परम शास्त्र जगी प्रगटावेया। बहुता जना फळ सिद्धी होतावेया।
भाषा बांधोनि मराठिया। कथा निरोपली ॥
जैसी हरळांमाजि रत्नकिळा। कि रत्नांमाजि रत्न निळा।
तैसी भाषांमाजि चोखळा। भाषा मराठि ।।।
जैसी पुष्पामाजि पुष्प मोगरी। कि परमळामाजि कस्तुरी।
तैसी भाषामाजि साजिरी। मराठीया॥
पक्षियामध्ये मयोरू। वृक्षिकासधे कल्पतरू।
भाषांमधे मानु थोरू। मराठियेसि।।
तारा मध्ये बारा राशी। सप्तवारांमाजि रवी राशी।
या दिपिचेआ भाषा मध्ये तैसी। बोली मराठिया।।
वरील मराठी भाषेची थोरवी गाणाऱ्या ओव्या आपल्या गोव्यात सासष्टी तालुक्यातील एका चर्चमध्ये बसून सतराव्या शतकातील सन 1614, महिना एप्रिल, रविवारी संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या स्थानिक ख्रिस्ती गावकारांपुढे म्हटल्या गेल्यात, असे कोणी जर सांगितले, तर त्याला आजच्या काळात कोणीही वेड्यात काढील. कारण, गेल्या चार शतकात गोव्यातील सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काळाच्या ओघात एवढी उलथापालथ झाली आहे की त्यात जमीन अस्मानचा फरक पडलेला आहे. वरील ओव्या फादर स्टीफन यांनी लेटिन भाषेतील बायबलचा मराठीत भाषांतर नाही तर भावार्थकरण करताना लिहिल्या आहेत.
मागील रविवारच्या लेखात फादर स्टीफनच्या जीवनप्रवासाविषयी माहिती करून घेतली. फादर स्टीफन सोळाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात गोव्यातील सासष्टीतील गावांमधील चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून काम करू लागले. जन्माने ब्रिटिश कॅथोलिक परंतु, रोममधील धार्मिक शिक्षणानंतर कॅथोलिक धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण आयुष्य गोव्यातील सासष्टीमध्ये कार्यरत असलेल्या फादर स्टीफनचा कार्यकाळ गोव्यातील धार्मिक आणि राजकीय उलथापालथीचा काळ होता. पोर्तुगीजानी सन 1543 मध्ये अदिलशहाकडून बार्देश आणि सासष्टी तालुके मिळवल्यानंतर त्यांनी आपली धार्मिक जुल्मी सत्ता येथे राबविली. पोर्तुगीज राजाचा रोमन कॅथोलिक धर्म हाच त्यांच्या ताब्यातील जगातील कुठल्याही प्रदेशातील लोकांचा धर्म असला पाहिजे, हा सक्तीचा कायदा होता. या धर्मसक्तीच्या कायद्यामुळे सासष्टी- बार्देश- तिसवाडीतील स्थानिक हिंदूना फक्त दोनच पर्याय उरले; एक- धर्मांतर करणे किंवा परागंदा होणे. जबरदस्तीने धर्मांतरीत झालेल्या लोकांना फिरंगी भाषेतील म्हणजे पोर्तुगीज किंवा लॅटिन भाषेतील प्रवचने चर्चमध्ये नाईलाजाने ऐकावी लागत. या प्रवचनामध्ये नवख्रिस्ती भाविकांना गोडी वाटत नव्हती. ही गोष्ट फादर स्टीफन याना प्रकर्षाने जाणवली तेव्हा त्यांचा आणि स्थानिक गावकारांचा जो संवाद झाला तो ख्रिस्तपुराणामध्ये लिहिला आहे
त्यात सासष्टीतील गावकार म्हणतात की मराठी भाषेतली शास्त्रपुराणे आमच्याजवळ होती. तुम्ही आमची पुराणे जाळली, नष्ट केली. आमच्यापाशी होती तशी पुस्तके तुम्ही का करत नाही? असे प्रश्नार्थी आव्हान फादर स्टीफनने स्वीकारून मराठी भाषेचा प्रचंड अभ्यास केला. मराठी भाषेच्या सौंदर्याने त्याला झपाटून टाकले. सोळाव्या शतकाच्या पूर्वीची मराठी संत ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, एकनाथ, नामदेव इत्यादी संतांच्या प्रासादिक काव्याचा अभ्यास फादर स्टीफन याने केला. या अभ्यासातून त्याने पोर्तुगीज किंवा लॅटिन भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले. स्टीफन याने बायबलचे शब्दश: भाषांतर अजिबात केले नाही तर त्याने मराठी संत काव्यात बायबलचा भावार्थ लिहिला.
फादर स्टीफन यांना येथील स्थानिक लोकांच्या मनात देवाची संकल्पना काय आहे, येथील लोकांच्या मनात नाही तर हृदयात देवाची कोणती प्रतिमा आहे याची व्यवस्थित कल्पना आली होती. त्यामुळे स्टीफन याने हिंदू देवतांचे मंदिर व्यवस्थितपणे आपल्या काव्यातून उभे केले आणि त्यात येशु ख्रिस्त आणि माता मेरीची स्थापना केली. माता मेरीविषयीचे वर्णन करताना फा. स्टीफन म्हणतो,
नमो वैकुंठराणिये स्वामिनी।
सकळा रचिलेचा वस्तु होवोनी।
ख्रिस्ताचे मनुष्यपण वेगळे करूनी।
तू अधिक गे देव माते।।
किंवा,
वैकुंठ नगरी प्रवेशोनि। राणी होवोन बैसली॥
अशा अनेक प्रकारच्या ओव्या आहेत की, जणू काही येशू ख्रिस्त हा भारतीय भूमीत अवतरलाय. मराठी वारकरी किंवा भागवत पंथातील भगवान विष्णुच्या विविध अवतारांपैकी एक ख्रिस्ताचा अवतार असल्याचा अनुभव भाविक वाचकांना ख्रिस्तपुराण वाचताना येतो. फादर स्टीफन याने ख्रिस्तपुराण संवादाच्या भाषेत लिहिले. मूळ बायबल हे स्वर्गातील देवाच्या आज्ञा आणि ख्रिस्ताच्या जीवनातील घटनांचे संकलन आहे. त्याला दैवी आणि पवित्र रूप दिले गेले असले तरी त्यात भारतीय आध्यात्मिक ग्रंथामधील काव्य नसल्यामुळे भारतीयांना- त्यातही गोव्यातील सतराव्या शतकातील लोकांना- त्यात गोडी नसल्यासारखे वाटणे साहजिकच होते. अशावेळी फादर स्टीफन याने मराठी भाषेतील आध्यात्मिक रसाळ वाणीतून ख्रिस्ताची शिकवण लोकांपुढे मांडली आणि लोकांनी ती डोक्यावर उचलून घेतली. सन 1614 साली राशोल सेमिनारीच्या छापखान्यात ख्रिस्तपुराणची पहिली आवृत्ती निघाली. पुढे सन 1622मध्ये दुसरी आणि 1640 मध्ये तिसरी आवृत्ती निघाली. गोवा आणि वसईमधील चर्चमध्ये सतराव्या आणि अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ख्रिस्तपुराणाच्या माध्यमातूनच येथील ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनाचे भरण पोषण होई. असे असूनही फादर स्टीफन आणि ख्रिस्तपुराण गोव्यातील ख्रिस्ती धार्मिक जीवनातून हद्दपार का झाले? हा प्रश्न उरतो.
अठराव्या शतकाच्या मध्यंतरांत पोर्तुगीजांनी गोव्यातील मराठी, कोकणी या देशी भाषांना सर्व स्तरांतून हद्दपार करण्याचा हुकूम काढला. या देशी भाषांमुळे येथील लोकांची भारतीयत्वाची नाळ शाबूत रहात असल्याचे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. त्यांना येथील लोकांना पोषाख, आहार, भाषा या सर्व बाबतीत पोर्तुगीज बनवायचे होते. या धोरणामुळे ख्रिस्त पुराणवर संक्रांत येऊन ख्रिस्त पुराण गोव्यातील ख्रिस्ती धार्मिक जीवनातून हद्दपार झाले. पोर्तुगीजांच्या धर्मसमीक्षेला कंटाळून त्याना गोव्यातून महाराष्ट्र कर्नाटकात परागंदा व्हावे लागले. मात्र त्यांनी या भारतीय अवताराचा ख्रिस्त आपल्या हृदयात जपून ठेवला. आजही गोव्याशेजारील महाराष्ट्र कर्नाटकात परागंदा झालेले मूळ गोव्यातील ख्रिस्ती बांधव ख्रिस्तपुराणाचे मोठ्या भक्तिभावाने पारायण करतात.
ख्रिस्तपुराणाच्या माध्यमातूनच ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनाचे भरण पोषण होई. तरीही फादर स्टीफन आणि ख्रिस्तपुराण गोव्यातील ख्रिस्ती धार्मिक जीवनातून हद्दपार का झाले?
-सचिन मदगे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.