मडगाव: 25 टीपीडी क्षमतेचे दोन बायोमिथेनेशन प्लांट उभारण्यासाठी मडगाव नगरपालिकेने सादर केलेले प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी खोळंबून आहेत. त्यामुळे सध्या पालिकेला कचरा व्यवस्थापन आघाडीवर अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.
नगरपालिकेने 9 टीपीडी क्षमतेचा एक प्लांट एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी व फळभाजी मार्केटजवळ उभारलेला आहे. त्याचे काम व्यवस्थित चालत असल्यानेच असे आणखी दोन प्रकल्प सोनसोडोवर उभारून तेथील कचरा समस्या दूर करण्याचे पालिकेने ठरविले होते. पण खात्याच्या तज्ज्ञ समितीकडून त्या प्लांटना हिरवा कंदिल न मिळाल्यामुळे पुढील सर्व काम अडखळून आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेतून वीजनिर्मितीचीही मूळ योजना आहे.
पालिकेने या प्रस्तावांबाबत संबंधिताकडे अनेक पत्रव्यवहार केले, पण प्रतिसाद मिळालेला नाही. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगितली गेली असे कळते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष व उमेदवारांनी सोनसोडो प्रश्र्न सोडविण्याच्या घोषणा केल्या. त्यामुळे त्या सर्वानी आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे.
बायोरेमीडिएशन लवकरच
सोनसोडोवरील कचरा बायोरेमीडिएशनची प्रक्रिया पावसाळ्यानंतर विविध कारणास्तव अजून सुरू झालेली नाही. मात्र आता ती लवकरच सुरू होऊन पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्ण होईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. गत उन्हाळ्यात जमा झालेले आरडीएफ तेथून हटविले न गेल्याने बायोरेमीडिएशन रखडले होते. आता संबंधित ठेकेदार आरडीएफ तेथून कर्नाटकातील सिमेंट कारखान्यांना नेऊन पोचविणार व त्यानंतर लगेच बायोरेमीडिएशन सुरू होणार असे सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.