Chikal Kalo 2023 Dainik Gomantak
ब्लॉग

Chikal Kalo festival 2023: चिखलकाला उत्सव कसा साजरा करतात?

गोमन्तक डिजिटल टीम

Chikal Kalo Mud festival Goa 2023

भिकू बोमी नायक

पारंपरिक उत्सवांचे बाजारीकरण झाल्यास त्यातील पावित्र्य संपेल, रूढी व परंपरांशी असलेले नाते संपुष्टात येईल, अशी भीती अनेकांना वाटते. माशेल गाव, देव देवतांचा गाव. या गावात सुमारे एकोणतीस मंदिरे आहेत. त्यामुळे या मंदिरांमध्ये वर्षभर उत्सव चालूच असतात. त्या उत्सवामधला आषाढी द्वादशीला साजरा होणारा चिखलकाला उत्सव.

संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेला हा चिखलकाला 30 जून रोजी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. यंदा गोवा सरकारने पर्यटन खात्याच्या वतीने हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले असून तीन दिवस हा उत्सव साजरा केला जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गोवा सरकार बुधवारी या उत्सवाला सुरुवात करणार आहे. पहिले दोन दिवस संगीताचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे या चिखल काला उत्सवाला यंदा हजारो पर्यटक हजर राहण्याची शक्यता आहे.

गोव्यात चिखलकाला फोंडा, साखळी आणि माशेल येथे साजरा केला जातो. माशेल येथील होणारा चिखलकाला आगळावेगळा असून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. या चिखलकाल्याला स्थानिक लोक ‘गोपाळकाला’ म्हणूनही ओळखतात. माशेल येथील चिखलकाल्याला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे, असे येथील वयोवृद्ध लोक सांगतात.

चारशे वर्षांपूर्वी चोडण येथील मंदिराची पोर्तुगिजांनी मोडतोड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चोडण येथील नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले.गावांतील मंदिरातल्या मूर्ती रातोरात डोक्यावर घेऊन देवभक्त, कुळावी-महाजनांनी डिचोली तालुक्यातील मये येथे स्थलांतर केले. मये येथे देवांची स्थापना केली खरी, पण त्यांना तिथेही सुरक्षित वाटेना, म्हणून तेथून होडीतून मांडवी नदी पार करून माशेल येथे देवांना घेऊन सगळे भक्त आले.

माशेलमध्ये सर्व देवतांची स्थापना करून मंदिरेही बांधण्यात आली. देवांच्या मूर्ती घेऊन आलेल्या भक्तांनी माशेलात वस्ती केली. गुण्यागोविंदाने देवांचे विविध उत्सव करून सुखासमाधानाने राहू लागले. मये येथून आलेल्या देवकीकृष्णाच्या कुळाव्यांनी देवाची स्थापना करून मंदिरही बांधले. देवकी-कृष्णाचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करू लागले. त्यातील चिखलकाला हा एक उत्सव. चिखलकाल्याच्या उत्सवाला आषाढी एकादशीला दुपारी १२ वाजता भजनाने सुरुवात होते.

दुसऱ्या दिवशी द्वादशीला या २४ तासांच्या ‘पार’ उत्सवाची दुपारी १२ वाजता समाप्ती होते. त्यापूर्वी ११ वाजता चिखलकाल्यात भाग घेणारे खेळगडी आणि भाविक नागरिक देवळासमोर जमतात. राधाकृष्ण, गोपाळकृष्णाचा गजर घालीत मंदिराला प्रदक्षिणा घालतात. तर काही जण ‘जय विठ्ठल, हरी विठ्ठल’, असे म्हणत नाचतात. प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळेजण देवळात जातात. देवाला नमस्कार करतात. देवळातील पुरोहित चिखलकाला खेळणाऱ्या सगळ्यांवर देवाचे तीर्थ शिंपडतात. त्यानंतर सगळेजण देवळासमोरील मैदानावर जमतात.

पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस पडू लागला की धो धो पडणाऱ्या पावसामुळे जमिनीवर पडलेला सगळा कचरा वाहून जात असे. मैदानावर पडलेला कचरा वाहून गेल्यावर मैदानावर स्वच्छ पाणी भरलेले दिसायचे. जास्त पावसामुळे मैदानावर झालेली ‘उमळ’ यामुळे माती शुद्ध होऊन चिखल होत असे. या चिखलात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे चिखल अंगाला फासल्यामुळे शरीराची पर्यायाने त्वचेची राखण होत असे. याच उद्देशाने पूर्वापार पारंपरिक पद्धतीने चिखलकाला खेळला जात असे.

चिखलकाल्याला सुरुवात झाल्यावर प्रथम सगळेजाण आपल्या अंगाला चिखल फासतात. खेळगडी घराकडून सगळ्या अंगाला तेल लावून येत असल्यामुळे चिखल जास्त वेळ अंगाला चिकटून राहू शकत नाही. चिखलमय जमिनीवर वेगवेगळे खेळ खेळतात. एकमेकांवर चिखल फेकतात. गढूळ पाणी उडवतात. कबड्डी, चोर-शिपाई, बेडूक उड्या, दोरी खेचाखेच, बोकड खेळ असे अनेक खेळ खेळतात. त्यानंतर पिंपळाच्या फांदीला बांधलेली दहीहंडी फोडण्याचा खेळ होतो.

दही हंडी फोडण्यापूर्वी खेळगड्यांमधील एकटा ‘नवरा’ बनतो तर दुसरा ‘नवरी’ बनतो. दोघांची मैदानावर मिरवणूक काढली जातो. दहीहंडी फोडल्यानंतर सगळे खेळगडी ‘मडवळ’ वाड्यावर जाऊन आंघोळ करतात. नवीन कपडे घालून ते देवळात येतात. देवळात देवाची आरती झाल्यावर सगळ्यांना तीर्थ-प्रसाद वाटला जातो. येथेच चिखलकाल्याच्या उत्सवाची सांगता होते. गोवा सरकार पर्यटनाचा दृष्टिकोन ठेवून साजरा करत असलेल्या या उत्सवाचे बाजारीकरण होऊ नये, असे मनापासून वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT