Environmental changes Dainik Gomantak
ब्लॉग

Environment: वैचारिक परिवर्तनाची लाट

आज ‘रासायनिक शेती’ चा तिरस्कार व नैसर्गिक शेती, सेंद्रीय खते-कीटकनाशके यांचा पुरस्कार केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Environment: लाट वेगळ्याच दिशेने वळली आहे. ‘पॅरडाईम शिफ्ट’ घडत आहे. ‘फाउंटन हेट’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका आयन रँड यांनी ‘पॅराडाईम शिफ्ट’ या शब्दाचा अर्थ सांगताना एक उदाहरण दिले आहे. पाश्चिमात्य देशांतील गोष्ट आहे.

रेल्वेमध्ये सुविद्य, सुसंस्कृत लोक बसलेले असताना घामटलेला, मळकट कपड्यांचा, तारवटलेल्या डोळ्यांचा, विस्कटलेल्या केसांचा एक माणूस चढतो. बरोबर दोन शेंबडी पोरे तशाच अवतारात. जागा नसल्याने तो दांडीला धरून उभा राहतो.

पोरे जमिनीवर बसकण मारतात. एकमेकाला चिमटे काढणे, ओरडणे, बसलेल्या लोकांच्या बुटाच्या नाड्या सोडवणे हे उद्योग करू लागतात.

टापटीप कपडेवाल्यांच्या बैठकीत एक झुरळ शिरल्यावर घृणा, तिटकारा, झटकण्याची वृत्ती हे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर उमटतात. त्यातला एकजण त्याच्यावर ओरडतो ‘काय तू आणि तुझा ही मुले?’ त्यावर तो म्हणाला ‘मुलेच ती.

ती काय करणार आणि मी त्यांना काय सांगणार? माझी बायको, त्यांची आई रात्री वारली, रात्रभर आम्ही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचे बिल भरून प्रेत ताब्यात घेण्यासाठी पैशांची व्यवस्था करण्याच्या विवंचनेत मी आहे. सकाळपासून मी आणि माझी मुले यांच्या पोटात अन्नाचा कण नाही.

आमच्याकडून तुम्हांला अडचण होते हे मला दिसते’गाडीतील प्रवाशांचा नूर एकदम पालटला. घृणेच्या जागी दया, करुणा निर्माण झाली. हाच ‘पॅराडाईम शिफ्ट’.

असाच बदल जगभरातील मानवी समाजात घडत आहे. गेल्या शतकातील ‘विकास’ या शब्दाबरोबर आलेले कृतिकार्यक्रम विनाशाकडे नेत असल्याचे सिद्ध झाल्याने त्या शब्दाचा वापर करून आपली जनसामान्यांवरील पकड कायम राखण्यासाठी हितसंबंधी वर्ग त्या शब्दाला नवीन अर्थाची झालर लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘समुचित विकास’, ‘शाश्वत विकास’ वगैरे. जिथे तिथे हिरवा रंग फासून निसर्गप्रेमी असल्याची बतावणी करून या हिरव्या पडद्यामागे आपले एकाधिकारशाहीचे ढासळते बुरूज नव्याने बांधले जात आहेत.

हे बदल काय आहेत, पॅराडाईम शिफ्ट कुठेकुठे घडत आहे याची एक सूचक जंत्री करुया.

   गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत वाघ, बिबट्याची शिकार करणाऱ्याला लोकप्रियता, कौतुक लाभत होते. सरकार बक्षीस देत होते. आज शिकाऱ्यास मोठा दंड व तुरुंगवास वाट्याला येतो आहे.

   पूर्वी कुठेही साप दिसला की ठेचायचा, हीच पद्धत होती. मग तो विषारी असो किंवा नसो. आज घरातसुद्धा विषारी साप आला तरी साप पकडणाऱ्याला बोलावले जाते, त्या सापाला जंगलात सोडले जाते.

   ‘वैज्ञानिक शेती’ या नावाखाली, रासायनिक खते, कीटकनाशके, तृणनाशके, पदार्थ टिकविण्याची रसायने यांचा पुरस्कार केला जायचा. आज ‘रासायनिक शेती’ चा तिरस्कार व नैसर्गिक शेती, सेंद्रीय खते-कीटकनाशके यांचा पुरस्कार केला जात आहे.

   मधमाश्या, बरेचसे कीटक, पक्षी, फुलपाखरे ही परागवहनाद्वारे पीक वाढविण्यास मदत करतात. ती टिकली पाहिजेत. तसेच अशुभ मानली गेलेली घुबडे, साप हे उंदीर या पिकाची नासाडी करणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवतात, हे जीव टिकले पाहिजेत, अशी धारणा बनली आहे.

   पॉलिश केलेला तांदूळ, बिनकोंड्याचे गव्हाचे पीठ, मैदा हेच उच्च खाद्यपदार्थ मानले जायचे. आज बिनसडलेला तांदूळ, लाल तांदूळ, काळा तांदूळ याला मागणी आहे. पूर्ण गव्हाला (म्हणजे कोंड्यासह) वापर याची बिस्कीट कारखानदार जाहिरात करीत आहेत.

   नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, राळा, राजगिरा या भरडधान्यांना ‘गरिबांचे अन्न’ मानले जायचे. त्यातील पोषक द्रव्ये तांदूळ-गहू-मका यांच्या तुलनेत जास्त असल्याचे आढळल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे. हवामान बदलाला समर्थपणे तोंड देण्यासही धान्ये जास्त सक्षम आहेत.

यूनोने चालू 2023 हे वर्ष, ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्याचे (मिलेटस्) वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात या धान्याचा खास पुरस्कार केला आहे. गेल्या आठवड्यात जी -20 राष्ट्रप्रतिनिधींच्या भारतातील परिषदेत पाहुण्यांना आवर्जून भरडधान्यांच्या पदार्थांचे जेवण देण्यात आले.

   गेल्या शतकापर्यंत झाडेझुडपे, गवत काढून जमीन साफ करणे, उंचसखल भूमी कापून समतळ करणे ही भूविकासाची ठरलेली पद्धत असायची. आता डोंगरउतार कापून समतळ करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होते.

पहिली गोष्ट शेकडो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेने बनलेली पृष्ठभागाची सुपीक माती, ती धरून ठेवणाऱ्या झाडांच्या, गवताच्या मुळ्या, त्या मुळ्यांसाठी अन्न प्रक्रिया घडवून आणणारे सूक्ष्म जंतू हे सर्व नष्ट होते.

दुसरी गोष्ट भूस्खलन होऊन माती वाहून जाते, जलाशयात साठते. तिसरी, भूमीच्या वरच्या स्तरांतील परिसंस्था उद्ध्वस्त होते. आणि शेवटी भूमीला झालेली जखम डोळ्यांना खटकते म्हणून ‘भूपृष्ठांत कमीत कमी बदल’ ही आजची विकासनीती बनली आहे.

   नद्यांवरील मोठमोठी धरणे हे वर्षभर पाणी उपलब्ध करण्याचे व पूरनियंत्रणाचे साधन मानले जायचे. पण आज असे झाले आहे की, पर्यावरणीय दृष्टीनेच नव्हे तर आर्थिक दृष्टीने, पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनेसुद्धा धरण संकल्पनेवर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत.

त्या दृष्टीने विकेंद्रित संकल्पनेतील पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम जास्त स्वीकारार्ह ठरला आहे. धरणात साठलेल्या गाळामुळे त्यांची क्षमता 50 टक्क्यांखाली उतरली आहेच, शिवाय हवामानबदलास मदत करणारा मिथेन वायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत आहे. शिवाय वाहत्या नदीपासून मिळणारे फायदे गमावले आहेत.

  प्लास्टिक व काँक्रीट विविध प्रकारच्या उपयुक्ततेमुळे अतिवापर झालेले यंत्रनिर्मित घटक त्यांच्या पर्यावरण व जीवसृष्टीच्या आरोग्यावरील दुष्परिणामांमुळे आज पुरते बदनाम झाले आहेत.

‘पेराडाईम शिफ्ट’ हा मानवी प्रतिक्रियेत एकदम 180 अंशात झालेला बदल हा पूर्वीच्या अपुऱ्या माहितीवर आधारलेल्या गोष्टींविषयी दुसऱ्या बाजूचे ज्ञान मिळाल्यानंतर झालेला बुद्धिनिष्ठ बदल आहे. बुद्धीला पटले तरी बराच काळ अंगवळणी पडलेल्या गोष्टींना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात बदलायला वेळ लागतो.

पण राजकीय, व्यापार- कारखानदारी, आणि तंत्रज्ञ यांनी निर्मिलेली व्यवस्था बरोबरच होती आणि आहेही असे ती मंडळी दाखवीत आलेली आहेत. त्याला धक्का बसलेला आहे. पण त्यात जो काही बदल कालानुरूप करणे आवश्यक आहे, तो आम्हीच करणार हा त्यांचा पवित्रा लोकांनी स्वीकारणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने धोक्याचे आहे.

कारण त्यांना काही झाले तरी, आम्ही त्यांच्या दावणीला बांधलेले, त्यांना हवे आहोत. त्यांच्या या खेळीला आपण बळी पडलो तर आमची प्यादी त्यांच्याच खेळीनुसार नाचवावी लागतील. स्वातंत्र्याची संधी हुकेल. आपण त्याच्याच दावणीला बांधलेलो राहू. या लाटेवर नाही स्वार झालो तर आम्ही गटांगळ्या खाऊन बुडून जाऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT