कळंगुट: गेली साडेचार वर्षे कळंगुट मतदारसंघ मंत्री मायकल लोबो यांच्यामुळे बराच चर्चेत आहे. लोबो हे तिसऱ्यांदा निवडून हॅट्ट्रीक साधण्याची किमया करणार काय, याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधूनच लोबो यांना शह देण्यासाठी वेगळी रणनीती आखण्यात येत असल्याच्या चर्चेने मतदारसंघात जोर धरला आहे.
गोवा स्वातंत्र्यानंतर कळंगुट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये सर्वप्रथम जी. एम. डिझोझा, वेलेंटीनो सिक्वेरा, जगदीश भुजंग राव, राहुल फर्नांडिस, डॉ. विल्फ्रेड डिसोझा, श्रीकांत मळीक, सुरेश परुळेकर, तोमाझिनो कार्दोज, आग्नेल फर्नांडिस, तसेच मायकल लोबो यांचा समावेश आहे. यापैकी विल्फ्रेड डिसोझा, सुरेश परुळेकर, आग्नेल फर्नांडिस तसेच विद्यमान आमदार मायकल लोबो यांना या मतदारसंघात दोनवेळा निवडून येण्याची संधी लाभली. मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी अद्याप तरी एकाही आमदाराच्या नशिबी आली नाही. त्यामुळेच यंदाची विधानसभा निवडणुक विद्यमान आमदार तथा मंत्री असलेल्या मायकल लोबोंसाठी कसोटीची ठरणार यांत शंका नाही. कळंगुट मतदारसंघातील आतापर्यंतच्या आमदार, मंत्र्यांची वाटचाल आणि कारकीर्द पाहता राष्ट्रीय पक्षांनी येथे बाजी मारली आहे. म.गो, युगो आणि त्यानंतर युजीडीपी यांनी मिळवलेला विजय हा अपवादही येथे आहे.
‘फॅमिली राज’चा ठपका
मंत्री लोबो हे पत्नी डिलायल यांना शिवोलीतून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याने ‘फॅमिली राज’चा ठपका मारला जात आहे.
आराडी झोपडपट्टी ठरतेय शाप!
कळंगुट मतदारसंघात व्यवसायाच्या निमित्ताने घुसलेल्या परप्रांतीय लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. स्थानिकांसाठी ती एक मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. कांदोळीतील आराडी- वाडी ही त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे. स्थानिक पंचसदस्य तसेच तत्कालीन आमदार मंत्र्यांच्या कृपाशीर्वादाने उभ्या राहिलेल्या येथील लमाणी वस्तीत छोटे-मोठे गुन्हेगार आश्रय घेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. कळंगुटला भेट देणाऱ्या देशी - विदेशी पर्यटकांसाठी या भागात वास्तव्य करून राहणारे समाजद्रोही ‘सावजां’च्या रुपाने हेरत आहेत. सुरवातीला पत्र्याची शेड उभारून आश्रय घेतलेल्या अनेकांची या भागात सध्या दुमजली, तीन मजली घरे आहेत. गुन्हेगार क्षेत्राशी संबंधित परप्रांतीय याच झोपडपट्टीचा आश्रय घेत असल्याचे खुद्द कळंगुट पोलिसांचेही म्हणणे आहे. राजकारण्यांसाठी ही झोपडपट्टी एकगठ्ठा मते मिळविण्याचे साधन आहे.
सरपंचांबरोबर ‘पंगा’ नडणार?
कळंगुटचे माजी सरपंच अँथनी मिनेझिस आणि उपसरपंच सुदेश मयेकर यांनी घेतलेला पंगा लक्षात घेत यापुढे तरी मायकल लोबो विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना गाफिल राहतील असे वाटत नाही. त्यातच व्यावसायिक मित्र असलेले ‘टिटोज’चे रिकार्डो डिसोझा यांनी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केल्याने आणि तेसुद्धा भाजप उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याने आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असे ते जवळच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस तसेच माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनाही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. पण आग्नेल हे शेजारील साळगाव मतदारसंघातून लढण्यासाठीही तयारी करीत आहेत.
इच्छुक वाढले
मतदारसंघात इच्छुक उमेदवार वाढत आहेत. सध्या मंत्री मायकल लोबो, सुदेश मयेकर हे भाजपसाठी इच्छुक आहेत. तर रिकार्डो डिसोझा यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले आहेत. अँथनी मिनेझिस, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा हे काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. रोशन माथाईस हे गोंयचो आवाजचे उमेदवार असू शकतात.
मगोही रिंगणात
मगो पक्षही या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. आम आदमी पार्टी, रिव्होल्युशनरी गोवन्स यांचेही कार्य येथे सुरू आहे. विरोधक वाढले तर त्याचा फायदा लोबो यांना होऊ शकतो. तरीसुद्धा लोबो यांची नजर राजकीय वातावरणावर आहे. तसेच भाजप त्यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार, याचा ते अंदाज घेत आहेत. यामुळे पुढील काळात येथील राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडण्याची शक्यता आहे.
‘प्लान बी’ तयार!
पक्षाकडून पंख छाटण्याचा प्रयत्न झाला तर आपला ‘प्लान बी’ लोबो यांनी तयार ठेवला आहे. त्यांनी त्यादृष्टीनेही छुपे कार्य सुरू केले आहे. त्यांच्या या पडद्यामागच्या हालचाली पाहता कोणत्याही स्थितीत पुन्हा निवडून येणे, यासाठी ते तयारी करीत आहेत. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. लोबो यांची महत्त्वाकांक्षा व फॅमिली राज यांना भाजप थारा देईल का? हे आगामी काळच ठरविणार आहे.
वक्तव्यांमुळे भाजप धोरणांना बाधा
कळंगुटचा विकासपुरुष म्हणून आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांना त्यांचे कार्यकर्ते गौरवतात. पण, भाजपच्या ध्येयधोरणाआड येत लोबो जी विधाने करतात त्यामुळे कट्टर भाजप कार्यकर्त्यांत नाराजी आहे. शिवाय मतदारसंघात लोबो यांनी अनेकांना शिंगावर घेतल्याने त्यांचे विरोधकही वाढले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते तर त्यांना वारंवार टार्गेट करीत आहेत. अलीकडच्या काळात ‘आप’ही सक्रिय झाला आहे. मगो पक्षाचे कार्य या मतदारसंघात आता मर्यादित आहे. तर राष्ट्रवादीचे काम यथातथाच आहे. लोबो यांना पक्षांतर्गत विरोधकांचा सामना करताना अन्य राजकीय पक्षांचे आव्हान आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.