

Gold And Silver Price Drop: राजधानी दिल्लीतील सोन्याच्या किमतीत शुक्रवारी (7 नोव्हेंबर) प्रति 10 ग्रॅममागे 100 रुपयांची किरकोळ घसरण नोंदवण्यात आली. ज्वेलर्स आणि स्टॉकिस्ट्सनी नफा कमावण्यासाठी केलेल्या ताज्या विक्रीमुळे ही घसरण दिसून आली, अशी माहिती ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनने दिली.
99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,24,100 वरुन घसरुन 1,24,000 प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला. मागच्या सत्रात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1,24,700 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होता. दरम्यान, चांदीच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही. चांदी 1,53,300 प्रति किलोग्रॅम या दरावर स्थिर राहिली.
भारतीय बाजारात किमती उतरलेल्या असताना जागतिक (Global) बाजारात मात्र सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ दिसून आली. स्पॉट गोल्डची किंमत 0.5 टक्क्यांनी (19.84 डॉलर) वाढून 3996.93 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. स्पॉट सिल्व्हरमध्येही 0.96 टक्क्यांची वाढ होऊन ती 48.48 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होती.
बाजार तज्ज्ञांनुसार, शेअर बाजारातील 'बुडबुडा' फुटण्याची भीती आणि अमेरिकन सरकारचा 38 दिवसांपासून सुरु असलेला दीर्घकाळ शटडाउन यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. अशा अनिश्चित वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याला समर्थन मिळत आहे. डॉलर इंडेक्स 0.08 टक्क्यांनी घसरुन 99.65 वर आला आहे. डॉलर कमकुवत झाल्यावर सोन्याची खरेदी अधिक आकर्षक बनते, ज्यामुळे सोन्याच्या किमतीला आधार मिळाला.
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष जतिन त्रिवेदी यांनी सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकारी शटडाउनमुळे अमेरिकेतील आर्थिक घडामोडींवर परिणाम झाला असून, अनेक महत्त्वाचे आर्थिक आकडे जाहीर होण्यास विलंब होत आहे. यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. बाजार अनिश्चित असताना, डॉलरची कमजोरी आणि शटडाउनची वाढती अवधी यामुळे सोन्यात आणखी तेजी येण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूकदार पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या भाषणांवर आणि अमेरिका तसेच भारतातील ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) डेटावर लक्ष ठेवून आहेत. या आकडेवारीमुळे सोन्या-चांदीच्या बाजाराची पुढील दिशा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.