Blog | Kalyanilya Resha
Blog | Kalyanilya Resha Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: रंग-रेषा अन् शब्दांचे आर्त- 'काळ्या निळ्या रेषा'

दैनिक गोमन्तक

Blog: दसऱ्यांच्या देखाव्यात मुसलमान सिकंदर चाचा हनुमानची भूमिका करायचे. शेंदूर चोपडून, रामसीतेच्या पात्रांसमोर हात जोडून बसायचे. अगदी निश्‍चल. त्यांचा धर्म कोणता हा प्रश्‍न ना कधी त्यांच्या मनात यायचा, ना गावकऱ्यांच्या.

वंचित/दलित वर्गाची अनेक आत्मकथनं, वाचकांच्या वाचण्यात यापूर्वी ही आली आहेत. त्यातील अनुभव, दशा, सत्यता, स्थिती यापायी समाजाला, ज्वलंत समस्येचे दर्शन झाले. अक्करमाशी (शरणकुमार निंबाळे, आठवणीचे सोनपक्षी (प्र. ई. सोनकाबळे), काट्यावरची पोट (उत्तम बंडू तुपे), बलुतं (दया पवार), मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (माधव कोंडविलकर), आयदान (उर्मिला पवार) माज्या जल्माची चित्तरकथा (शांताबाई कृष्णाजी कांबळे), मरणकळा (जनाबाई गिऱ्हे), ही व अशी अनेक इतरही...

आत्मचरित्र लेखन हे, ‘मी’ मधून स्फुरण पावते आणि ‘मी’ भोवतीच केंद्रित होते. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्च-नीच भेद ठरवण्याच्या रूढी यांचा बीमोड करायला उठलेली ही आत्मकथनं फक्त माणुसकीला मानतात. वंचितता ही निसर्गापेक्षा, मनुष्यनिर्मित अधिक असते, जुन्या-पुराण्या धारणा, अशिक्षिकत्व, गरीबी, अत्याचार, उपेक्षा ह्यांच्या बळी ठरलेला हा ‘वंचित वर्ग’- ‘नकार’, ‘विद्रोह’ व ‘संघर्ष’ त्याच्या पायावर उभा असल्याने, त्या समाजाकडून लिहिले गेलेले साहित्य मूलत:, आत्मशोध-आत्मबोधाचे असते. त्यात तीव्र आत्मस्वर असो ओघानेच येते. हे साहित्य परदुःख केंद्री नाही.

लेखक राजू बाविस्करांचं ‘काळ्या-निळ्या रेषा’ हे आत्मकथनही उपरोक्त वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे. मुळात, बाविस्कर हे चित्रकार. आपल्या वाट्याला आलेले गावकुसा-बाहेरचे उपक्षेचे जगणे आणि झगडने, समंजसपणे उलगडत, ते वाचकांना, चित्रांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत घेऊन जातात. त्यांची चित्रशैली खूप संयतपणे आपली वेदना मांडते. नेमके संदर्भ आणि बारकावे घेत, आपल्यापुढे दृश्य उभे करते.

तुटक रेषा सांधत, आपल्यापुढे सधन अनुभव उभा करते त्यांच्या चित्रांचा आणि आत्मकथनाचा थेट संबंध आहे. कुठल्याही अभिनिवेशा शिवाय, प्रांजळपणे मांडलेले हे कथन, वाचकाला उभे-आडवे झोडपून काढते. हे झोडपणे, वाचकांना पडलेल्या प्रभांचे असते, विदीर्ण करणाऱ्या वास्तवाच्या झंझावाताच्या तडाख्यांचे असते, समाजाच्या दशमिक दर्शनाचे असते व शेवटी, इतके सगळे पचवून त्यातून ताठपणे मार्ग काढणाऱ्या बाविस्करांच्या समजत असते.

सर्व काही असह्य झाल्यावर, बाविस्करांनी हातात लेखणी धरली व दीर्घकाळ मनात रुतून बसलेले अनुभव, त्यांची बोच, त्यांचे सल, झंझावाताच्या रुपात कागदावर प्रकटले. जशा त्यांच्या चित्रातल्या रेषा, दुःखाचे पीठ पडून काळ्या-निळ्या झालेल्या आहेत, त्याचप्रमाणे आत्मकथनातील कागदावर उमटलेली अक्षर मानवमुक्ती करता टाही फोडणारी आहेत. या आत्मकथेतली प्रकरणे म्हणजे लहानलहान व्यक्तिचित्रे म्हणावी लागतील.

नेमून दिलेल्या गल्ल्यांमधून दोन वेळची भाकरी मागायची व त्या बदल्यात, गावातली मेलेली गुरेढोरे ओढून न्यायची, फाडून कातडं विकायचं व त्याच्या मासांवर गुजरान करायची. टोपल्या-हारे विणून, प्रपंचाला हातभार लावायचा, असे जीवन होते त्यांचं. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं. मांग समाजाचं, लहान वयातली लग्नं, भरपूर मुलं, औषधाविना त्यांचे अगणित मृत्यू, निरक्षरतेमुळे येणारी बेकारी व कायम मानगुटीवर बसलेली गरिबी.

हे सर्व सहन करत, पाहात बाविस्कर मोठे झाले. त्यात या समाजाला कायम वागवावे लागलेलं चोरपणाचे बिरुद! गावात कुठेही, काहीही चोरीला गेलं तरी संशय मांगावरच यायचा. मग पोलिसांचा दणकावून मार चुकायचाच नाही. परंतु अत्यंत निरागस मनाची ही जमात होती. अगदी गावकऱ्यांच्या निरागस मनाइतकीच निरागस. दसऱ्यांच्या देखाव्यांमधे, मुसलमान सिकंदरचाचा, हनुमानची भूमिका करायचे.

सहा-सात तासांच्या मिरवणुकीमध्ये शेंदूर चोपडून, हनुमान बनून, शेपटी बिपटी लावून, बनून, रामसीतेच्या पात्रांसमोर हात जोडून बसायचे. अगदी निश्‍चल. त्यांचा धर्म कोणता आणि ते कसे काय अंगाला शेंदूर लावून हनुमान होतात, हा प्रश्न ना कधी त्यांच्या मनात यायचा, ना गावकऱ्यांच्या मनांत! या सर्वांतून बाहेर यायच्या धडपडीत बाविस्करांना मदत केली ती त्यांच्या सुशिक्षित भावाने, क्लॅरिनेट वाजवण्याच्या छंदा ने व चित्रकलेने.

भाऊ त्यांच्याकरता रोल मॉडेलच होता. ढोरं फाडण्याच्या व भाकरी मागण्याच्या उद्योगांबरोबर त्याने अत्यंत कष्टाने शिक्षण घेतले. त्यांच्या समाजातला तो पहिला बी. ए. बी.एड. होता. मग अनेक वर्षे त्याने शिक्षकाची नोकरीही केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून बाविस्करांनीही अखंड शिक्षण घेतले. ऐकून ऐकून व सराव करून करून क्लॅरिनेट शिकले. बॅण्डमध्ये वाजवून चार पैसे कमवू लागले. शेवटी स्वतःचा बॅण्ड विकत घेतला.

भिंतीवर मोठमोठी पोस्टर्स, साईड बॅनर्स रंगवू लागले. चित्र काढून, त्याची तीन प्रदर्शने देखील झाली व अचानक त्यांना ही आयुष्याची सफर लिहून काढण्याची उर्मी आली. ‘युगवाणी’च्या अंकातून ही कहाणी जशीच्या तशी प्रकाशित होत राहिली. अत्यंत प्रगल्भ भाषा, वेदनेचा डंख असलेले अनुभव, कसलाही अभिनिवेश नसणारे प्राजंल आत्मकथन- ह्या वैशिष्ट्यांपायी हे लिखाण अल्पावधीत लोकप्रिय झाले.

या सर्व विकासात बाविस्करांना व त्यांच्या भावाला मोलाची साथ दिलेली गोष्ट म्हणाले ‘व्यसनांच्या तिरस्कारानं’. नाहीतर, जुगार-पत्ते- दारू या व्यसनांमध्ये तळापर्यंत बुडालेला हा समाज, त्यांना काठावर कोरडं राहू देणार होता थोडाच! परंतु दोन्ही भावांना, वडिलांनी दारू पिऊन घातलेले धिंगाणे, वाद लक्षात होते. कधीही ते दोघं सुपारीच्या खांडाच्या वाटेला सुद्धा गेले नाहीत.

आत्मकथनातील जवळ-जवळ सर्वच संवाद, बाविस्करांच्या बोलीभाषेत लिहिले आहेत. ते शब्दश: जरी कळले नाहीत तरी गोळाबेरीज अर्थ सगळीकडे कळतो. त्यांत बाविस्करांची भाषाही हृदयाला हात घालणारी आहेत. चित्रमय वर्णनं आहेत. डोळ्यासमोर दृष्यं उभी करण्याची शक्ती त्या भाषेत आहे. त्यांच्या आयुष्याला वेढून राहिलेली ही व्यक्तिचित्रं, त्यांच्या प्रत्येक चित्रात नजरेस पडतात.

केवळ व्यक्तीच नव्हे तर निसर्ग, गाव, व्यक्ती, वस्तू, गुरेढुरे, परिसरे सर्व काही चित्रात दिसतं. ह्या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणावर एक - एक रेखाचित्र आहे. लहानसहान वस्तूसुद्धा नजाकतीने रेखाटली आहे. आज लेखक शाळेत शिक्षक आहे. अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठावर त्यांची चित्रे घेतली जातात.

दिल्लीच्या ललितकला अकादमीने त्यांच्या चित्रांचे मूल्य ओळखून, बासष्टाव्या कला प्रदर्शन त्यांचा चित्रांचा समावेश केला आहे. संघर्षाचा विश्‍वसनीय दस्तवेज असं त्या आत्मचरित्राचं वर्णन नक्कीच करता येईल. राजहंसच्या मुकुटातला मानाचा तुरा ठरेल हे आत्मचरित्र ह्यांत काहीच शंका नाहीं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT