

गोव्याची संस्कृती, समाज जीवन संपवण्याचा खेळ सुरू झाला आहे, अशा शब्दांत हडफडेतील आगीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात प्रशासनातील भ्रष्ट व्यवस्थेवरही भयंकर टीका होऊ लागली आहे. पर्यटनाच्या नावाखाली, इथले निसर्ग संपन्न डोंगर कापून भूमाफियांच्या घशात घातल्या जातात. परिणामी गोव्यातील पर्यटनामुळे दिल्लीची इकॉनॉमी वाढली, गोव्याची नव्हे, असे सांगणारा ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे यांचा व्हिडिओ सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला आहे. निसर्ग आणि पारंपरिक गोंयकारपण जपून येथील पर्यटन जपता येईल, पण आपल्या जमिनी नाईट क्लब, रिसॉर्ट बांधणीसाठी परप्रांतीयांना कोट्यवधींना विकणाऱ्यांना याबाबीचे मोल कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल नाही का? ∙∙∙
डिसेंबर महिना हा नेहमीच लोकांच्या लक्षात रहात असतो. आजवर हा महिना म्हणजे मावळते वर्ष संपत असताना अनेक अपघात होऊन मानवी बळी जातात, असे म्हटले जात असे. त्यासाठी तरुण मंडळींना घराबाहेर पडताना घरांतील वडीलधारी मंडळी सतत सावधगिरीच्या सूचना देत. मात्र यंदा नेमके विपरीत घडल्याची चर्चा चालू आहे. संपलेल्या आठवड्याच्या अखेरीस असंख्य वाहन अपघात झाले व त्यात तरुण मंडळींचा बळी गेला. शनिवारी मध्यरात्री बार्देस मधील हडफडे येथे जे अग्नितांडव घडले त्यामुळे तर सगळ्यांचाच थरकाप उडाला. कारण त्यांत जी प्रचंड जीवितहानी झाली ती राज्यांतील अशाप्रकारची व आजवरची सर्वांत मोठी दुर्घटना ठरली आहे. या घटना डिसेंबर वा वर्ष अखेरीस नव्हे तर सुरवातीसच घडल्या आहेत, त्यामुळे उरलेल्या दिवसांत काय घडेल, अशी चिंता सर्वांनाच लागून आहे. ∙∙∙
हडफड्यात आगीचे तांडव सर्वांनी पाहिले. ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबचा मालकी वाद, त्यानंतर पंचायतीच्या आदेशाकडे झालेले दुर्लक्ष अशा अनेक चुकीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. यावरून प्रशासन किती गचाळ आणि भ्रष्ट झाले आहे, हे लक्षात येते. विरोधकांनी त्याच्यावर बोट ठेवलेलेच आहे. परंतु ज्या ठिकाणी हा क्लब उभारला आहे, तो पाहिल्यानंतर त्याचा अधिकतर भाग पाण्यावर असल्याचे स्पष्ट दिसते. क्लब जळून खाक झाल्यानंतर तेथील जलप्रवाहही आग विझवू शकला नाही, असे सहजोद्गार निघू शकतात. ∙∙∙
भाजप आपले उमेदवार धडाधड जाहीर करीत असतानाच फोंडा तालुक्यात ‘आरजी’वाल्यांनीही नेमका तोच कित्ता गिरवला आहे. या तालुक्यातील विविध जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी ‘आरजी’वाल्यांनी आपले उमेदवार जाहीर करून या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखलही केले आहेत. त्यामुळे सध्या तरी फोंडा तालुक्यात ‘आरजी’वाले एक पाऊल पुढे असा प्रकार आहे. कोणताही गाजावाजा न करता थंडपणे हे उमेदवार जाहीर करून आपला प्रचारही त्यांनी सुरू केल्याने एकप्रकारे भाजपवाल्यांसमोर त्यांचे आव्हानच उभे ठाकले आहे. ∙∙∙
हडफडेतील आगीच्या घटनेची दखल पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी लागली. त्याशिवाय विरोधी पक्षाच्या प्रमुखांनीही या घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हडफडेतील क्लबमध्ये आग लागल्यानंतर जर असे लोकांचे जीव जाणार असतील, तर तरंगते कॅसिनो, सरकारी कार्यालये यांचीही तत्परता तपासायला हवी. अनेक सरकारी इमारतीला आग लागल्यानंतर पाणी मारण्यासाठी फायर हायड्रंट उभारलेले असतात, पण ती सुविधा खरोखरच चालू आहे की नाही, याची तपासणी अग्निशमन दलाकडून नित्यनेमाने होते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅसिनोत रात्रभर हजारो लोक असतात, त्यात कर्मचारी आणि पर्यटकांचा समावेश असतो, तसेच पाण्यात ते असल्याने तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खासगी बोटींचा वापर करावा लागतो. अघटित घटना घडल्यास तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणती यंत्रणा अशा घटनांना तोंड देण्यासाठी पूरती सज्ज आहे, याचा कधी सरकारच्या त्या-त्या संबंधित खात्यांनी विचार केला आहे. ∙∙∙
हडफडे येथील नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री आगीची घटना गडली आणि त्यात पर्यटकांसह कर्मचारी व इतर २५ जणांचा जीव गेला. या’ घटनेनंतर कायदेशीर-बेकायदेशीर असे प्रश्न उपस्थित व्हायचे ते झाले. नाईट क्लब म्हटले की नृत्य, संगीत आणि पार्टीचा मूड असा सर्व माहोलच. त्यामुळे मध्यरात्र झाल्याने पार्टीत संगीताचा बहर. विशेष बाब म्हणजे बारमध्ये वाजत असलेले गाणेही ‘शोले‘ चित्रपटातील मेहबुबा-मेहबुबा गाण्यावर नृत्यांगणा थिरकत होती आणि त्याचवेळी खरोखरच छतावरून विद्युत संयत्रणातून ‘शोले’ म्हणजे आगीच्या ज्वाला निघाल्या. हा खरोखरच योगा-योगच म्हणावा, असेच ते चित्र. त्यामुळे काहींना लक्षात येताच त्यांनी आग लागली म्हणून ओरड केली आणि धावपळ सुरू झाली, पण त्यातील काहींना मृत्यूने गाठले...नको असणारी ती घटना घडली खरी, पण प्रशासकीय व्यवस्थेविषयी खरोखरच ‘शोले’ सारखे अनेक प्रश्न उपस्थित करून गेली. ∙∙∙
रामा काणकोणकरवरील प्राणघातक हल्ल्यांतील मुख्य संशयित तर त्या प्रकारापासून प्रथम पोलिस व नंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या जेनिटोला अखेर जामीन मिळाला आहे, पण मुद्दा तो नाही. तर त्या नंतर त्याचे तुरुंगाबाहेर जे जल्लोषी स्वागत झाले त्यामुळे आपला समाज कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. कारण जेनिटोची काही आरोपांतून निर्दोष मुक्तता झालेली नाही तर त्याला केवळ जाटक अटींवर जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्याचे स्वागत करणाऱ्यांचे नव्हे तर स्वतः जेनिटोलाही हे स्वागत स्वीकारताना काहीच वाटले नाही का, असे सवाल अनेकांनी केले. रामावरील हल्ल्यानंतर मेणबत्ती घेऊन सरकारच्या नावाने छाती बडविणा-यांनी मात्र या स्वागताबाबत अजून चकार शब्द काढलेला नाही खरा मात्र यातून सध्या तरी जेनिटो विजयी वीराच्या आविर्भावात वावरण्यास मोकळा झाला आहे. ∙∙∙
हडफडे येथील ‘रोमियो लेन’ क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभर खळबळ माजलेली आहे. या क्लबला परवाने दिल्याप्रकरणी सरकारने माजी पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माजी सदस्य सचिव शमिला मोंतेरो आणि हडफडे–नागवा पंचायतीचे तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांना निलंबित केले. परंतु, अशा पद्धतीची बेकायदा बांधकामे उभी करीत असताना अधिकाऱ्यांप्रमाणेच राजकारण्यांचाही त्यांना आशीर्वाद असतो, हे जनतेला माहीत आहे. मग, अधिकाऱ्यांप्रमाणेच सरकार अशा राजकारण्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.