सासष्टी: मडगाव व फातोर्डा हे दोन वेगळे मतदारसंघ असले, तरी सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारीदृष्ट्या हे दोन्ही मतदारसंघ (Constituency) एकमेकांशी निगडीत आहेत. फातोर्ड्याचा विकास व विस्तार झपाट्याने होत आहे, तर मडगाव शहराचा परिसर मर्यादीत असल्याने येथे मोठमोठ्या योजना (Scheme) कार्यान्वित करणे शक्य नाही. त्यामुळे फातोर्ड्यातील योजना याच मडगावच्या असे लोक मानून आहेत. अल्ट्रा मॉडर्न कदंब बस स्टॅण्ड (Kadamba Bus Stand) प्रकल्पाची पायाभरणी दहा वर्षांपूर्वी होऊनही तो अद्याप पूर्ण झाला नाहीच, शिवाय वाहन पार्किंग (Parking) इमारतीचाही अद्याप पत्ता नाही.
गेल्या 15-20 वर्षांत प्रत्यक्ष मडगावात केवळ हाउसिंग सोसायट्या व बेकायदेशीर बांधकामे सोडली, तर एकही लोकाभिमुख प्रकल्प सुरू झाला नाही व त्याची योजनाही आखण्यात आलेली नाही. दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारत, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, कदंब बस स्टॅण्ड, रवींद्र भवन, फातोर्डा क्रीडा संकुल यासारखे प्रकल्प फातोर्ड्यातील आहेत. सोनसोडो कचरा विल्हेवाट प्रकल्प हा कुडतरी भागातील आहे. मात्र, या सर्व प्रकल्पाशी मडगावकरांचा संबंध येतो व ते त्यांना आपलेशे वाटतात. प्रत्यक्ष मडगावचा विचार केला, तर पार्किंग इमारत, नगरपालिका इमारत, नगरपालिका बाग, आनाफोंत गार्डन्स हे प्रकल्प मडगावातील आहेत. या प्रकल्पांवर भक्कम असे काम झालेले नाही. गेल्या पाच वर्षांत स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) इनडोअर स्टेडियम जो नावेलीत असला, तरी मडगाव नगरपालिका क्षेत्रात सामावतो तो पूर्ण झाला आहे.
मडगावकरांना कदंब बस स्टॅण्ड, पार्किंग इमारत, सोनसोडो कचरा विल्हेवाट प्रकल्प हे जास्त भेडसावत आहेत. मडगावमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. त्यासाठी सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2015 साली नगरपालिका इमारतीमागे पूर्वीच्या मासळी बाजारात या प्रकल्पाचा बुनयादी दगड टाकला होता. या प्रकल्पासाठी सध्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना 3 कोटी रुपये मंजूर केले होते. आता या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 6.5 कोटी रुपये एवढा होत आहे. डिसेंबर 2018 साली व नंतर सप्टेंबर 2021 साली या प्रकल्प उभारणीसाठी नगरपालिकेने कंत्राटदाराकडून निविदा मागविल्या होत्या, पण एकही कंत्राटदार पुढे आला नाही. नगरपालिका परत एकदा निविदा काढण्याच्या तयारीत आहेत. पण निवडणुका केवळ एक ते दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने हा प्रकल्प आणखी रखडेल असेच नागरिकांचे मत आहे.
दोनच दिवसामागे दिगंबर कामत यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना अल्ट्रा मॉडर्न कदंब बस स्टॅण्डचा पुनरुच्चार केला. या प्रकल्पाची पायाभरणी दहा वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०११ साली झाली होती. दिल्लीच्या एका सल्लागार कंपनीने त्याचा आराखडा तयार केला होता. 2012-2017, 2017 ते 2021 भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले, पण या सरकारनेही या प्रकल्पाकडे पाठच फिरवली.
केवळ 2018 साली जेव्हा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई सरकारामध्ये होते, तेव्हा माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अनुदानातून पूर्ण करण्याचे ठरविले. त्यासाठी सुडाच्या मालकीची जमीनही कंदब कॉर्पोरेशनच्या नावे करण्यात आली. सध्या कंदब कॉर्पोरेशनकडे 64 हजार चौरस मीटर एवढी जागा असूनही स्व. पर्रीकर नंतर काहीही हालचाल झालेली नाही.
सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्पही चर्चेत
गेल्या कित्येक वर्षांपासून सोनसोडो येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पही चर्चेचा व वादग्रस्त विषय ठरलेला आहे. तेथे दोन 25 टी़डीपी प्लांट सुरू करण्याच्या योजनेलाही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्या मते आता हे काम राज्यात नवीन सरकार सत्तेवर आल्यावरच पूर्ण होऊ शकेल. आमदार दिगंबर कामत यांच्या मते गेल्या दहा वर्षांपासून मडगाव व परिसरातील प्रकल्प व योजना भाजप सरकारच्या आडमुठेपणा व अनास्थेमुळे अडकल्या आहेत.
‘सरकारच्या आडमुठेपणामुळे योजना शीतपेटीत’
भाजपचे नेते शर्मद पै रायतुरकर यांच्या मते दिगंबर कामत मुख्यमंत्री होते, तेव्हा हे प्रकल्प व योजना का पूर्ण होऊ शकल्या नाहीत? नगरपालिकेच्या जुन्या इमारतीचे दुरुस्तीकरण करणे, बागेला नवी झळाळी देणे, आनाफोंत गार्डनला गतवैभव मिळवून देणे, मनोरंजनाची केंद्रे सुरू करणे, वाहतुकीत शिस्त आणणे, मलनिस्सारणचा प्रश्र्न मार्गी लावणे, मुलांसाठी मैदानांची व्यवस्था करणे यासारख्या अनेक योजना आहेत, ज्या मडगाव शहरात शक्य आहेत, पण येथे आमदाराची उदासीनता दिसून येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.