गोव्यात (Goa) पूर्वी पारंपरिक शाडू मातीच्या(Shadu soil) व नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या गणेशमूर्ती (Ganesh Idol) बनवल्या जात असत पण या नैसर्गिक रंगाच्या मूर्ती बनवणे जवळजवळ दुर्मिळच झाले आहे. सध्या राज्यात शाडू मातीच्या मूर्ती बनवल्या जातात, पण त्याला घातक असा रासायनिक रंग लावला जातो. जेव्हा या मूर्ती नदीनाले, विहिरींच्या पाण्यात विसर्जित केल्या जातात, तेव्हा पाणी प्रदूषित होते. तसेच मूर्तीच्या मातीचा खचही नदीनाल्यांत साचतो. एकंदरीत हा सगळा प्रकार पर्यावरणविरोधी आहे. याला पर्याय म्हणून पर्ये-सत्तरी येथील काशिनाथ सावंत यांनी यंदा छोट्या व सुबक अशा शाडू मातीच्या मूर्ती नैसर्गिक रंगाने तयार केल्या आहेत.(Eco-friendly Ganesh idols made by Goa Artist)
पर्येतील या युवा कलाकाराने केवळ सात इंच उंचीच्या आणि सुमारे अर्धा किलो वजनाच्या पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती बनवल्या आहेत. शाडू मातीच्या या मूर्ती नदीतील ‘रंगाच्या’ दगडांपासून व इतर नैसर्गिक वस्तूंपासून रंग बनवून रंगवण्यात आल्या आहेत. छोटेखानी या मूर्तींना नैसर्गिक रंग उठावदार दिसतो. या मूर्तींमुळे पर्यावरणही सांभाळले जाते.(Eco-friendly Ganesh idols)
दरम्यान, व्यावसायिकांनी अशा मूर्तींची दखल घेऊन त्या मागवल्या आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे यंदा अशा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती चतुर्थीला मखरात विराजमान होणार आहे. अशा या मूर्तीचे विसर्जन घरात बादलीभर पाण्यातही करता येईल, जेणेकरून गणपती मूर्तीची माती पुन्हा वापरता येईल.
गेल्या वर्षीचा गोवा जैवविविधता संवर्धन पुरस्कार प्राप्त झालेले भुईपाल-सत्तरी येथील पर्यावरणप्रेमी हस्तकलाकार सूर्यकांत गावकर यांची ही नैसर्गिक मूर्ती बनवण्याची संकल्पना आहे. ते गेल्या काही वर्षांपासून होळीनिमित्त नैसर्गिक रंग तयार करत आहेत. त्यांनी या रंगांचा आधार घेत यंदापासून नैसर्गिक रंग दिलेल्या गणेशमूर्ती बनवून लोकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा असे ठरवले संजय सावंत यांना या कामासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करताना आकर्षक मूर्ती बनवल्या आहेत.
प्रतिकूल परिस्थितीमुळे कलेकडे केले होते दुर्लक्ष
घरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे इयत्ता दहावीपर्यंतचेही शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या संजय सावंत या युवा कलाकाराने आपली कला सोडून एका खासगी आस्थापनात कंत्राटी कामगार म्हणून काम करणे पसंत केले होते. तेथे मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह चालवायचा. पण सूर्यकांत गावकर यांनी त्याच्यातील सुप्त गुण जाणून गणेशमूर्ती बनवून घेत त्याची कला पुनर्जीवित केली आहे. त्याने बनवलेल्या मूर्तींना मागणी वाढू लागली आहे. दरम्यान, गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीना पूर्णपणे बंदी आहे. तरीसुद्धा या मूर्तींची विक्री केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.