Goa Taxi App : स्‍वतंत्र ॲपधारित टॅक्‍सीसेवेला गोमंतकीय स्वीकारणार का?

पर्यटकांना हाताळणारा टॅक्‍सी हा महत्त्वाचा घटक. सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील मर्यादांमुळे बहुतांश पर्यटकांची प्रामुख्‍याने त्‍यावरच भिस्‍त! परंतु इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍यात टॅक्‍सीसेवा महागडी आहे.
Goa App Taxi Issue
Goa App Taxi IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi App : काळानुरूप बदल हे स्‍वीकारावेच लागतात. त्‍याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ हा सिद्धांतही विविध कसोट्यांवर त्‍याचीच आठवण करून देतो. वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो आणि पर्यायाने राज्‍य सरकारने गोव्‍यात स्‍वतंत्र ॲपधारित टॅक्‍सीसेवा सुरू करण्‍याचा चंग बांधला आहे. त्‍याचे समस्‍त गोमंतकीयांनी खुल्‍या दिलाने स्‍वागत करायला हवे. दुसरीकडे काळ्या-पिवळ्या व पर्यटक टॅक्‍सी व्‍यावसायिकांनी विरोधी भूमिकेतून आंदोलनाचा शड्डू ठोकल्‍याने उपरोक्‍त विषय सरकारला अत्‍यंत कुशलतेने हाताळावा लागणार, हेदेखील नक्‍की! गोव्‍यात वर्षभर मोठ्या प्रमाणात देशी तसेच विदेशी पर्यटक दाखल होतात. हा आकडा 65 लाखांच्‍या आसपास जातो. प्रशासकीय यंत्रणेची तशी आकडेवारी असली तरी प्रत्‍यक्षात ही संख्‍या कोटीच्‍याही पुढे जातेय. मंदी असो अथवा महागाई, वर्षागणिक पर्यटकांची संख्‍या वाढतच आहे. ‘मोपा’मुळे त्‍यात आणखीनच भर पडणार आहे.

पर्यटकांना हाताळणारा टॅक्‍सी हा महत्त्वाचा घटक. सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील मर्यादांमुळे बहुतांश पर्यटकांची प्रामुख्‍याने त्‍यावरच भिस्‍त! परंतु इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍यात टॅक्‍सीसेवा महागडी आहे. माघारी परतणाऱ्या पर्यटकांकडून तशी खंतही व्‍यक्‍त होते. वास्‍तविक, ‘अतिथी देवो भव’ हा संस्‍कार इथेही दिसावा. येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना किफायतशीर दरात वाहतूक सेवा मिळालीच पाहिजे. त्‍यासाठी सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेत तरलता हवी. म्‍हणूनच सरकारचे ‘ॲपधारित टॅक्‍सीसेवा’ धोरण सर्वार्थाने महत्त्वाचे ठरावे. मूठभर घटक दुखावतील, मतपेटीवर विपरीत परिणाम होईल या भीतीपोटी विधायक धोरणात्‍मक निर्णय टाळायचे आणि बहुसंख्‍य जनांच्‍या हिताकडे दुर्लक्ष करायचे, अशीच भूमिका आजतागायत सत्तारूढ पक्ष घेत आले आहेत. टॅक्‍सीप्रश्‍‍नही त्‍यापैकीच एक. देशभरात मीटरद्वारे भाडे आकारण्‍याची पद्धत रूढ असताना गोवा त्‍याला अपवाद होता. पर्रीकर सरकारच्‍या कार्यकाळात टॅक्‍सींना मीटरसक्‍तीसाठी हालचाली सुरू झाल्‍या. तेव्‍हापासूनच विरोधाचे पालुपद सुरू आहे. अखेर उच्‍च न्‍यायालयाच्‍या बडग्यामुळे सरकारला ही प्रक्रिया मार्गी लावावी लागली. ‘टॅक्‍सींना मीटर’ ही बदलाची नांदी ठरलीय. अॅपधारित टॅक्‍सी त्‍याचा पुढील टप्‍पा ठरेल.

ऑगस्‍ट 2018 मध्‍ये ‘गोवा माईल्‍स’च्‍या रूपात गोव्‍यात प्रथमत: अॅपधारित टॅक्‍सीसेवा सुरू झाली. त्‍यानंतर पारंपरिक टॅक्‍सी व्‍यावसायिकांची नाराजी, हाणामारीचे प्रसंग सातत्‍याने उद्भवत राहिले. सुदैवाने ‘गोवा माईल्‍स’ला सरकारचे बळ लाभले. या सेवेला लोकं स्‍वीकारत आहेत. आता ‘दाबोळी’वरही ‘माईल्‍स’चा काउंटर खुला झालाय. महत्त्‍वाचे म्‍हणजे, ओला, उबेरला गोव्‍यात आणण्‍याचा विचार गोवा सरकारने सोडून दिलाय. हा निर्णय स्‍तुत्‍य असून, त्‍यातून वास्‍तवभान दिसते. उपरोक्‍त कंपन्‍यांच्‍या माथ्‍यावर कोट्यवधींची कर्जे आहेत. या कंपन्‍या देशातून कधीही गाशा गुंडाळू शकतात, अशी स्‍थिती आहे. ही पोकळी दूर करण्‍यासाठी वाहतूक व पर्यटन खात्‍यांच्‍या माध्‍यमातून सरकारी मालकीचे स्‍वतंत्र ‘गोवा टॅक्‍सी ॲप’ होऊ घातले आहे. डिसेंबरअखेरीस ते कार्यरत होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठीची तांत्रिक जबाबदारी ‘जीईएल’कडे सोपविण्‍यात आली आहे. सदर ॲपमध्‍ये सर्व टॅक्‍सीमालकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. तसे वाहतूक, पर्यटनमंत्र्यांनी आधीच स्‍पष्‍ट केले आहे. सहकार्यासाठी एक हात पुढे आला आहे, समोरून दुसऱ्या हाताची प्रतीक्षा आहे.

Goa App Taxi Issue
Dabolim Airport : येत्या दिवाळीत दाबोळी विमानतळाचेच उड्डाण; गोव्यावर काय परिणाम?

केरळ सरकारनेही ऑगस्‍ट महिन्‍यात ‘केरळ सवारी’ ही ऑनलाइन टॅक्सीसेवा सुरू केली आहे. ही देशातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची ऑनलाईन टॅक्सी सेवा आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना योग्य मोबदला मिळेल आणि प्रवाशांचेही हित जपले जाईल, अशा दुहेरी उद्देशातून केरळ सरकारने पुढाकार घेतला. ही टॅक्सीसेवा कामगार विभागाच्या आधिपत्याखाली मोटर कामगार कल्याण मंडळाद्वारे चालवली जाते. सुरुवातीला काही अडचणी जरूर आल्‍या. परंतु आता अपेक्षित प्रतिसाद मिळू लागला आहे. केरळात पाच लाखांहून अधिक ऑटोरिक्षा आणि लाखभर कॅब आहेत. स्मार्टफोन साक्षरता असल्याने योजना प्रभावीपणे चालेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. गोव्‍यातही ते शक्‍य आहे. केरळातील कित्ता गिरवत ‘गोवा माईल्‍स’नेही आपल्‍या ॲपवर रिक्षा, दुचाकी पायलट, बससेवा यांना स्‍थान देण्‍याचे ठरविले आहे. सरकारच्‍या ॲपवरही अशी सुविधा असल्‍यास त्‍याचा अन्‍य वाहतूकदारांनाही लाभ होऊ शकेल.

टॅक्‍सीचालकांची अनेकदा चालणारी मनमानी, पर्यटकांची पिळवणूक थांबविण्‍यासाठी ॲपआधारित टॅक्‍सीसेवा हा पर्याय अमलात आणावाच लागेल. परंतु, त्‍याचवेळी हजारो पारंपरिक टॅक्‍सी व्‍यावसायिकांचे कोणत्‍याही परिस्थिती नुकसान होणार नाही, याचीही खबरदारी सरकारला घ्‍यावी लागेल. या घटकांचा विरोध गृहीत धरूनच चर्चेतून मार्ग काढावा लागेल. टॅक्‍सीचालकांनी आजघडीला ‘आपला ॲपसेवेला विरोध आहे’, इतकेच म्‍हणणे मांडत ‘न भूतो न भविष्‍यती आंदोलन छेडू’, असा सरकारला इशारा दिला आहे. खरे तर विरोध नेमका का, याविषयी स्‍पष्‍टता आवश्‍‍यक आहे. तार्किक कसोटीवर ती कारणे टिकतात का नाही हे त्‍यातूनच सिद्ध होईल. एकीकडे ‘होय रे, नाही रे’ हा संघर्ष सुरू असला तरी गोमंतकीय हे सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेत सुधारणेच्‍याच बाजूने आहेत. वाहतूक कोंडी, इंधनाचे वाढते दर, पार्किंग समस्‍या तीव्र बनल्‍या असताना तरल, परवडणाऱ्या दरात ॲपबेस टॅक्‍सीसेवा मिळाल्‍यास ती कोण बरे नाकारेल?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com