butterfly story  Dainik gomantak
ब्लॉग

फुलपाखरांची गोष्ट

गोव्यात जी रंगबेरंगी फुलपाखरे पहायला मिळतात, त्याचे रंग, रूप बऱ्याचदा आकर्षक असल्याकारणाने त्यांचे दर्शन प्रसन्न करणारे असेच असते

दैनिक गोमन्तक

मान्सूनचा पाऊस ओसरल्यानंतर पश्चिम घाटातल्या वृक्षवेली पाणथळीच्या जागा, माळरानावर त्याचप्रमाणे तृणपात्यांनी नटलेल्या पठारांवर एकापेक्षा एक सुंदर अशा फुलपाखरांचे विलोभनीय दर्शन घडते. प्राणीसृष्टीत अगदी अल्प अशी जीवनरेषा लाभलेल्या कीटकांत फुलपाखरे त्यांच्या नाजूक पंख आणि विविधरंगी छटांच्या वैभवामुळे आकर्षक वाटतात. फुलांबरोबर, शेण, चिखल, ओली माती, वनस्पतींचा पाझरलेला द्रव त्याचप्रमाणे मलमूत्राकडे आकर्षित होणारी फुलपाखरे साधारणत: वर्षभर जगतात, आपल्या अळ्यांना अन्न मिळेल अशा वनस्पतींच्या पानावर अंडी घालून फुलपाखरे मरून जातात. अंड्यांतून अळ्या बाहेर येतात आणि वाढतात. कोशांतल्या अळीचे सुरवंटांत रुपांतरण आल्यावर त्यातून प्रौढ फुलपाखरू बाहेर येते आणि विमुक्तपणे विहार करू लागते. मादी फुलपाखरे पुरुषापेक्षा आकाराने मोठी असतात तसेच ती जास्त काळ जगतात. निसर्गतः फुलपाखरांकडे संवेदनक्षम दर्शक असल्याने, त्यांना चवीचे ज्ञान होत असते. उडताना न भट‌कता अचूक मार्गाने फुलपाखरे लक्ष्याकडे पोहचलेली असतात. गोव्यासारख्या छोट्या राज्यात अडीचशेपेक्षा ज्यादा फुलपाखरांच्या प्रजाती आढळत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. देवराया, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान, राखीव जंगल क्षेत्रातच नव्हे तर जेथे कीटकांना आकर्षित करणारी वृक्षवनस्पतीची संपदा आहे तेथे त्यांचे वैविध्य अनुभवायला मिळते.

गोव्यात (goa) जी रंगबेरंगी फुलपाखरे पहायला मिळतात, त्याचे रंग, रूप बऱ्याचदा आकर्षक असल्याकारणाने त्यांचे दर्शन प्रसन्न करणारे असेच असते. अशा फुलपाखरांत केवळ पांढरा रंग आणि शरीरावरती काळ पट्टे असलेले फुलपाखरू त्याच्या एकंदर विहाराद्वारे निसर्गप्रेमीत लक्षवेधक ठरलेले आहे, त्यात निम्फेलिड कुळातील डॅनाईडे समूहातील मलाबार ट्री निम्फ फुलपाखराचा समावेश होतो. दक्षिण भारतातल्या (India) मलाबार भूप्रदेशात प्रामुख्याने आढळणाऱ्या या फुलपाखराचा संचार आणि विहार सदाहरित आणि निम्नसदाहरित जंगल क्षेत्रात असतो. वृक्षवेली, बारामाही खळाळणारे पाणी मुक्तपणे वाहणाऱ्या गोव्यातल्या मोजक्याच जंगलक्षेत्रात आढळणारे हे फुलपाखरू स्वप्नातल्या एखाद्या अप्सरेसारखे विहार करत असल्याकारणाने या प्रदेशनिष्ठ कीटकाच्या नावाला निम्फ ही संज्ञा जोडलेली आहे. सकाळच्या वेळेला, जेव्हा सदाहरित वृक्षांच्या प्रजातीने नटलेल्या जंगलात सूर्याची कोवळी किरणे वृक्षाच्छादनातून जमिनीवर उतरू लागतात. तेव्हा हे फलपाखरू अगदी अलगलपणे विहार करू लागले.

हिरव्यागार वृक्षाच्छादनाखाली किंवा त्यावर जेव्हा हे फुलपाखरू विमुक्तपणे विहार करण्यात मग्न असले तेव्हा एखाद्या मुलाने आकाशात पतंग उडवण्याचा प्रयत्न केल्यासारखा त्याचा आसमंतात संचार असतो, त्याचप्रमाणे खालून पहाणाऱ्याला त्याचे दर्शन होते. म्हणून इंग्रजीत या फुलपाखराला ''पेरकाईट'' म्हणजे कागदी पतंग अशी संज्ञा दिलेली आहे. मलाबार ट्री निम्फ हे फुलपारवरू विहार करताना, त्याच्या लक्षवेधक अशा पांढऱ्या रंगामुळे पहाणाऱ्याला एखादा कागदी पतंगच उडत असल्याचे वाटते. अन्य फुलपाखरे स्वच्छंदीरी अपवादात्मक परिस्थितीत विसावत असते. त्यामुळे जंगलात या फुलपाखराचा विहार निसर्गप्रेमीसाठी जसा लक्षवेधक असतो तसाच तो आनंदवर्धकही असतो.

मलाबार ट्री निम्फ फुलपाखराच्या पंखांचा सर्वसाधारणपणें 120 ते 154 मिलीमीटर इतका विस्तार असतो. पखांच्या वाहिन्या काळ्या रंगाच्या असतात. पुढच्या पंखांच्या वरच्या बाजूस मध्यावरच दोन काळे मोठे ठिपके असतात. त्यामुळे संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या पंखावरती असलेले काळ्या रंगाचे पट्टे त्याच्या देखणेपणात भर घालतात. फुलपाखराचे जीवनचक्र अंडी, अळी, सुरवंट आणि प्रौढत्व तसेच मृत्यू यापुरते मर्यादित असले तरी ते अल्पायुष्यात पर्यावरणीय परिसंस्थेत आपल्यापरीने योगदान देतअसते, ज्याची दखल मानवी समाज अभावानेच घेत असतो. या फुलपाखराच्या सुरवंटाला विशिष्ट प्रकारच्या वेलवर्गिय वनस्पतीच्या पानांची खाद्यान्न म्हणून गरज असते. त्यामुळे मलाबार ट्री निम्फ फुलपाखराची मादी ज्या जंगलाल नागलकुडा, शेंडवेल, हरणदोडी (बहुपर्णी) सारख्या वनस्पती असतात तेथील हिरव्यागार पानावर आपली अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर आल्यावर तिचा विकास सुरू होतो. या अवस्थेत सुरवंट नागलकुड्यासारख्या वनस्पतीच्या पानांचा फडशा पाडतो. यावेळी आपली कात टाकून सुरवंट प्रौढ अवस्थेन जाताना अंड्याच्या आकारापेक्षा असंख्य पटीने वाढत जातो. त्यातूनच सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरात होते. यावेळी त्यांचे पंख विस्तारत मजबूत होतात व त्यामुळेच हवेंत उड्डाण करतेवेळी त्याला मदत होते. फुलपाखरे हवेत विहार करताना आपल्या नर किंवा मादीचा शोध घेण्यास सिद्ध होतात. आपल्याला लाभलेल्या सहा पायांच्या सहाय्याने फलपाखरू आपल्या अन्नाची चव घेत असते.

पुष्कळ जातीच्या नर फुलपाखरांमध्ये गंध- खवले असतात. त्यांच्याशी संलग्न असलेल्या गंधग्रंथींतून जेव्हा कामगंध स्रवतात तेव्हा मादी नराकडे आकर्षित होते. फुलपाखरांना समोर ज्या मिशा असतात, त्यांच्या आधारे ती वास घेतात तर पायाने चव ओळखतात. मलाबार ट्री निम्फ या फुलपाखराचे सुरवंट प्रामुख्याने नागलकुड्याच्या पानांचे भक्षण करत असल्याने, या पानांच्या चिकामधली सारी द्रव्ये त्यांच्या अंगात भिनतात. सुरवंटाच्या शरीरात विषारी घटक असल्याकारणाने, पक्षी आणि अन्य भक्षक अशा सुरवंटांच्या वाटेला जात नाहीत. शरीर विषारी घटकांनी युक्त करून निसर्गाने खरंतर या फुलपाखराला एका प्रकारचे सुरक्षा कवचच प्रदान केलेले आहे. त्यामुळे बऱ्याचदा या सुरवंटाचे रूपांतर मलाबार ट्री निम्फ फुलपाखराला विनासायास होत असते. केरळ राज्यातल्या समाविष्ट होणाऱ्या मलाबार प्रांतातल्या सदाहरित आणि निम्न सदाहरित जंगलात वसलेल्या रानटी जायफळ आदी वनस्पतींनी समृद्ध असलेल्या दलदलीत ही फुलपाखरें निवांतपणे विहार करत असलेली दृष्टीस पडत असल्याने या फुलपाखराच्या नावाला मलाबार हा शब्द जोडला गेला.

गोव्यातल्या सत्तरी तालुक्यात म्हादई अभयारण्यात बऱ्याचदा नगरगाव पंचायत क्षेत्रातल्या माळोलीतल्या निरंकाराच्या राईमध्ये या फुलपाखराचे सकाळ, संध्याकाळ दर्शन व्हायचे. या देवराईत इंग्रजीतल्या यु अक्षराच्या उलट आकाराची मुळे असलेल्या वनस्पतींत आणि बारमाही वाहाणाऱ्या ओहळ आणि झऱ्यांच्या सान्निध्यांत हे फुलपाखरू विहार करताना पहायला मिळायचे. आज लोकवस्तीपासून काहीशा दूर असलेल्या ब्रम्हाकरमळी येथील आजोबाची तळी या देवराईत त्याच प्रमाणे बिबट्यान येथील दलदलीच्या जंगलात तिन्ही ऋतूंत मलाबार ट्री निम्फ फुलपाखराचे दर्शन घडते. सांगे तालुक्यातल्या भाटी गावातल्या बाराजण, सूर्यागाळ आणि तळावली डोंगरावर आसलेल्या मायरिस्टिका वनस्पतीच्या जंगलात हे फुलपाखरू आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलींत विहार करताना पहायला मिळते. नेत्रावळी अभयारण्यातल्या सावरी धबधब्याकडे जाताना दुपारच्या वेळेला या फुलपाखराचा प्रेक्षणीय विहार अनुभवायला मिळलो. काणकोणमधल्या खोलीगाव अभ्यारण्यात त्याचप्रमाणे धारबांदोड्यातल्या महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानाच्या पाणथळीने युक्त जंगलात या फुलपाखराचा अधिवास पहायला मिळतो. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या मोजक्याच जंगलात या फुलपाखराचा संचार असल्याचे संशोधकाचे मत होते. हल्ली दोडामार्ग तालुक्याला हेवाळेतल्या मायरिस्टिका जंगलात त्याचा अधिवास उजेडात आलेला आहे. गोव्याच्या जैविक संपदेतले हे देखणे फुलपाखरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT