Canacona News वृक्षवेलींना भारतीय लोकमानसाने आपल्या जवळच्या सग्यासोयऱ्यांच्या रूपात पाहिलेले असून, वड, पिंपळ, औदुंबर अशा वृक्षांना तर त्यांना देववृक्षाचे स्थान प्रदान केलेले आहे. शेकडो वर्षे आयुष्य असणारे महावृक्ष, मानवी समाजासाठी सनातन काळापासून आकर्षण बिंदू ठरलेले आहेत.
फळे, फुले देणारी आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असलेली झाडे त्यांच्या उपयुक्ततेमुळे जशी भारतीय समाजाला नित्य महत्त्वाची वाटली, तशीच थंडगार सावली देणारी आणि असंख्य पशुपक्ष्यांना आश्रय देणारी महाकाय झाडेसुद्धा वंदनीय ठरली.
काही वेळा आकाशाला गवसणी घालणारी झाडे आणि कित्येक मानवी पिढ्यांचे अवलोकन करत जगणारी झाडे लोकमानसासाठी प्रेरणादायी ठरलेली आहेत. गोव्याच्या एका टोकाला असणारा काणकोण तालुका, पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत वसल्याकारणाने इथल्या जंगलात, माळरानांवरती महाकाय वृक्षांचे दर्शन घडते.
काणकोण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या पूर्वाश्रमीच्या या गावातला एक वाडा गेल्या कित्येक शतकांपासून उभ्या असलेल्या मल्लिकार्जुनाच्या मंदिरामुळे श्रीस्थळ म्हणून नावारूपास आलेला आहे.
गोव्यात काणकोण तालुक्याच्या व्यतिरिक्त मल्लिकार्जुनांची देवालये असली तरी काणकोण आणि गावडोंगरीच्या श्रीस्थळातल्या देवालयांशी संबंधित भाविकांची संख्या लक्षणीय आहे. ती पोर्तुगीज पूर्वकाळापासून प्रसिद्धीस पावलेली आहे.
काणकोण- कारवार महामार्गापासून काही अंतरावर वसलेल्या या मल्लिकार्जुन मंदिराच्या दैवत परिवारात जशी देवदेवतांची लक्षणीय अशी श्रद्धास्थाने अस्तित्वात आहेत, त्याचप्रमाणे देवालयाशी संबंधित असलेले पवित्र वृक्षही या परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी आपल्या स्वरूपामुळे दैवत म्हणून वंदनीय ठरलेले आहेत.
श्रीस्थळहून म्हाळशीवाड्यावर जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक महाकाय वृक्ष उभा असून त्याला इथल्या लोकमानसाने आदर सन्मानाचे स्थान दिलेले आहे. स्थानिक भाषेत ‘जर्माल’ म्हणून परिचित असलेल्या या महावृक्षाचा उत्तर गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत शिडम वृक्ष असा उल्लेख केला जातो.
आसामी भाषेत ‘भेलू’, कन्नडमध्ये ‘काडूबेंडे’, मराठीत ‘जंगलीभेंडी’ अशा नावांनी परिचित असलेला महावृक्ष ‘फॉल्स हेम्प’ म्हणून ओळखला जातो. जमिनीपासून ४० ते ५० मीटर उंची गाठणाऱ्या या वृक्षाला वनस्पतिशास्त्रात ‘टेट्रामस न्यूडीफ्लोरा’ असे नाव देण्यात आलेले आहे.
त्यातला टेट्रोमस हा ग्रीक भाषेतला शब्द त्याच्या छोटेखानी फुलाला बाह्यकोशाचे चार दल असल्याकारणाने, तर शिशिर ऋतूत या वृक्षाची समस्त पाने गळून पडत असल्याने न्यूडीफ्लोरा असे नाव प्रदान केलेले आहे.
श्रीस्थळात हा वृक्ष ज्या म्हाळशी वाड्यावरती उभा आहे, त्यांच्यासाठी तो केवळ देवता स्वरूप नसून त्याच्याशी त्यांचे कित्येक पिढ्यांपासून सांस्कृतिक आणि धार्मिक अनुबंध जुळलेले आहेत. गोवा- कोकणात हा वृक्ष त्यांच्या स्वरूपाबरोबर दीर्घायू असल्याकारणाने अदृश्य रूपात वावरणाऱ्या दैवी शक्तीचा अधिवास मानलेला आहे.
दोडामार्ग तालुक्यात तिळारी नदीच्या डाव्या किनारी वानोशी येथे उभा असलेला शिडम पितामह स्वरूप आहे. या गावात वास्तव्यास असलेल्या हिंदू- ख्रिश्चन समाजातल्या वयोवृद्धांनुसार हा शिडम वृक्ष पाचशे वर्षांपेक्षा जुना असल्याचे मत आहे.
पूर्वी नदीपल्याड असणाऱ्या कुडासेत वानोशीहून जाताना होडी येईपर्यंत लोक शिडम वृक्षाच्या थंडगार सावलीत थांबायचे, त्यावेळी त्यांना एकंदर महाकाय अशा स्वरूपावरून दिव्यत्वाचा साक्षात्कार झाल्याने, त्याच्यासमोर नतमस्तक होण्यात धन्यता मानली.
रत्नागिरीतल्या हरचिरीत साडेतीनशे वर्षांचा इतिहास सांगणारा महावृक्ष तेथील महाकाली देवी मंदिराच्या परिसरात असल्याने देवतास्वरूप मानून संरक्षित ठेवलेला आहे. दोन दशकांपूर्वी या शिडम वृक्षावरती एक दीड मीटर लांबीची २०-२५ मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसायची.
आंबा बागायतीच्या परागीकरणात या मधमाश्यांचे योगदान व्हायचे. कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मधमाश्यांची पोळी इथे दिसणे दुरापास्त झालेले आहे.
कर्नाटकातल्या दांडेली अभयारण्यात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातल्या फणसाड अभयारण्यात महाकाय शिडम लक्षवेधक ठरलेले आहे. गोव्यात दुधसागर धबधब्याच्या परिसरात असलेला शिडम तेथे येणाऱ्या देशीविदेशी पर्यटकांना आपल्या एकंदर रूपाने आकर्षित करण्याबरोबर तेथील असंख्य पशुपक्ष्यांसाठी आश्रयस्थान ठरलेला आहे.
सत्तरीतल्या कोपर्डे गावातल्या देवराईतील शिडम वृक्ष कृमी कीटक, पशुपक्षी यांच्याबरोबर नेचे, आमरी, कवकाच्या नानाविध प्रजातीसाठी नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे. ब्राह्मणी मायेच्या नावाने पिढ्यान्पिढ्या कोपर्डेत असलेल्या या देवराईतला प्रारंभी दृष्टीस पडणारा शिडम वृक्ष आपल्यातल्या दिव्यत्वाची प्रचिती देत आलेला आहे.
श्रीस्थळ येथील म्हाळशी वाड्यावरचा शिडम वृक्ष सुमारे पाचशे वर्षांपासून तेथे उभा आहे. त्याच्या महाकाय स्वरूपासमोर त्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या लोकमानसासाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.
पावसाळ्यात त्याचे वृक्षाच्छादन पर्जन्यवृष्टी आणि वादळवाऱ्याला समर्थपणे सामोरे जाते आणि युगायुगापासून इथून वाहणाऱ्या तळपण नदीच्या महापुरात असंख्य वृक्ष उन्मळून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले असतानाही हा महावृक्ष आजतागायत एकंदर न डगमगता उभा आहे, हे लोकमानसाला विस्मयचकीत करत आलेले आहे.
शरदातल्या कोजागिरी चांदण्यात हा वृक्ष आगळ्या वेगळ्या वैभवाचे दर्शन घडवतो. हेमंतात कधीकधी धुक्याच्या तलम रेशमी दुलईत तो आपणाला नखशिखान्त लपेटून घेतो, तर शिशिर ऋतूत त्याची सगळी पानगळती होत असल्याकारणाने निष्पर्ण अवस्थेत तो एखाद्या संन्याशासारखा तटस्थपणे उभा राहून प्रतिकूल परिस्थितीला सामोरा जातो.
शिशिरातल्या पानगळतीनंतर फाल्गुनात जेव्हा त्याला नवी पालवी फुटते, तेव्हा त्याचा थाट खूपच प्रेक्षणीय असतो.
शिगम्यातले या वृक्षाचे सौंदर्य लोकमानसाला भुरळ घालत आले आहे. त्यामुळे आपल्या लोकगीतांतून इथले कष्टकरी ‘जर्माल फुलले’ म्हणून गाऊ लागतात. त्यांची नरफुले पिवळी तर मादीफुले हिरव्या छटेने युक्त असतात. झुपकेदार गुच्छातली ही फुले जर्माल वृक्षाला नवा साज मिळवून देतात.
त्यामुळे शिगम्याच्या मिरवणुकीत त्याला मानवंदना द्यायला लोककलाकार विसरत नाहीत. श्रीस्थळातला हा महावृक्ष पूर्वीच्या काळी जेव्हा गावात भ्रमणध्वनीचे मनोरे उभे नव्हते आणि कीटकनाशकांची शेती, बागायती पिकांवर फवारणी केली जात नसे, तेव्हा मधमाश्यांनी कष्टाने मधूरसाने समृद्ध केलेल्या मधाच्या असंख्य पोळ्यांनी अक्षरशः लगडून जायचे.
त्यावेळी ही मधाची पोळी काढण्यासाठी मल्लिकार्जुन देवस्थानामार्फत लिलाव करण्यात यायचा. मल्लिकार्जुन देवाच्या कृपेने पोळ्यातील मध निर्विघ्न काढता येईल याची कष्टकऱ्यांना खात्री असायची आणि त्यामुळे हा जर्माल वृक्ष देवस्थानाची मालमत्ता समजला जात असे आणि त्याच्यावरती अदृश्य शक्तीचा वावर पूर्वापार असल्याची लोकश्रद्धा रूढ होती.
त्यामुळे हा महावृक्ष मधुरसाचे कोठारच नव्हे तर देववृक्ष म्हणून आदर सन्मानास पात्र ठरला होता. मलाबारी बाशिंगधारी धनेश, सर्पगरूड त्याचप्रमाणे पूर्वी गिधाडांसाठी हा वृक्ष आकर्षण बिंदू ठरला होता.
शेकरू, श्वार, चिमण्या अशा छोट्या मोठ्या पशुपक्ष्यांसाठी हा महावृक्ष निवारा पुरवत असतो. श्रीस्थळातल्या नागरिकांना हा वृक्ष पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संचित असल्याने त्यांनी त्याला वारसा वृक्षाचा दर्जा देण्याची मागणी केलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.