यामुळे जास्त तेलकट नसतो. तंदुर मधून काढून वरून बटर लावतात त्यामुळे आपल्याला हवे तितके बटर लावता येतं.
मांसाहारी खवय्यांसाठी इथं खिमा परांठा देखील आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कोफ्ता, तऱ्हेतऱ्हेचे कबाब, दाल माखनी, मेथी मलई मटर, पंजाबी पद्धतीचा बैंगन का भरता (भरीत) हे पदार्थ यांचे खासच असतात. शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींना आपापल्या पद्धतीचे सर्व पदार्थ इथं मिळतात. बटर चिकन, चिकन टिक्का आणि चिकन बिर्याणीला सर्वात जास्त मागणी असते. गोव्यात येऊन गोमंतकीय पद्धतीने बनवलेली मासळी खाण्यात मजा आहेच पण ''शेर ए पंजाब'' मध्ये अमृतसरी आणि पेशावरी मसाले वापरून बनवलेली मासळी जीभेवर एकदम वेगळीच चव आणते.
इथं जेवताना गुलाबी रंगाचे, व्हिनेगरमधले छोटेसे कांदे देतात. असले चवीला आंबट लागणारे कांदे मी सर्वात पाहिल्यात इथंच खाल्ले. पंजाबी चटपटीत मसालेदार जेवून झाल्यावर इथं खास असे गोड पदार्थ मिळतात.
गरम गरम गुलाबजामून, जिलबी, रसमलाई मिळते. पण इथली कुल्फी प्रसिद्ध आहे. अनेकजण रात्रीच जेवण झालं कि मुद्दाम इथं कुल्फी खायला येतात. मनदीप सिंग यांनी ''शेर ए पंजाब'' चा छान विस्तार केला आहे. आठरा जून रस्त्यावरून जाताना ''शेर ए पंजाब'' कडे लक्ष गेलं नाही असं कधी होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.