

The Ashes 2025-26: इंग्लंडविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा झाली. 21 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये हा सामना खेळला जाईल. नियमित कर्णधार पॅट कमिन्स जखमी असल्याने अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र, या संघातून ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार असलेल्या मिचेल मार्शला (Mitchell Marsh) वगळण्यात आले, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिचेल मार्शने गेल्या महिन्यात एका मुलाखतीदरम्यान अॅशेसमध्ये खेळण्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याला वगळण्यात आले असावे, असा कयास लावला जात आहे. मार्शने गंमतीने म्हटले होते की, "मी पर्थ कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंचपर्यंत सहा बिअर पीत असेन." हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्याच्या या वक्तव्यामुळे तो कसोटी क्रिकेटबाबत गंभीर नाही, असा संदेश गेला.
मार्शला वगळण्यामागील कारण स्पष्ट करताना ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी मिचेलच्या वक्तव्याचा संदर्भ देत गंमतीशीर परंतु कठोर प्रतिक्रिया दिली. बेली म्हणाले, "आम्ही आयसीसीकडे याबद्दल चर्चा केली. मुद्दा हा आहे की, ते अंपायर्संना मैदानावर 'ब्रेथलायझर' घेऊन जाण्याची परवानगी देत नाहीत. जर पहिला बॉल टाकण्यापूर्वीपर्यंत मार्शने सहा बिअर पिलेल्या असतील, तर ती आमच्यासाठी एक मोठी अडचण होईल."
यावरुन स्पष्ट होते की, मार्शच्या या टिप्पणीला निवड समितीने गंभीरपणे घेतले. मार्शने शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2024 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता आणि त्यानंतर त्याला या फॉर्मेटमध्ये संधी मिळालेली नाही.
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी तर मिचेल मार्शला अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत सलामी फलंदाज म्हणून संधी देण्याचा सल्ला दिला होता. यावर मार्शने प्रतिक्रिया दिली होती की, "माझ्या मनात अॅशेसबाबत फक्त एवढाच विचार आहे की, माझ्याकडे पहिल्या दोन दिवसांचे तिकीट आहे." एबीसी रेडिओवर ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी त्याला पुन्हा सलामीला खेळण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता, मार्शने तो सल्लाही हसून टाळला होता.
मिचेल मार्शने आतापर्यंत 46 कसोटी सामन्यांच्या 80 डावांमध्ये 28.53 च्या सरासरीने 2083 धावा केल्या असून त्यात 3 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने 51 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या या 'नॉन-सीरियस' वक्तव्यामुळेच त्याला वगळण्यात आले असावे, असे मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.