विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

Importance of native trees in India: आज माणसाला खरी गरज आहे ती पृथ्वीवरील पर्यावरणाचे चक्र सांभाळण्याची. म्हणून आपआपल्या परिसरात देशी वृक्ष लागवड करून धरणीमातेचे सृष्टीसौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक मानव प्राण्याचे कर्तव्य आहे.
Native Trees in India
Native Trees in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

संत ज्ञानेश्‍वरांनी म्हटले आहे, ‘जो जाणीसे झाड फुले, तो मानस जाणीजे बोले’. वनस्पतींचे शास्त्र तिच्या पुनरत्पादन अवयवावर म्हणजे फुले, फळे आणि बियांवर आधारलेले आहे. वर्षातील काही दिवस झाडांना वेगवेगळी फुले फळे फुलतात. झाडांचा खोडाचा व्यास, सालीचा रंग, पाने यांची रचना हे पाहून वृक्षपरिचय करून घेण्यास शास्त्रोक्त मदत घ्यावी लागते. चांगले झाड ओळखण्यासाठी वनस्पती अभ्यासकाची जरुरी लागते. वृक्षांचा उपयोग करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन झाडाचा वापर करावा.

कॅरलस लिनोयस या स्वीडिश शास्त्रज्ञाला आधुनिक वनस्पतिशास्त्राचा पितामह मानतात. सपुष्प वनस्पती वर्गीकरण करण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकात इंग्रज शास्त्रज्ञ बेन्थम आणि कुहकर यांनी केली असली, तरी वनस्पती प्रणोत्याचा मान लिनीयसनाच जातो. जागतिकीकरणाच्या जमान्यात आपले देशी आणि परदेशी वृक्ष असा भेदभाव आज चालला आहे, तरीसुद्धा पृथ्वीवरील सगळेच वृक्ष पर्यावरण सांभाळण्याचे काम करतात.

काही वृक्ष हिवाळ्यात पानझडी करतात, तर काही वृक्ष सदाहरित असतात, याचा अनुभव मी राजेंद्र केरकर सरांबरोबर म्हादई अभयारण्यात फिरताना घेतला आहे. भारतीय उपखंडातील मूळच्या वनस्पती इथल्या मातीत आणि हवामानात उत्क्रांत होऊन पर्यावरणाचा समतोल राखला आहे. वनस्पतींना आपल्या सीमा माहीत नसतात.

Native Trees in India
Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

पण मानवाने वाडा, गाव, शहर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश अशा सीमा आपल्या स्वार्थासाठी केल्या आहेत. आज जरी भारताच्या सीमेजवळ श्रीलंका, ब्रह्मदेश, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तान हे देश वेगळे असले तरी प्राचीन काळी भारतास जोडलेले होते. म्हणून त्या देशातील वृक्षांना आपण विदेशी वृक्ष म्हणू शकत नाही.

परकी झाला तो माणूस मात्र शेजारी आणि झाडे विदेशी? हे देश आणि भारत यांचे पर्यावरणात समान, मिळतेजुळते आहे. कवी कुलगुरू कालिदासाने आपल्या लिखाणात गौरवलेल्या हिमालयातील काही वृक्ष दक्षिण भारतात लावले तर त्यांची वाढ होते. नदी तीरावर वाढणारा उंडी वृक्ष हिमाचल अगर काश्मिरात लावला तर त्याला हवामान मानवते, कारण तो उपखंडातील आहे. वृक्ष आपल्या परिसंस्थेतील पर्यावरणीय समतोल कायम राखून ठेवतात.

कीटक, मधमाश्या, सरपटणारे प्राणी, पक्षी यांना त्यांचा आसरा आणि अन्न मिळते. पिकून पडलेली झाडांची पाने विघटन होऊन मूलद्रव्यांची चक्रीकरणाने प्रक्रिया अव्याहतपणे चालूच असते. देशी वृक्षांचे कितीतरी प्रकारात उपयोग होतात. त्यांचा डिंक टॅनिन, लाख, मध, औषधी द्रव्ये माणसाला उपयोगी पडतात. आपण अनेक देशी झाडांवर पक्ष्यांची घरटी पाहतो, पण गुलमोहराच्या झाडावर पक्ष्यांची घरटी पाहावयास मिळत नाहीत.

चुकून एखादा कावळा त्यावर घरटे बांधतो. याचे कारण तो देशी वृक्ष नाही, तो आफ्रिका खंडातील मादगास्कर देशातून ब्रिटिशांनी भारतात आणला. आज आपण त्या वृक्षाचे परकीयपण विसरलो आहोत, पण पक्षी त्याला अजून परकी मानतात. निलगिरी वृक्ष ऑस्ट्रेलियातून आणून त्याची प्रथम लागवड दक्षिण भारतात केली. त्याच्या फुलांना मकरंद भरपूर असला तरी मधमाश्या त्या झाडावर क्वचितच मोहळ विणतात.

त्यांना माहीत असते निलगिरी वृक्ष परकीय आहे, पण आपण त्याचा विचार न करता आज संपूर्ण देशात त्याची लागवड होत असलेली पाहावयास मिळते. घरासमोरील बगीचा अगर सार्वजनिक उद्यानात सुंदरता वाढवण्यासाठी परदेशी झाडेझुडपे लावली जातात, पण त्यांच्यात खरी सुंदरता नाही. आपल्या देशात परकीय झाडे पर्यावरणाचा समतोल बिघडवतात, हे आपण जाणले पाहिजे. विदेशी माणसांप्रमाणे विदेशी झाडेही आक्रमक असतात.

देशी वनस्पती, झाडे त्यांच्यापासून नष्ट होण्याचा धोका जास्त असतो. परदेशातून काही बियाणी आणून आपल्या देशातील शेतीत पेरणी केली, त्या बियाण्यासोबत पार्थेनियम तृणाचे बियाणे आले, पेरणीतून त्या तृणाने आपले बस्तान शेतीत मांडून हाहाकार माजवला. पाण्यात वाढणाऱ्या जलपर्णीने सर्वत्र उच्छाद माजवला. जंगलात वाढणाऱ्या रानमारीने जंगली प्राण्यावर उपासमारीची पाळी आणली त्यात. जंगलातील देशी झाडावर विपरीत परिणाम झाला आहे.

Native Trees in India
Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

तसेच मुंग्या, वाळवी, कीटक, पक्षी फुलपाखरे ही जैवविविधता, देशी झाडांची पाने-फुले, साल, कुजलेले लाकूड खाऊन वाढतात. पण परकीय झाडांच्या अतिक्रमणाने देशी झाडांवर संकट आल्याने आमची झाडे कमी होत आहे व त्यामुळे बाकी प्राण्यांची संख्यावाढही कमी होते आणि पर्यावरणीय साखळी तुटते.

पक्षी, कीटक, मधमाश्या या फुलातील मध खाण्यातून परागीकरणाची प्रक्रिया करीत जंगलातील झाडाझुडपांचे बीज प्रसारण करतात. परकीय झाडांमुळे हानिकारक कीटकांचा जन्म होऊन पर्यावरणात प्रादुर्भाव वाढतो. देशी वृक्षांचे मृत अवशेष अगर त्यांचा पालापाचोळा कुजून गेल्याने जमिनीवरील सूक्ष्मजीव त्यांचे विघटन करून अत्यावश्यक मूलद्रव्याचे चक्रीकरण करण्याचे महत्त्वाचे काम रानावनात करतात. ते मूलद्रव्य शोषून घेण्याचे काम झाडे करतात.

पण परकीय वृक्षांचे अवशेष, पालापाचोळा लवकर विघटन होत नाही. आपल्या देशी झाडांची वाढ संथगतीने होते. अशा झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण असून ती पर्यावरणीय अडचणीवर मात करतात. स्वदेशात भराभर वाढणारी झाडे आहेत. पण त्या वृक्षांकडे आपण दुर्लक्ष करतो. कदंब, भेकरा (पालपणस) पंगारा, चानाडा, बहावा, काटेसावर, शिरीष, सप्तपर्णी, किनय, शेवगा, हादगा, पारिजातक, भिरलामाड, कणकी, बांबू हे स्थानिक वृक्ष भराभर वाढतात.

त्याचप्रमाणे करमळ, पळस, पंगारा, देवसावर पणशी, सुरंग, सिताअशोक हे वृक्ष बगीच्यांचे, जंगलाचे सौंदर्य वाढवतात. उंडी, सालई, नांद्रुक, कलम, एळंब, जंगली बदाम, कुसमा, अर्जुन, जांभूळ, वावळा, बकुळ, कांदळ ही झाडे जंगल, ओहळ, नदीकिनारी सापडतात. जमिनीच्या जीवावरणात वनस्पतीचे उत्पादन असलेले स्थान प्राणवायू निर्मिती म्हणून त्याचे महत्त्व वादातीत आहे. मात्र एखाद्या जागी कोणतेच झाड नाही, अशा ठिकाणी देशी किंवा परकीय झाडे लावणे वसुंधरेसाठी महत्त्वाचे आहे.

आपल्या देशात पूर्वी रस्त्याच्या बाजूने वड, पिंपळ, रुमड, सातीण, कदंब, चिंच, बोर, आंबा, फणस, जांभूळ, आवळा अशा झाडांची लागवड करीत होते. पण नंतर जगातील विकासाच्या क्रांतीने सारेच बदलून टाकले आणि अठराव्या शतकापासून निलगिरी, सुरू, केशिया, गुलमोहर, रेनट्री जातीची परकीय झाडे रस्त्याच्या बाजूला लावली जाऊ लागली. परदेशी झाडे आपण लावावी पण ती अपवादात्मक ठिकाणी परिस्थिती पाहून लावल्यास त्यावर संशोधन करता येईल.

आजच्या शतकात खरी गरज आहे ती पर्यावरण चक्र सांभाळण्याची. म्हणून प्रत्येकाने आमच्या पूर्वजांचा वारसा सांभाळून टिकवत भविष्याच्या हितासाठी देशी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. देशी औषधी वनस्पती व झाडे उद्याने, सरकारी शाळा हायस्कूल, उच्च माध्यमिक विद्यालये, कॉलेज संशोधन केंद्र, कृषी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी लावल्यास प्रयोगाद्वारे संशोधन करण्यास ती उपलब्ध होतील, यात शंकाच नाही.

आज माणसाला खरी गरज आहे ती पृथ्वीवरील पर्यावरणाचे चक्र सांभाळण्याची. म्हणून आपआपल्या परिसरात देशी वृक्ष लागवड करून धरणीमातेचे सृष्टीसौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येक मानव प्राण्याचे कर्तव्य आहे. कारण त्याला सर्व प्राण्यात जास्त समजुतीचे ज्ञान आणि बोलण्यास तोंड, ऐकण्यास कान पाहण्यास डोळे हे तंत्र निसर्गाने बहाल केले आहे. त्याचा फायदा सर्वांना समान मिळणे हेच देवपण आहे.

मधू य. ना. गावकर, पर्यावरणप्रेमी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com