Amphibians Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: अनिर्बंध वृक्षतोडीमुळे उभयचरांचे जीवन संकटात

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां. केरकर

गोव्यातले म्हादईचे खोरे शेजारच्या कर्नाटक त्याचप्रमाणे महाराष्ट्राशी संलग्न असून, पश्चिम घाट, प्रदेशातल्या या भूमीची जैवसंपदा वैविध्यपूर्ण आणि श्रीमंत आहे. गोवा आणि कर्नाटक-महाराष्ट्रातल्या सीमेवरती वसलेला पश्चिम घाट पक्षी, कृमी कीटक, सस्तन प्राणी, सरपटणारे आणि उभयचर प्राण्यांच्या विविध प्रजातींनी समृद्ध आहे.

उभयचर हे पाठीचा कणा असलेले जमिनीवर आलेले पहिले प्राणी असून त्यांची उत्क्रांती माशांच्या काही प्रजातींपासून झाल्यानंतर काही लाख वर्षांनी पृथ्वीचे हवामान कोरडे होत गेले जे उभयचरांना मानवले नाही.

कालांतराने जेव्हा त्यांच्यासाठी पोषक हवामान निर्माण झाले तेव्हा उभयचरांच्या सुमारे सात हजार जाती विकसित पावल्या. त्यातल्या सुमारे १७९ जाती पश्चिम घाटात आढळत असल्याची नोंद आहे.

फुफ्फुसातून आणि त्वचेतून श्वसन करून प्राणवायू मिळवणाऱ्या उभयचरांची त्वचा ओलसर असते. उभयचर हे प्राणी थंड रक्ताचे असल्याने तापमान कमी झाले तर त्यांना उष्णता वाढवायला सूर्याची गरज असते.

उभयचर प्राण्यांमध्ये गोव्यातल्या सह्याद्रीच्या जंगलात बेडूक, देवगांडूळ, भेक हे प्राणी आढळतात. उन्हाळी आणि पावसाळी हवामानात उभयचरांच्या विशेष हालचाली असतात. थंडीच्या दिवसात बहुतेक उभयचर दीर्घ निद्रेत जातात आणि पावसाळा हा उभयचरांचा विणीचा ऋतू असल्याने या काळात ते सक्रिय असतात.

बेडूक आणि भेक हे दिसायला सारखे असले तरी त्यांच्यात बराच फरक आहे. बेडकांपेक्षा भेकांना कोरडे हवामान लागते. तसेच त्यांच्या त्वचेवरती चामखिळीप्रमाणे छोटे गोळे असल्याने त्यांना ‘चामखिळी बेडूक’ म्हणूनही ओळखले जातात.

इंग्रजीत ‘टोड’ म्हणून परिचित असलेल्या या उभयचरांचे पर्यावरणीय संतुलनात सहभाग असून ते निरोगी परिसंस्थेचे निदर्शक आहेत. मान्सूनचा पाऊस हा बेडूक, भेक आणि देवगांडूळांसारख्या उभयचरांसाठी पोषक असा काळ असून त्यांच्या अस्तित्वाचे प्रकर्षाने दर्शन पावसात अनुभवायला मिळत असते.

मान्सूनच्या पावसाळ्याला सृष्टीचा खराखुरा किमयागार म्हटलेले आहे. त्याची प्रचिती गोव्यातल्या पश्चिम घाटातल्या जंगलात पाहायला मिळते. ग्रीष्म ऋतूतला असह्य उकाडा वृक्षवेलींबरोबर पशुपक्ष्यांना संत्रस्त करत असतो आणि त्यामुळे या समस्त सजीवमात्रांना मान्सूनच्या पावसाची विलक्षण प्रतीक्षा असते.

जेव्हा इथल्या पश्चिम घाटात मान्सूनच्या पावसाचे आगमन होते तेव्हा झपाट्याने परिवर्तन होते आणि त्याचे दर्शन घडते ते विविध प्राण्यांच्या एकंदर जीवनचक्रात.

मलाबारी वृक्षभेक हा प्रदेशनिष्ठ असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ अशा चार राज्यांतल्या पश्चिम घाटातल्या सधन जंगलात त्याचे दर्शन इथे होणाऱ्या मान्सूनच्या पावसाच्या आगमनाबरोबर होत असते.

आशियाई चामखिळी भेक या नावाने परिचित असलेल्या या भेकाचे जीवनचक्र प्राणी शास्त्रज्ञांसाठी एक कोडे ठरले होते. ब्रिटिश राजवटीत १८७६साली कर्नल बेडडोम यांच्या संग्रहाद्वारे गुंघर यांनी मलाबारी वृक्षभेकाची नोंद केली तेव्हा पश्चिम घाटातल्या सधन जंगलात उंच वृक्षाच्छादनात आढळणारा एकमेव भेकची प्रजाती असल्याचे मत रूढ होते.

१८७६नंतर जवळपास १०५ वर्षांपर्यंत प्राणी शास्त्रज्ञ संशोधकांत मलाबारी वृक्ष भेकासंदर्भाच्या अस्तित्वाची विशेष माहिती नव्हती. १९८०साली शास्त्रज्ञांना या भेकाचे दर्शन केरळच्या पश्चिम घाटात झाले.

भेकाच्या डोक्यावर प्रत्येकी दोन नासाछिद्रे, डोळे व कर्णपटल असतात. त्याच्या धडाला अग्रपादाची एक आणि पश्चपादाची एक अशा दोन जोड्या असतात. अग्रपादाला चार बोटे असून त्यांच्या टोकाशी गोल चकत्या असतात. पश्चपादाला पाच बोटे असून बोटांमध्ये अर्धविकसित पडदा असतो.

मलाबारी वृक्ष भेक जास्तकाळ ओलसर अशा वृक्षाच्छादनात आढळतो. प्रजननच्या वेळी तो पाण्यातच जातो. बहुतांश भेक निशाचर असून ते कीटकाहारी असतात. बेडकाप्रमाणे भेकांमध्ये ग्रीष्मनिष्क्रियता असते. त्याचप्रमाणे शीत निष्क्रियता असते. त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात भेक खऱ्या अर्धाने समाधी अवस्थेचा अनुभव घेत असतात.

नर भेक मादीपेक्षा खूपच लहान असतो. पावसाळ्यात नर भेक आपल्या कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात नर भेकांची एकमेकात भांडणे होतात आणि त्यात दुर्बल भेकाला आपली जीव गमवावा लागतो.

मलाबारी वृक्ष भेकाची अधिकृतरीत्या भेकाची नवी प्रजाती म्हणून १८७५साली नोंद झाल्यानंतर त्याच्या विषयीच्या जीवनचक्राची विशेष माहिती बराच काळ उपलब्ध नव्हती. १९८०साली सायलंट व्हेली राष्ट्रीय उद्यानात केरळ राज्यात एस. के. भट्टाचार्य यांना हा भेक आढळल्यानंतर त्यासंदर्भात त्याच्या अधिवासाची प्रजनन आणि भरणपोषणाचा वेध घेण्यास शास्त्रज्ञांनी सुरुवात केली.

प्राणीशास्त्रज्ञ गुरराजा यांना कर्नाटकातल्या शिवमोग्गा जिल्ह्यातल्या जक्कानागड्डे येथील जंगलात २००४साली मलाबारी वृक्ष भेकाचे दर्शन झाले आणि त्यानंतर त्यांना कर्नाटकातल्या अघनाशिनी, बेडती, काली आणि शरावती नदी खोऱ्यातल्या जंगलात मलाबारी वृक्ष भेकाचे दर्शन घडले.

या भेकाच्या जीवनचक्राची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून गुरुराजा यांनी नागरिक शास्त्रज्ञांचे साहाय्य घेऊन यशस्वीरीत्या प्रकल्प राबवला आणि त्यामुळे या भेकाविषयीच्या बऱ्याच अज्ञात पैलूंवरती प्रकाश पडला.

गोव्यातल्या धारबांदोडा तालुक्यातल्या महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानातल्या जंगलात मलाबारी वृक्ष भेकाची नोंद झालेली आहे. दूधसागर, रगाडा या नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जंगलाच्या वृक्षाच्छादनात या भेकाचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

सत्तरी तालुक्यात म्हदई आणि तिच्या असंख्य उपनद्यांनी तिच्या खोऱ्यातल्या जंगलाला पाण्याची उपलब्धता करून दिल्याने मलाबारी वृक्ष भेकाचे वास्तव्य सह्याद्रीच्या पट्ट्यात पाहायला मिळते. म्हादई अभयारण्य ही सत्तरीची शान असून डोंगर माथ्यावरती वसलेल्या सुर्ल गावात मलाबारी वृक्ष भेकाचा नैसर्गिक अधिवास असल्याचे प्रकाशात आलेले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरती जे जांभ्या दगडांनी समृद्ध आणि विस्तृत पठार लाभलेले आहे. तेथून तळवाच्या सड्यावरच्या जंगलातून सुर्ल नदीचा उगम होतो. या नदीशी चोर वेसचा संगम होऊन त्याचा प्रवाह सुर्ल गावातून कळसाशी एकरूप होतो.

इथल्या सदाहरित जंगलात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यावरती समाधी अवस्थेत असलेले भेक जणुकाही खडबडून जागे होतात. आणि प्रजननासाठी सिद्ध होतात. मलाबारी वृक्षभेक प्रदेशनिष्ठ असल्याने त्यांचा अधिवास पश्चिम घाटातल्या मोजक्याच जंगलात असतो.

आज विकासाच्या नावाखाली येऊ घातलेल्या प्रकल्पामुळे केल्या जाणाऱ्या जंगलतोडीमुळे त्यांच्या अस्तित्वावर संकटे आली आहेत.

चोर्ला, सुर्ल येथील सह्याद्रीच्या जंगलात कर्नाटक सरकारच्या कळसा, सुर्ल, हलतरा या नाल्यांना मलप्रभेत वळवून नेण्याच्या धरण प्रकल्पाची टांगती तलवार मलाबारी वृक्ष भेकावरती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT