Environment| Dainik Gomantak
ब्लॉग

Environment: तुज सजीव म्हणो की, निर्जीव रे...

पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने बनलेले केवळ एक द्रव रसायन नाही. स्वतःच्या पद्धतीने जगणारे, वागणारे आणि सृष्टीला घडविणारे एक अमोल अमृत आहे.

दैनिक गोमन्तक

Environment :

कमलाकर द. साधले

एक समृद्ध परिसंस्था पाणी स्वतः बनविते. जलस्रोताचा ‘विकास’ या निर्बुद्ध तंत्राने ती उद्ध्वस्त केली जाते. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने बनलेले केवळ एक द्रव रसायन नाही. स्वतःच्या पद्धतीने जगणारे, वागणारे आणि सृष्टीला घडविणारे एक अमोल अमृत आहे. म्हणून त्याला ‘अमृतं आपः’ म्हटले आहे.

गेल्या रविवारी संध्याकाळी बोरी डेव्हलपमेंट ट्रस्टचा कार्यक्रम होता. काही मान्यवरांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल पुरस्कार होते.

पहिलाच पुरस्कार होता क्लॉड अल्वारिस यांना. क्लॉड हृदयविकाराच्या आजारातून अलीकडेच बरे झालेले. त्यांना बाहेर जाण्यास डॉक्टरांनी मनाई केलेली असल्याने त्यांच्यावतीने त्यांच्या पत्नी नॉर्मा आल्या होत्या.

त्यांनी पुरस्कार स्वीकारानंतर मनोगत व्यक्त करताना अमेरिकेतील रॅड इंडियन लोकांची एक गोष्ट सांगितली. वन्य अवस्थेच्या काळात या लोकांचा एक गट नवीन वस्तीसाठी जागा शोधण्याच्या मोहिमेवर निघाला.

निरनिराळ्या जागा पाहत पाहत एक जागा सर्वानुमते योग्य ठरली. तेवढ्यात एक म्हातारा म्हणाला ही जागा लांडग्यांना प्रिय असलेली.

मग प्रश्न आला आम्ही या जागेत वस्ती केलेली त्यांना आवडेल का? त्यांचे मत कसे कळणार? म्हणताना त्यांनी ती जागा सोडून नव्या जागेचा शोध सुरू केला.

नॉर्मा पुढे म्हणाल्या, ‘ज्यांचे मत विचारले जात नाही, ज्यांचा आवाज व्यवस्थेला ऐकू येत नाही त्यांची बाजू आम्ही गोवा फाउंडेशनतर्फे आम्ही व्यवस्थेसमोर मांडतो. मग तो आवाज दुर्बल जनसमुदायांचा असो, वन्य जीवजातींचा असो, वृक्ष- नद्या- डोंगरदऱ्यांचा असो.’

शेवटचा पुरस्कार एका ख्रिश्चन पाद्रींना देण्यात आला. ते तत्त्वज्ञानाचे (फिलॉसॉफी) प्राध्यापक होते. ते त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘आजपर्यंत तत्त्वज्ञान हा विषय मानवाच्या आंतरिक भावभावना, मानवी समुदायांचे संबंध या क्षेत्रापुरता होता.

आता त्याच्या कक्षा वाढवून भूमी, पाणी, वृक्षवल्ली, डोंगर यांना समाविष्ट करण्याची गरज आहे. आम्ही वृक्ष तोडताना किंवा डोंगर कापताना त्यांना विचारतो का?’

यातून माझ्या स्मृती जाग्या झाल्या. 1999 डिसेंबरमध्ये पणजीच्या आर्चबिशपनी आयोजित केलेल्या ‘नव्या सहस्रकासाठी बायबलमधून दिशेचा शोध’ या संमेलनाच्या.

त्या व्यासपीठावर मी असा विचार मांडला होता की नव्या सहस्रकाची मानवासमोरील प्रमुख आव्हाने पर्यावरणाचीच असतील. आजच्या स्वरूपातील हिंदू, ख्रिस्ती व इस्लामी पंथ जे काल्पनिक देवांचे तत्त्वज्ञान सांगतात.

ते या आव्हानांना सामोरे जाण्यास समर्थ नाहीत, त्यासाठी खऱ्या वास्तव देवांना म्हणजे पर्यावरणीय देवतांना भजणारे वैदिक ऋषिमुनी यांच्या तत्त्वज्ञानाकडे जावे लागेल. आमच्या व्यासपीठावर हा मुद्दा एका ख्रिस्ती तत्त्वचिंतकाकडून आल्याने बरे वाटले.

वैदिक तत्त्वविचारातून चालू हिंदू धर्मात काही प्रथा-परंपरा या सृष्टिपूजनाचे विचार औपचारिकरीत्या उचलून धरतात.

घरबांधणीचे किंवा भूविकासाच्या कोणत्याही कार्यारंभाच्या वेळी जमिनीवर पहिली कुदळ मारण्याआधी भूमीचे पूजन केले जाते. अशा अनेक प्रथा सांकेतिक, औपचारिक स्वरूपाच्या आहेत. पण त्याच्यामागील संकेत मात्र विसरला गेला आहे.

गंगेला पवित्र मानणाऱ्या समाजाकडूनच असल्या प्रथांचा बराच कचरा गंगा अपवित्र करीत असतो. त्या प्रथांमागील खरा संकेत जाणून घेऊन प्रथांमध्ये सुयोग्य बदल घडवून आणण्याचे भान समाजाला नाही.

पण विचारांच्या या दिशेने वाहवत न जाता या दोन वक्त्यांच्या बोलण्यात काय तथ्य आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करुया. वृक्ष- नद्या, डोंगरदऱ्या भूमी-पाणी- वारा यांविषयी काढलेले उद्गार हे भावनिक ललित वक्तृत्व, एक कविकल्पना, ‘कणकण मे भगवान’ मानणाऱ्यांचा आध्यात्मिक उद्गार आहेत का ? त्यात व्यावहारिक, वैज्ञानिक तथ्य आहे का?

1999 च्या माझ्या वक्तव्यानंतर मानवजात, सृष्टी, पर्यावरण या विषयांवर माझे जे चिंतन काही वर्षे चालले त्यातून मला स्पष्ट दिसते की त्यात ते सर्वच आहे. त्यांनी काढलेले ते केवळ भावनोद्गारही असतील. पण त्यात एक व्यापक सत्य समाविष्ट झालेले आहे.

एखादा सच्चा भावतरंग जेव्हा आतून उभारून येतो तेव्हा मन-बुद्धीप्रेरित विचारांपलीकडील, आतील अंतःकरणाचा तो आविष्कार असतो. तो अजाणतेपणी केवळ आत्मप्रक्रियेतून घडून आलेला असतो. ही प्रक्रिया सजग अशा जाणिवांतून आपोआप घडत असते...

डोंगर-दऱ्या- हवा-पाणी- प्रकाश-आकाश यांसारख्या पंचमहाभूतांतून बनलेल्या निर्जीव घटकांना सजीवांप्रमाणे कल्पिणे भाबडेपणाच आहे...पण नाहीही.

सजीव आणि निर्जीव यांच्या व्याख्याच संकुचित बनल्या आहेत. आपल्याला सोईच्या म्हणून किंवा आपल्याकडे आहे तेच खरे ज्ञान, त्यापलीकडे काही नाही अशा अहंतेमुळे. विशेषतः विज्ञानाच्या क्षेत्रात अशी अहंता खूप आहे. व्हायरस हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर आहे, असे मी वैज्ञानिक ग्रंथात वाचले होते.पण कोविड 19 हा व्हायरस किती वेगाने पसरला, आपली रूप कसा बदलत राहिला! पूर्ण सजीवांएवढाच.

पाणी हे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक असे अत्यंत साधे द्रव रसायन हे आपले आजचे वैज्ञानिक ज्ञान. आणि तेच खरे सत्य असा आपला वैज्ञानिक अहंकार. पाण्याला संस्कृतमध्ये जीवन हे नाव दिले आहे. ते भावनिक ठरते. सत्य नव्हे. मग ते अडविणे बिघडविणे त्यात घाण सोडून देणे यांत फार आक्षेपार्ह असे काही नाही.

लहानपणातली एक गोष्ट. माझ्या आत्याच्या कुळागरातील. पाटाचे पाणी वाहत होते. चार-पाच वर्षांचा एक मुलगा कुठेतरी शी करून ढुंगण धुण्यासाठी वाहत्या पाटाकडे गेला.

आतेबहिणीचा मुलगा त्याला म्हणाला, ‘अरे असे करू नकोस, माझ्या आजोबांनी सांगितले आहे की वाहते पाणी म्हणजे गंगा.’ हे (भावनिक) तत्त्व समाजाने स्वीकारले असते तर आज पाण्याचे दुर्भिक्ष्यच राहिले नसते.

पाण्याला जीवन हे नाव दिलेले आहे हा भावनिक भाबडेपणा नाही... सृष्टीतील जीवनव्यवस्था चालण्यासाठी अत्यंत अनिवार्य असा घटक आहेच पण स्वतः या अधिवास, स्वतः चा जीवनमार्ग बनविण्याच्या तंत्राने सुसज्ज असे जीवतत्त्वही आहे.

भूमीच्या उंचसखलतेतून वाहत जाणारा केवळ एक द्रव नसून स्वतः च्या तंत्रानुसार आपला प्रवाह बनविणारी, त्यासाठी योग्य तो भूपृष्ठाला आकार देणारी शक्ती आहे. वाहत्या ओढ्याची, नदीची चाल नागमोडी असते. ती सर्पासारखी वळणावळणाने धावते. ही तिची जैविक गरज असते.

सरळ बांधलेल्या कालव्यापेक्षा अशा प्रवाहाचे पाणी जास्त शुद्ध राहते. कारण त्यांत विरघळलेला प्राणवायू जास्त प्रमाणात आढळतो. तो जलजिवांस उपयुक्त असतो. जलसंसाधन खात्यातर्फे ओढ्याचा ‘विकास’ केला जातो तेव्हा वळणावळणाच्या कमीजास्त रुंदी असलेल्या ओढ्याचे बरेचसे सरळीकरण केले जाते. गाळ काढून तळ सपाट केला जातो.

नैसर्गिक प्रवाहाचा तळ सपाट कधीच नसतो. त्यात मध्येमध्ये डोह असतात. उन्हाळ्यात प्रवाहाचे पाणी आटते तेव्हा, या डोहात साठलेले पाणी पशुपक्ष्यांची तहान व जलजिवांच्या अधिवासाची गरज भागविते.

एक दहा-पंधरा मीटर रुंदीच्या पात्राचा, ‘विकासा’च्या आधीचा व नंतरचा, अभ्यास केल्यास काय आढळते? कृत्रिमतेने जखडलेला हा प्रवाह पुनः स्वतःच्या ताकदीने पूर्वरूपाला येण्याचा प्रयत्न करतो.

पावसाळ्यात पुराच्या जोराबरोबर वाहून आलेला गाळ, माती, वाळू एकदा डाव्या बाजूला, नंतर उजव्या बाजूला, पुनः डाव्या बाजूला असा टाकला जातो आणि त्यामधून वाहणारा प्रवाह पुनः नागमोडी बनतो. ओढ्याचा तळही पुनः उंचसखल बनू लागतो. ओढ्याचे पाणी जमिनीत झिरपून नाहीसे होऊ नये म्हणून स्वतःचा तळ वेगवेगळ्या थरांनी बांधून काढतो.

फक्त त्याचे काठ काँक्रीटने बांधल्याने त्याला त्यांत बदल करता येत नाही. प्रास्ताविक प्रवाहाचे नैसर्गिक काठ (रायपेरियन बेल्ट) बऱ्याच पर्यावरणीय भूमिका बजावतील, अशा प्रकारची त्यांची जडणघडण पाण्यानेच बनविलेली असते. त्यातून पाण्याचे संरक्षक व शुद्धीकरण घडविले जाते.

पावसाळ्यात पूर येतो तेव्हा जादा पाणी गाळासह आजूबाजूच्या खाळसर भागात पसरते, स्थिरावते आणि त्या भागाला नैसर्गिक खताचा एक वार्षिक रतीब मिळतो. जैव-विविधतेने समृद्ध अशा पाणथळी येथेच बनतात. भातशेती येथेच चालते.

ही एक समृद्ध परिसंस्था पाणी स्वतः बनविते. जलस्रोताचा ‘विकास’ या निर्बुद्ध तंत्राने ती उद्ध्वस्त केली जाते. पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने बनलेले केवळ एक द्रव रसायन नाही. स्वतःच्या पद्धतीने जगणारे, वागणारे आणि सृष्टीला घडविणारे एक अमोल अमृत आहे. म्हणून त्याला ‘अमृतं आपः’ म्हटले आहे.

म्हणून पाणी, वृक्षवल्ली, डोंगर-दऱ्या, प्राणी- जीवजंतू या सर्वांचा सृष्टिरचनेत आणि मानवासह सर्वांच्या योगक्षेमात सक्रिय सहभाग आहे. त्यांच्याविषयी आस्था, कळवळा हे केवळ भावनिक नाही, वास्तविक आहे, वैज्ञानिक व आर्थिक संदर्भासह. याविषयी पुढील लेखात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT