Goa Culture : गोव्याची संस्कृती ही पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतींचा अजोड संगम

सांस्कृतिक पर्यटनाचे नवे निकष
Goa Culture
Goa Culture Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Culture : गोवा हे सांस्कृतिक संलयनाचे, समन्वयाचे अनोखे उदाहरण आहे. गोव्याच्या याच संस्कृतीचे आणि वैभवशाली वारशाचे दर्शन जगाला घडले पाहिजे.

मागच्या लेखात आपण गोव्याच्या बदलत्या पर्यटनाबद्दल आणि त्याच्या संभाव्य परिणामांबद्दल पाहिले. बहुतांश पर्यटक केवळ समुद्रकिनारे आणि विकृत प्रसिद्धीमुळे ‘तसल्या’ कारणांसाठी जिवाचा गोवा करायला येतात. त्यांच्या मते गोमंतकीय जीवनशैली अधिक मुक्त, अधिक पाश्चिमात्त्य आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे साहजिकच मदिरा, मदालसा आणि अमली पदार्थ हे त्यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात.

समुद्रकिनारे आकर्षणाचे केंद्र बनवण्यात गैर नाही. पर्यटनाला तेवढ्यापुरतेच मर्यादित करणे चुकीचे आहे. पर्यटन उद्योग वाढवायचा असेल, तर त्यासाठी दुर्गम भाग, मंदिरे, चर्च, नद्या, जंगल, डोंगर दऱ्यांतील पायवाटा यांची ओळख पर्यटकांना करून देणे आवश्यक आहे. एखाद्या वारसास्थळामध्ये आणि परंपरांमध्ये विशेष रस असलेल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘संस्कृती’ हे एक महत्त्वाचे साधन म्हणून पुन्हा वापरणे आवश्यक आहे.

आजचे पर्यटक साहस, इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व आणि स्थानिकांशी संवाद साधतात. पर्यटकांच्या रुचीचे आणि अभिरुचीचे पुन्हा मूल्यमापन करणेही आवश्यक आहे. पर्यटन आणि संस्कृती यांच्यातील विविधांगी संबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

‘मी गोव्याची पोस्टकार्डे काढली, ज्यात गोव्याचे सार, मिरवणूक, खानावळ, बॉम्बे गोवा पॅसेंजर जहाज (सध्या वापरात नाही), कार्निव्हल परेड, गावातील बँड, शांत मंदिरे आणि चर्च चित्रित केले. यातील जवळजवळ सर्व गोव्यातून वेगाने गायब होत आहेत.’, ही खंत व्यक्त केली मारियो मिरांडा यांनी, ज्यांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात स्वखर्चाने ‘गोवा विथ लव्ह’ नावाची एक छोटी पुस्तिका प्रकाशित केली होती.

त्यांना प्रकर्षाने जाणवलेला एक मुद्दा म्हणजे ‘गोव्याचा वारसा’. त्यात शब्दचित्रे, दृश्ये आणि गोमंतकीय जीवनातले क्षण आहेत. त्यांच्या बालपणीचा गोवा, संगीत बँड आणि जीवनाचे उत्सव, मेजवानी, जत्रा, विवाहसोहळे, पार्टी, अंत्यविधी आणि जीवनशैली त्यांनी जिवंत केली होती. गोव्याचा ग्रामीण भाग हा त्यांचा आवडता विषय होता!

समुद्रकिनाऱ्यांकडे आकर्षित झालेल्या पर्यटकांना गोव्याच्या ग्रामीण भागांचे दर्शन घडवले पाहिजे आणि या उपक्रमात स्थानिकांना सहभागी करून घेणे अनेक दृष्टीने लाभदायक ठरेल. म्हादई, चोर्ला घाट किंवा नेत्रावळी आणि काणकोण येथील धबधब्यांचा ‘ट्रेक’ आयोजित करणारे खाजगी उपक्रम आहेत.

गेल्या काही वर्षांत, ‘मान्सून ट्रेक’ या उपक्रमाने स्थानिक लोकांमध्येही साहसी पर्यटनाची भावना निर्माण केली आहे. ‘सोल ट्रॅव्हलिंग’ हे अंतराळ पर्यटनाचा प्रसार करणाऱ्यात अग्रस्थानी असणाऱ्यांपैकी एक आहे. गोव्यात पावसाळ्यात पर्यटकांचा ओघ विक्रमी 18% आहे, जेव्हा फक्त पावसाळ्यातच अनुभवता येणारे वॉटर राफ्टिंग हे एक प्रभावी आकर्षण ठरते.

काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात गोवा ‘इन्स्टावॉक’ नावाचा एक कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला होता. ज्यात संपूर्ण भारतातील ब्लॉगर्सना तांबडी सुर्ल आणि हरवळे येथील धबधब्याच्या आसपास, भर पावसात छायाचित्रण करण्याची संधी मिळाली होती.

पावसाळ्यात गोव्यातील नैसर्गिक हिरव्यागार परिसराला कॅमेऱ्यात टिपणे हा त्यांच्यासाठी अत्यंत सुखद अनुभव ठरला. गोव्यात पावसाळी आणि तीर्थक्षेत्र पर्यटनाची भरपूर क्षमता आहे. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रोड शो, प्रदर्शने आयोजित करणे आणि आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजंट्सचे सहकार्य घेणे आवश्यक आहे.

बाहेरील जगाला हा खरा गोवा माहीतच नाही. येथे पर्यटकांची जिज्ञासा वाढवणाऱ्या गुहा, रिवण येथील बौद्ध लेणी, हरवळे येथील लेणी, नेत्रावळीतील दत्त गुहा, दुहाळमधील दुधा पेड किंवा पायका पेड, सांगेमधील कलिम, नूने येथील पांडव गुंफा, खांडेपार, कुंडई, शिगाव आणि चिखली येथील इतर लेणी, अशी खूप ठिकाणे आहेत, जी सर्व गोमंतकीयांनाही ज्ञात नाहीत.

ही लेणी फक्त तिथे राहणाऱ्या स्थानिकांना किंवा प्रजल साखरदांडेंसारख्या उत्साही शालेय किंवा महाविद्यालयीन व्याख्यात्यांना माहीत आहेत. करासवाड्याजवळ थिवी येथे इज्जोरशिम गुहा आहे. याशिवाय गोव्यातील मडगाव, कुंकळ्ळी इत्यादी विविध भागांत असंख्य पांडव गुंफा व लेणी आहेत.

गोव्यात कुशावती नदीच्या खोऱ्यात उसगळीमळ - पणसायमळ येथे ५०० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या दगडांवर कातळशिल्पे आहेत. झेबू, बैल, गौर, हरीण, काळवीट, रानरेडा, ससा, कोल्हा, मोर, हरीण आहे. नुकतेच जन्मलेले बाळ असलेली एक मातृदेवताही आहे. एक मोठा वर्तुळाकार आहे, त्याला स्थानिक लोक चक्रव्यूह म्हणतात, तर या प्रस्तर चित्राना ‘गुराख्यांची चित्रे’ म्हणतात.

Goa Culture
Saptakoteshwar Temple: गोव्याचे राज्य-दैवत सप्तकोटेश्वर

प्राण्यांची ही कातळशिल्पे आणि प्रस्तरचित्रे, अश्मयुगातल्या आदिमानवाचे भावविश्व आणि परिसरातल्या तत्कालीन जैवसंपदेच्या वैभवाचे दर्शन घडवत आहेत. याशिवाय दोन मानवी आकृत्या व सात केंद्रीभूत वर्तुळांच्या गोलाकार आकाराच्या चक्रव्यूहाचे कोरीव काम, मध्यभागी त्रिमुखी सापाचे वर्तुळ असल्यासारखे दिसते. यांचे अस्तित्व जरी दुर्गम भागांत असले तरी, गंमत म्हणजे यांचे रक्षण येथे देखरेख करणारा राज्य पुरातत्व विभागाचा फक्त एकटा रक्षक करतो.

या ठिकाणापासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर काजूर येथे बेसाल्ट प्रस्तरावर कोरलेली चित्रे आहेत. सध्या ‘दुदाफातर’ येथे चतुर्भुज कणाश्म, वज्रतुंड दगड आहे, ज्यावर प्राण्यांचे चित्र कोरलेले आहे. जे अनादी काळापासून अस्तित्वात आहे. उत्तर अश्मयुगीन काळातील मानवाने कातळावर खोदलेली मातृदेवतेची भव्य प्रतिमा असलेला विर्डी येथील कातळशिल्पाचा अमूल्य ठेवा केंद्रीय पुरातत्त्व विभागाने वेर्णा येथे पोलीस स्थानकाच्या मागे पुनर्स्थापित केला आहे, हे स्थानही अनेकांना माहीत नाही.

लिस्बनमध्ये, सालाझार, इतिहासकार, सिमेटेरिओ प्राझेरेसमध्ये दफन करण्यात आलेल्या कलाकारांसारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींच्या थडग्यांजवळ पर्यटकांना नेले जाते. काही वर्षांसाठी टिकलेल्या पोर्तुगीज-ब्रिटिश युतीची साक्षीदार असलेली ब्रिटिश स्मशानभूमी दोनापावल येथे आहे.

गोव्यातील जवळजवळ प्रत्येक चर्चच्या प्रत्येक मार्गावर व्हाइसरॉय आणि कॅप्टन यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींची थडगी आहेत, जी चर्चच्या वेदीजवळ दफन केले जाणे हे स्वर्गाच्या प्रवेशद्वारासारखेच असल्याची भावना जोपासतात.

लंडनमधील वेस्ट मिनिस्टर अ‍ॅबे यांच्या वैयक्तिक निमंत्रणावरून माझे तेथे जाणे झाले. तिथे जेव्हा मान्यवर व्यक्तींच्या कबरींना भेट देण्याचा योग आला, तेव्हा मला एक हेडसेट देण्यात आला आणि त्या माध्यमातून मी ज्या कबरीसमोर उभी होते, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती माझ्या कानांपर्यंत पोहोचत होती. यात मला लॉर्ड बायरन, विलियम शेक्स्पीअर आणि अनेक ब्रिटिश सम्राटांची माहिती ऐकत त्यांच्या कबरीसमोर मानवंदना देता आली. इंग्रजांनी आपला इतिहास असाच जतन केला आहे.

सांतेरी, वारुळे, नाग, भूमी, लिंग, जागेचे राखणदार पुरुष यांनी एक प्रकारचे गूढ वलय असलेल्या देवराई गोव्याचा अमूल्य खजिना आहे. येथील स्थानिकांच्या भाविकतेमुळेच येथील जंगलांचे, वनस्पतींचे रक्षण झाले आहे. केप्यातील बार्शी येथील गडगडो, सिद्ध गुंफेजवळील देवराई आणि बार्शीतील असंख्य ठिकाणे आहेत.

काजूर येथील सीमेपुरुष, काकोड्यातील सांतेरी, देवचारवाड्यावरील जल्मीदेव यांच्या भोवतालचे गूढ वलय पर्यटकांना निश्चितच आकर्षित करेल. गोव्यात पर्यटकांचे आकर्षण ठरतील अशा अनेक वास्तू, घरे आहेत. चांदोरमधील मिनेझिस ब्रागांझा वाडा, साओ पेद्रोमधील सोलर सौतो मायॉर, मडगावमधील म्युनिसिपल बिल्डिंग यासारख्या अनेक वास्तू आहेत.

मडगावातील म्युनिसिपल बिल्डिंग ही इमारत त्याच वास्तुविशारदाने बांधलेल्या मकाऊमधील तत्सम इमारतीची एकमेव प्रतिकृती आहे. ही पूर्वी पारंपारिक टेराकोटा रंगात रंगवली गेली होती, परंतु आता नगरपालिकेतील शहाण्यांनी त्यावर पिवळा रंग फासला आहे. इमारतींव्यतिरिक्त, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत झळकलेली, काम्पाल व तेरेखोल येथील पावसाळी झाडे आहेत.

काणकोणातील पर्तगाळी श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ, कवळे येथील श्री गौडपादाचार्य संस्थान ही भेट देण्यासारखी वंदनीय स्थळे आहेत. गोवा अ‍ॅक्शन हेरिटेज ग्रुपमार्फत तांबडी सुर्लसह इतर सर्व स्थळांची भेट घडवून आणण्याचे कार्य करतात. राज्य संग्रहालये, ख्रिश्चन कला संग्रहालय आणि राज्य पुरातत्व संग्रहालय यांसारख्या संग्रहालयांनी गोव्याची संस्कृती आणि वारसा जपण्यात फार मोठे योगदान दिले आहे.

पारोडा टेकडीवरील चंद्रेश्वर भूतनाथ, नेत्रावळीतील गोपीनाथ मंदिर ही पोर्तुगीज येण्याआधीपासूनची काही देवळे, फोंड्याची साफा मशीद, जुन्या गोव्यातील चर्च, रेईश मागुश व तेरेखोलसारखे किल्ले, धालो, मांड, शिमगा हे लोकोत्सव, सत्तरी भागातील ग्रामीण निसर्गसौंदर्य आणि याशिवाय खूप काही आहे जे पर्यटकांना आकर्षित करू शकेल. गोव्याची संस्कृती ही पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा अजोड संगम आहे.

गोवा हे सांस्कृतिक संलयनाचे, समन्वयाचे अनोखे उदाहरण आहे. गोव्याच्या याच संस्कृतीचे आणि वैभवशाली वारशाचे दर्शन जगाला घडले पाहिजे. यात निवासी व्यवस्थेपासून इतर अनेक गोष्टींमध्ये स्थानिकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचा आर्थिक उत्कर्ष आणि पर्यटकांना सकारात्मक ऊर्जा, चांगले, समृद्ध वारसा असलेले काहीतरी आयुष्यात पाहिल्याचे समाधान मिळवून देणे शक्य आहे. पर्यटन हा व्यवसाय आगीसारखा आहे. ज्यावर आपण अन्न शिजवू शकतो आणि स्वत:चे घर जाळूही शकतो. शेवटी, ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ हेच खरे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com