Electricity Generation in the House
Electricity Generation in the House Dainik Gomantak
ब्लॉग

Electricity Generation : आपली वीज आपल्या घरीच तयार करा; तरच गोवा स्वावलंबी होईल

दैनिक गोमन्तक

जरी विजेचा शोध फार पूर्वी ढोबळ पद्धतीने लागलेला होता, ज्यात मायकल फराडे व बेंजामिन फ्रँकलिनसारख्या दिग्गज शास्त्रज्ञांचे योगदान होते, पण आधुनिक पद्धतीचा विजेवर चालणाऱ्या बल्बाचा शोध थॉमस आलवा एडिसन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने 1879 साली लावला. त्यानंतर जगात व भारतात अनेक प्रमुख महानगरांत विजेचा उपयोग व्हायला लागला.

गोव्यात सर्वप्रथम वीज पणजी व मडगाव येथे आली. पोर्तुगीजकाळी डीझेल जनित्र वापरून उत्पादित केलेली ही वीज निवडक घरांत व आस्थापनांत पुरवली जायची. जवळपास 1980 पर्यंत गोव्याच्या सर्व प्रमुख खेड्यांत वीज पोहोचली. आज सर्व डोंगराळ व दुर्गम खेडी व वसाहती धरून गोव्यात 100 टक्के विद्युतीकरण झालेले आहे. सगळीकडे वीज जवळपास अष्टौप्रहर उपलब्ध असते. (Electricity Generation in the House)

पूर्वी गोवा विजेसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून होता. गोवा राज्य एकदम छोटेखानी असल्याने व इथे संसाधने व संबंधित साधनसामग्री नसल्यामुळे इथे पारंपरिक वीज तयार करण्याचे म्हणजे औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्प नव्हते व नाहीत. त्यामुळे गोव्याला आजपर्यंत शेजारची राज्ये कर्नाटक व महाराष्ट्रावर अवलंबून राहायची गरज पडायची.

फार पूर्वी विजेला गोव्यात ‘शरावती’ असे संबोधले जात असे. वीज गेल्यास किंवा आल्यास शरावती गेली, आली असे म्हणण्याची पद्धत होती. याचे कारण असे की गोव्याचा पुष्कळसा वीजपुरवठा कर्नाटकातील शरावती नदीच्या प्रकल्पावरून केला जात असे. आता तो वीजपुरवठा केंद्रीय वीज व्यवस्थेतून ( सेंट्रल पॉवर ग्रीड) केला जातो.

गोव्याला एकूण 700 मॅगावेट तास विजेची गरज पडते. नाही म्हणायला साकवाळ येथे नाफ्तावर चालणारा 48 मॅगावेट प्रकल्प रिलायन्सद्वारा चालू होता जो आता बंद पडलेला आहे. पण, आणखी दोन स्थानीय प्रकल्पांतून उत्पादित केलेल्या विजेचा पुरवठा ग्रीडमध्ये केला जातो.

पारंपरिक वीज उत्पादन करण्याचे पर्याय म्हणजे कोळसा किंवा जलशक्ती. कोळसा वापरून केलेल्या वीज उत्पादनात पर्यावरणाची अफाट हानी होते. तसाही कोळशाचा नैसर्गिक साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. जलविद्युत प्रकल्प महाकाय असतात. ते बांधताना खर्चही भरपूर येतो. तशीच पर्यावरणाची हानी होते.

त्यामुळे, नेहमीच पर्यायी वीज स्रोतांचे संशोधन चालू असते. त्यात अणुशक्ती वापरून वीजनिर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली. आज जगात अणुशक्तीवर चालणारे शेकडो विद्युत प्रकल्प आहेत.

शेवटी पर्यावरण हानी रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी नैसर्गिक स्रोतांचे संशोधन केले. त्यात वारा, समुद्राच्या लाटा आणि सौरऊर्जा वापरून वीजनिर्मिती करण्याचे पर्याय पुढे आले. यात सौरपटल वापरून वीज करणे हे पर्यावरणदृष्ट्या सगळ्यांत कमी हानिकारक आहे व कुठलाही नागरिक अत्यंत लहान प्रमाणावरसुद्धा घरच्या घरी स्वत: ते करू शकतो.

सौरपटलावर सर्वांत पूर्वी एकोणिसाव्या शतकात संशोधन केले गेले. किरणोत्सर्ग क्षेत्रातील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ हेन्री बेकरल यांचे वडील अलेक्झांडर बेकरल यांनी त्याचा शोध लावला. पण 1954पर्यंत त्यात जास्त प्रगती झाली नाही. 1954मध्ये बेल प्रयोगशाळेत तीन शास्त्रज्ञांनी मिळून आधुनिक कार्यक्षम सौरपटलाचा शोध लावला. त्यासाठी त्यांनी सौर बॅटरी पण विकसित केली. सततच्या संशोधनाने सध्या सौर पटलाची कार्यक्षमता त्रेवीस टक्क्यांवर पोहोचली असून, भविष्यात ती पुष्कळ वाढण्याची शक्यता आहे.

आधुनिक काळात देशात व गोव्यात सौरपटलाचा उपयोग फक्त पाणी तापवण्याचा बंब म्हणून केला जात होता व आहे. जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये किंमत असलेला हा सौरबंब प्रत्येक नव्या घरावर दिसून येतो. हा बंब विकत घ्यायला सरकारी अनुदान आहे. त्याचा देखभाल खर्च एकतर काहीच असत नाही किंवा एकदम नगण्य असतो व आयुष्यमान साधारण पंचवीस वर्षे असते. सौरबंब करणाऱ्या शेकडो कंपन्या भारतात कार्यरत आहेत.

आता पुढचे लक्ष्य आहे सौरऊर्जा वापरून घरच्या घरी वीज उत्पादन करायचे. जसे सौरबंब लावून पाणी गरम करायला एक पटल पुरेसा असतो तसे वीजनिर्मितीत होत नाही. सर्वसाधारण घराची विजेची आवश्यकता पूर्ण करायला अनेक पटल लागतात. त्याशिवाय त्याला खास सामग्री व यंत्रणा लागते.

पण, या पद्धतीची खासियत म्हणजे कोणीही ही पद्धत वापरून आपल्याला गरज असलेल्या विजेपेक्षा जास्त वीज उत्पादित करून, वरून सरकारला विकू शकतो. त्याला दुतर्फा चालणारा मीटर लावला जातो. बाहेरून घेतलेली वीज, बाहेर पाठवलेली वीज, याचा ताळमेळ घालून, अधिसूचित दराप्रमाणे बिल तयार होते.

अद्ययावत उपलब्ध माहितीप्रमाणे एक सर्वसाधारण चार सदस्यांचे घर असले, तर त्याला 5 ते 7.5 किलोवॉट क्षमतेचे सौरपटल लागतात जे जवळपास पंचाहत्तर चौरस मीटर जागा लागते. त्यातून घराची एकूण वीज आवश्यकता भरून येते. अशा यंत्रणेच्या स्थापनेला एकूण खर्च येतो पाच लाख. वीज साठवून ठेवायची असल्यास बॅटरी घ्याव्या लागतात त्यांना आणखी दोन लाख खर्च येतो. घराला समजा दर महिना सहाशे युनिट वीज लागत असल्यास, त्या विजेची पूर्ती होऊन जाते व प्रतिमहिना अंदाजे तीन हजार बचत होऊन जाते. भविष्यात वीज दरवाढीची शक्यता गृहीत धरून प्रतिवर्ष दहा टक्क्यांपेक्षा जास्त बचत अपेक्षित आहे. एकूण एक खर्च अंदाजे पंधरा वर्षांत वसूल होऊन जातो.

अशा यंत्रणेत बाहेरच्या वातावरणाप्रमाणे म्हणजे ऊन्ह जसे असेल तशी वीज तयार होते व अतिरिक्त वीज तयार झाल्यास ग्राहक ती सरकारला विकू शकतो. त्यामुळे पाच लाख गुंतवणुकीवर वर्षाला अंदाजे छत्तीस हजाराचा मूळ परतावा मिळून जातो त्याशिवाय अतिरिक्त वीज विकण्याचा नफा.

पण यात फक्त गुंतवणुकीचा परतावा सोडून अनेक फायदे आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:-

  • वीजनिर्मितीबाबत ग्राहक, स्वावलंबी व आत्मनिर्भर होऊन जातो.

  • ग्राहक अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवू शकतो.सरकारी वीज यंत्रणेवरील ताण व झीज कमी होते.

  • ग्रीडमध्ये बिघाड येऊन वीजपुरवठा बंद पडल्यास त्याची ग्राहकाला झळ पोहोचत नाही.

  • सौरऊर्जा संपूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. तिच्या उत्पादनात कसलेही पर्यावरण नुकसान किंवा हानी होत नाही व कोणालाही बाधा पोहोचत नाही.

  • पारंपरिक वीज तयार करायला जो कोळसा लागतो,त्याची बचत होते व प्रदूषण कित्येक प्रमाणात कमी होते.

  • भविष्यात वीज दर वाढल्यास त्याची झळ ग्राहकाला पोहोचत नाही.

  • सौरपटल व्यवस्थेचा देखभाल खर्च एकदम नगण्य असतो.

वर नमूद केल्याप्रमाणे सौरपटल वापरून घरच्याघरी वीज निर्मिती करण्याचे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे आहेत. लोकांनी हे तंत्रज्ञान वापरून घरीच वीज निर्मिती केल्यास जनता स्वावलंबी तर होईलच, पण एकंदर पर्यावरणपूरक अशी कामगिरी होऊन, जागतिक तापमान वाढ कमी करण्यात व या जगाचे आयुषमान थेंबे थेंबे तळे साचे पद्धतीने वाढवण्यात पुष्कळ मदत होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT