Mulayam Singh Yadav Dainik Gomantak
ब्लॉग

Mulayam Singh Yadav: राजकीय आखाड्यातील मुरब्बी!

Mulayam Singh Yadav: उत्तर प्रदेशच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व

दैनिक गोमन्तक

Mulayam Singh Yadav: कोणे एके काळी कुस्तीचे मैदान मारणाऱ्या मुलायमसिंह यादव नावाच्या युवकास समाजवादी विचारवंत डॉ. राममनोहर लोहिया यांनी थेट राजकारणाच्या मैदानात उतरवले आणि 1967 मध्ये तो थेट उत्तर प्रदेश विधानसभेत जाऊन पोचला! त्यानंतर मुलायमसिंह पुढची किमान पाच दशके उत्तर प्रदेशच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून सतत चर्चेत राहिले.

मुरब्बी राजकारणी, आघाड्यांचे राजकारण करण्यात निष्णात अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. विश्वनाथप्रताप सिंह राजीव गांधी यांच्यावर मात करून पंतप्रधान झाले आणि त्यांनी सरकारी फायलींमध्ये बंद असलेल्या मंडल आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला. तेव्हापासून देशातील राजकारण ‘ओबीसी’केंद्रित होऊन गेले.

जाती-पातींचा कमालीचा बुजबुजाट असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील आणीबाणीत काँग्रेसविरोधात लढा देणारे युवक नेते मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव तसेच नितीश कुमार आदींना नंतरच्या काळात कमालीचे महत्त्व आले. त्यांनी देशाच्या राजकारणावरही ठसा उमटवला. जातीपातीवर आधारित मतपेट्यांचे राजकारण करणाऱ्या उत्तर भारतातील या राज्यातील ओबीसींना या घटनांमुळे आत्मभान आले, हेही वास्तव आहे.

मुलायमसिंहांवर महाविद्यालयीन जीवनापासूनच डॉ. लोहिया यांच्या समाजवादी तसेच काँग्रेसविरोधी विचारधारेचा पगडा होता. आणीबाणीतील 18 महिन्यांच्या कारावासामुळे त्यांच्या प्रतिमेला वेगळा बाज प्राप्त झाला. 1977 मध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधींचे सरकार कोसळले, तेव्हा स्थापन झालेल्या जनता पक्षात मुलायमसिंह असणे स्वाभाविक होते.

त्यानंतर वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात जनता पक्षाचे सरकार आले आणि मुलायमसिंह मंत्री झाले. सहकार खात्याला नवी दिशा देताना, सहकारी संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय त्यानंतरच्या त्यांच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरला.

एवढेच नाही तर त्यातून उत्तर प्रदेशात उभ्या राहिलेल्या काँग्रेसविरोधी नेपथ्याचे ते ‘हिरो’ बनले. याच ओबीसी राजकारणाच्या जोरावर मुलायमसिंहांनी तीन वेळा देशातील उत्तर प्रदेशसारख्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान पटकावला.

1980च्या दशकात संघपरिवाराने सुरू केलेल्या रामजन्मभूमी आंदोलनामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला ओहोटी लागली तेव्हा तर या राज्याचे नेते म्हणून मुलायमसिंह आणि मायावती अशी दोनच नावे देशभरात दुमदुमत होती. मात्र, 1992 मध्ये जनता दलातून बाहेर पडून त्यांनी ‘समाजवादी पक्षा’ची स्थापना केली; तेव्हापासून त्यांचे राजकारण (OBC) ओबीसींमधील केवळ यादव जातसमूहाभोवती भिरभिरत राहिले.

मात्र, याच राम मंदिर आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री असताना, कारसेवकांवर झालेला गोळीबार त्यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्वविरोधी नेता अशी झाली. या गोळीबाराचे ते अखेरपर्यंत समर्थन करत राहिले. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजही मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मग हिंदुत्ववाद्यांनी त्यांना ‘मुल्ला मुलायम’ अशी ‘पदवी’च बहाल करून टाकली! मुलायमसिंहांचे नाव देशाच्या राजकारणात संरक्षणमंत्री म्हणून तर नोंदले गेले आहेच.

शिवाय, एका राजकीय खेळीमुळे थेट सोनिया गांधी यांचे पंतप्रधानपद हुकविण्याचे काम करणारा नेता म्हणूनही त्यांची इतिहासात नोंद झाली. अटलबिहारी वाजपेयी यांचे १९९८ मध्ये आलेले सरकार तेरा महिन्यांनंतर लोकसभेत अवघ्या एका मताने कोसळले, तेव्हा सोनियांनी सरकार बनवण्याचा दावा मोठ्या आत्मविश्वासाने केला होता. मात्र, अखेरच्या क्षणी मुलायमसिंहांनी त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला.

मुलायमसिंहांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत नंतर अनेक तडजोडीही केल्या आणि थेट मायावतींसोबत सरकारही स्थापन केले. अखिलेश या आपल्या पुत्राविरोधातही त्यांनी थेट निवडणूक आयोगात लढा दिला आणि कोणतीही निवडणूक न हारणारा हा नेता त्या लढाईत मात्र पराभूत झाला. आयुष्यभर काँग्रेसविरोधी राजकारण करणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT