Covid Dainik Gomantak
ब्लॉग

कोविड च्या जागी दुसरा विषाणू देखील येऊ शकतो: निर्णय पालकांचा

कोविड बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली असून शाळा-विद्यालये पूर्ववत चालू करावीत,असा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: कोविड संसर्गाची तिसरी लाट ओसरू लागली असून बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. शाळा-विद्यालये पूर्ववत चालू करावीत, असा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे. अर्थात संसर्ग प्रतिबंधक सावधगिरीची उपाययोजना कार्यान्वित करून वर्ग भरवायचे आहेत. संसर्गाचा आलेख घसरू लागलेल्या अन्य राज्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. यातील पालक-शिक्षकांच्या प्रतिक्रिया दखलपात्र ठरतात, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या नव्हे. गोव्यात महिला कॉंग्रेसने या निर्णयाला आक्षेप घेतल्याचे दिसते. गोव्यात भाजपचे सरकार (दोन आठवड्यांसाठी का होईना) सत्तेत आहे म्हणून हा आक्षेप असावा. पण विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या पश्‍चिम बंगाल, राजस्थान आणि तामिळनाडूतही विद्यालये 16 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून अन्य काही राज्ये लवकरच तसा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत.

विद्यालये सुरू झाली तर काहींचे रुळलेले आरामाचे जीवनमान पुन्हा धबडग्यात रूपांतरित होणार आहे. पुन्हा वर्गात जायचे, त्यासाठी पूर्वतयारी करायची याचा कंटाळा असलेले बरेच शिक्षक-शिक्षिका आहेत आणि सरकारी निर्णयामुळे त्यांच्या कपाळावर आठ्या पडणे स्वाभाविक आहे. अर्थात ही अल्पसंख्याक जमात आहे. बहुतेक शिक्षकांना वर्ग सुरू झाल्याचा आणि मुले शाळेत आल्याचा आनंदच होईल.

प्रश्न पालकांना वाटणाऱ्या धास्तीचा आहे. मुले संसर्गाच्या कचाट्यात सापडली तर धोका कितपत आहे, याची चिंता तर आहेच; पण मुले महिनोन् महिने वर्गापासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्या अध्ययन कौशल्यावर, आकलनावर, सामाजिक समरसतेवर, एकाग्रतेवर परिणाम होत असल्याचीही चिंता आहे. विद्यालयांपासून मुलांना दूर ठेवण्याची किंमत कोविडच्या भयापेक्षा अधिक असल्याचे बहुतेक पालकांचे म्हणणे आहे.

मुलांना घरी ठेवल्यामुळे कोविड आटोक्यात आला का? दुसरी आणि तिसरी लाट का उसळली? कामाधंद्याच्या निमित्ताने घराबाहेर राहाणाऱ्या पालकांपासून मुलांना विलग ठेवण्याची व्यवस्था किती घरांमध्ये आहे? प्रत्येक परिवाराने घरात अंतरभान पाळले का, मुलांनी आणि पालकांनी घरातही मास्क वापरले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात कठोर लॉकडाऊनचा कालावधी वगळता अनेक परिवारांनी भ्रमंती केली आहे आणि तिच्यात मुलांनाही सामावून घेतले आहे. आजही गोव्यातून लोक पर्यटनासाठी अन्य राज्यांत जात आहेत आणि सोबत मुलांनाही नेत आहेत. गोव्यात गेल्या चार महिन्यांत अनेक जत्रा, काले आणि तत्सम उत्सव झाले, लग्नसोहळे झाले, पारिवारिक साहचर्याचे कार्यक्रम झाले. या सर्वांत मुलांचा स्वाभाविक सहभाग होता. मग केवळ विद्यालये सुरू झाली तरच आक्षेप का असावा?

निवडणुका पार पडल्या. सभा-बैठकांवर निर्बंध आल्यामुळे वैयक्तिक प्रचारावर भर दिला गेला. उमेदवार कार्यकर्त्यांसह घरोघर फिरले. ते दारी आले असता कुणी मुलांना घरात कोंडून ठेवले नाही. दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच राहिले. खबरदारीचा स्तरही तोच राहिला. त्याचा फटका मुलांना बसल्याचे उदाहरण नाही. अनेक गावांत क्रिकेटच्या स्पर्धा सध्या जोरात सुरू आहेत आणि तिथेही मुलांची वर्दळ असते. तिथे तर कुणी मास्कही घालत नाहीत. मैदानावरील वावरण्यावर कुणाचेच लक्ष नसते. तेथे निर्बंध लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे चालते तर मग वर्ग सुरू झाल्यास असे कितीसे नुकसान होईल?

मुख्य म्हणजे वर्ग नसण्याला सध्या उपलब्ध असलेला ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय किती बिनकामाचा आणि प्रभावशून्य आहे, हे पालक गेली दोन वर्षे अनुभवत आहेत. त्यांच्या विवंचनेत आणखी भर कुणी घालू नये.

अर्थात मुलांना सामावून घेणाऱ्या विद्यालयांनी आपल्याकडल्या व्यवस्थेत किंचितही त्रुटी ठेवता कामा नये. सर्व शिक्षक लसीकरण झालेले असावेत. मुलांवर मास्क घालून वावरण्याची सक्ती असावी. आसनव्यवस्था अंतराचे नियम पाळणारी असावी. परिसराचे निर्जंतुकीकरण वारंवार करण्यात यावे. थोडा जरी संशय आला तर मुलाला विलग करून त्याची सखोल वैद्यकीय चिकित्सा केली जावी. संसर्ग पसरू नये, यासाठी शिक्षकांकडून पालकांच्या आस्थेने यत्न व्हावेत.

यातून संसर्ग आटोक्यात राहील, असे मला वाटते, नव्हे माझी खात्रीच आहे. कोविड नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपाय खराच; पण लस ज्यांच्यासाठी उपलब्ध नाही ते मास्क, शारिरिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या बळावर संसर्गाला दूर ठेवू शकतात. मुलांत ही सवय बाणवणे ही काळाची गरज आहे. यापुढचे युग विषाणूंचेच असेल. कोविडचा विषाणू संपून जाईल, असे ज्यांना वाटते ते मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. कोविड आटोपला तर त्याची जागा दुसरा विषाणू कधीही भरून काढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विषाणू कसा असेल, हेही कुणाला माहीत नाही. विषाणूंच्या विश्वाचे नखही मानवजातीला पुरते दिसलेले नाही. धोका आपल्या सोबतीला कायमचा असेल. तर मग मुलांना घरीच ठेवणार का? प्रश्न त्यांच्या भवितव्याचा आहे. बालकांसाठीची लस अद्यापही आलेली नाही. भविष्यात ती निश्चित येईल; पण मुहूर्त कुणीच सांगू शकत नाही. तोपर्यंत मुले घरीच राहावीत असे कुणा पालकांना वाटत असेल तर त्यांनी अलबत तसा निर्णय घ्यावा. पण ज्यांना आपली मुले शाळा-विद्यालयांत जावी असे वाटते, त्यांच्यापर्यंत उगाच भीती पोहोचवून त्यांची अडवणूक करू नये.

- उदयन कामत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: त्या 'मॅडम'ना पकडून देण्याचा सर्व जनतेचा निर्धार!

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

Camurlim Gram Sabha: कामुर्ली ग्रामसभेत राडा! महिला उपसरपंचास तरुणाकडून मारहाण; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

SCROLL FOR NEXT