Dabolim Airport : येत्या दिवाळीत दाबोळी विमानतळाचेच उड्डाण; गोव्यावर काय परिणाम?

दाबोळीतील विमानतळ संपूर्णपणे मोपाला हलवण्याचा विचार सुरू आहे. कदाचित या दिवाळीत हा धमाका होईल. असे झाल्यास कुठे कुठे, काय काय परिणाम होतील, याचे हे विहंगम अवलोकन.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

गोमंतकीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी किंवा डोळे पांढरे करणारी धमाकेदार घटना या दिवाळीत घडण्याची शक्यता आहे, ती म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण दाबोळी विमानतळ मोपाला हलवला जाणार आहे. मदालसा, मादक पदार्थांचे व्यापारी आणि अर्थव्यवस्थेची चाके वेगळ्या अर्थाने फिरवणाऱ्यांच्यासाठी एक वेळ ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशा पद्धतीने वागल्यास परवडेल. पण, आपले भविष्य सावरण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयाने रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. समजा, दाबोळी विमानतळाच्या भूभागाचा लचका तोडून मोपात खरोखरच चिकटवला, तर काय होईल? आपण याचा सकारात्मकच विचार करू.

‘सर्वाधिक फायदा’

दाबोळीचे विमानतळ मोपा येथे हलवल्यास त्याचा सर्वाधिक फायदा गोमंतकीय आंदोलनांचे बौद्धिक आश्रयस्थान असलेल्या सासष्टीला आणि वैचारिक दिवाळखोरीत गेलेल्या गोव्यातील सर्वांत भ्रष्ट राजकारण्यांच्या उरावर बसलेल्यांचा होईल. हो! ‘सर्वाधिक फायदा’, आपण बरोबर वाचले आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे बांधकाम व्यावसायिक व हॉटेलवाले उत्तरेकडे झेपावल्यामुळे सासष्टीतील गगनाला भिडलेले जमिनींचे भाव झपाट्याने खाली येतील. संपूर्ण दक्षिण भाग, त्यातल्या त्यात सांगे, केपे, काणकोण येथील निसर्गरम्य प्रदेश या टोळभैरवांच्या तावडीतून सुटेल. गावे ही गावेच राहतील आणि शहरांचा पसारा कमीत कमी होईल.

धनदांडगे, गुंड-पुंड ठणठणपाळ होतील आणि ‘उडदामाजी काळे-गोरे’ निवडण्याऐवजी चांगले उमेदवार निवडून देण्याची संधी आमच्या नशिबी येईल. थोडा काळ आर्थिक अशांतता, उलथापालथ होईल, पण चिरकाल स्थैर्य लाभेल.

युरोपातील साहेबलोक, विशेषत: फ्रान्स, स्पॅनिश व इटालियन हे विश्रांतीचे आल्हाददायक क्षण अनुभवण्यासाठी उष्ण कटिबंधाकडे मैलोनमैल चालतात. दक्षिण गोवा याप्रमाणेच प्रदूषणरहीत व स्वच्छ झाल्यास उत्तर गोव्यातील लोक चालत येथे हवापालट करण्यासाठी अगत्याने येतील.

कदाचित तळबदलाची ही टूम पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्र्यांप्रमाणे अचानक उगवणाऱ्या ‘गोवा बचाव’ अशा एखाद्या भूछत्री आंदोलनासारखीही असेल कदाचित. असेना का, या नामी संधीचा लाभ घ्या. पुन्हा नव्याने जगण्याची संधी आहे. नव्याने जगा, शांत आणि समाधानी व्हा. संकटे ही कायम संकटेच नसतात, संधीही असते.

Dabolim Airport
Goa Kala Academy : घोटाळा नाहीच; कला अकादमीचे काम ‘क्लिन’

सिंधुदुर्ग पट्टा

‘मोपा’ विमानतळाचा सर्वांत मोठा फायदा सिंधुदुर्ग पट्ट्याला होणार आहे’ हे कोणत्याही बढाईखोर, मंदबुद्धी व्यक्तीसाठी तर्कसंगतच आहे. ‘कोकणची माणसे साधी भोळी’ याचे प्रत्यंतर मला सिंधुदुर्ग आणि ग्रामीण भागात आले आहे. पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत वाढलेली कदाचित ही जगातली शेवटची जमात असावी. पण त्यांचा हा नैसर्गिक साधेपणाच त्यांच्या विनाशाचे कारण बनेल.

गोव्याला देशोधडीला लावायला निघालेल्यांनी, तिथे युक्रेनइतके क्षेत्रफळ असलेली जमीन अगोदरच आपल्या घशात घातली आहे. किनारपट्टीचे अनिर्बंध उल्लंघन, मादक पदार्थांची रेलचेल, कॅसिनोंचा चमचमाट होईल. कोकणचा असा कॅलिफोर्निया होईल. एक-दोन दशकांतच गोमंतकीयांप्रमाणे कोकणवासीयांचे रिकामे हातही त्यांच्या कपाळी असतील. आपल्या भूमीतच परके होण्याचा करंटेपणा क्षणिक लोभापायी त्यांच्या नशिबी ते ओढवून घेतील. लोभाचा, स्वार्थाचा नरकासुर त्यांचे दिवाळे काढेल.

पणजी

भारतातील सर्वांत आकर्षक शहर, असे जरी म्हटले जात असले तरी मला येथे येताना किंवा येथून जाताना मळमळते. माझा एक मित्र तर म्हणतो की, मला गाडी लागण्याचा आजार माझ्या प्रवासात कायमस्वरूपी सोबती होईल. सगळा झोत त्या दिशेने वळल्यामुळे कदाचित येथील कॅसिनोही तिकडे नांगरले जातील. राजधानीचे ठिकाण म्हणून एखाद-दुसरा उरेल. पण येथील कॅसिनो कमी करण्याची ही नामी संधी आहे. कॅसिनोंच्या आकर्षक जाहिराती सौंदर्याने मुसमुसलेल्या अर्धनग्न युवतीसारख्या असतात. त्या जे दाखवतात ते आकर्षक असते आणि लपवतात ते महत्त्वाचे असते. हे सगळे देखावे आणि लपंडाव मोपाच्या खेळपट्टीवर रंगतील. यातून पणजी आणि आम्ही निश्‍चितच वाचू.

साहित्य, कला आणि वास्तुकलेचे पुनर्वैभव पणजीला प्राप्त होईल. जागतिक दर्जाचे संग्रहालयही येथे उभारले जाऊ शकते. आपल्याला पुन्हा मोकळा श्वास घेता येईल.

हे सर्व रम्य असले तरी पंख असलेल्या कल्पनेतल्या घोड्यासारखे आहे. घोडा ही कल्पना आणि उडणे हीसुद्धा कल्पनाच.

कळंगुट-कांदोळी-हणजूण पट्टा

विमानतळ दाबोळीतून मोपाला हलवले तरी कळंगुट-कांदोळी-हणजूण या पट्ट्याला काहीच फरक पडणार नाही. स्वत:चे लज्जारक्षण करू शकत नाही, इतका हा पट्टा आधीच खाली घसरला आहे. पतनाची परिसीमा आधीच गाठून झाली आहे. त्याहून खाली जायला आणखी वाव नाही. नरकासुराच्या या राजधानीला मुक्त करावे, असे भगवान श्रीकृष्णालाही वाटणार नाही. वस्त्रहरण होऊ नये, लज्जा रक्षण व्हावे म्हणून द्रौपदीने कृष्णाचा धावा केला होता. इथे द्रौपदीच कौरवांसमोर वस्त्र फेडते, तर भाऊ असलेला तो बिचारा कृष्ण तरी स्वत:चेच डोळे फोडून घेण्याव्यतिरिक्त काय करेल? मोपामुळे होणारे सगळे संभाव्य परिणाम येथे आधीच सुखेनैव नांदत आहेत.

रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी खरोखर लढणारे जागरूक नागरिक, काँग्रेस-भाजप युती करून लुटुपुटुची लढाई करणारे राजकारणी याशिवाय इतर सर्व गोमंतकीयांनो, आपले सीट बेल्ट घट्ट बांधा, धावपट्टीवर हळूहळू गती वाढवत चाललेल्या विमानाच्या इंजिनाचा आवाज ऐका, लवकरच हवेत उड्डाण करणाऱ्या या विमानातील अद्वितीय प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या. या विमानाचे लॅण्डिंगही सुरक्षित व सुखद असेल कदाचित!

डॉ. ऑस्कर रिबेलो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com