Traditional Fishing: मासेमारी हंगाम बंद असल्यावर गोवेकरांच्या ताटात नेमकं काय असतं? जाणून घ्या पारंपरिक मासेमारीबद्दल

गोव्यात पिढ्यांपिढ्या मासेमारी व्यवसाय केला जात आहे. अनेकांच्या जीवनाचा आणि जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या मासळीच्या व्यवसायात पूर्वीपेक्षा अनेक बदल झाले आहेत.
Goa's Traditional Fishing
Goa's Traditional FishingDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा म्हटलं की बीच, पार्टी, धमाल हे समीकरण जणू आपल्याला पाठच झालंय. मात्र गोवा आणि मासे हे समीकरण खूप आधीपासूनच प्रत्येकाच्या मनावर कोरलं गेलंय. जिथे-जिथे समुद्र आहे तिथे मासेमारी केली जाते, त्याप्रमाणेच गोव्यातही पिढ्यांपिढ्या मासेमारी व्यवसाय केला जात आहे.

इथं आल्यावर जर तुम्ही कुणाला विचारलं की, ‘आज काय जेवलास?’ तर ‘शित नुस्ते’ हे उत्तर तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, नुसते म्हणजेच मासे. त्यामुळे गोवेकरांच्या ताटात मासळी असतेच. अनेकांच्या जीवनाचा आणि जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या मासळीच्या व्यवसायात पूर्वीपेक्षा अनेक बदल झाले आहेत.

Fish Thali in Goa
Fish Thali in GoaDainik Gomantak

आपलं राज्य जेव्हा एक सुंदर ग्रामीण भाग होतं तेव्हा फक्त पारंपरिक मासेमारी केली जात असे. यामध्ये रापणीची मासेमारी हा सर्वात जुना प्रकार. मात्र उत्क्रांती माणसाच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग असल्यानं गोव्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच घटकात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्यामुळेच गोवेकरांच्या दैनंदिन गोष्टींमध्येही कैक बदल घडून आले.

याचाच भाग म्हणजे पारंपरिक मासेमारीची जागा व्यावसायिक मासेमारीने व्यापून टाकली. व्यावसायिकता हा भाग पारंपरिक मासेमारीमध्येही होताच मात्र त्याचं स्वरूप मर्यादित होतं. गोव्यात रापणकरांचा (पारंपरिक मासेमार) खूप मोठा समुदाय आहे. पिढ्यांपिढ्या ते पारंपरिक पद्धतीची मासेमारी करत आले आहेत. घरातील पुरुष मंडळी समुद्रात जाळं टाकून मासेमारी करत आणि घरातील स्त्रिया ते मासे बाजारात जाऊन विकत असंत. हेच कोळी बांधवाचं उपजीविकेचं प्रमुख साधन.

आता आपलं राज्य फक्त भारताच्या नकाशापुरतंच मर्यादित न राहता इथल्या संस्कृतीनं परदेशातील मंडळींनाही भुरळ घातली आहे. त्यामुळे वर्षातून किमान 1-2 ट्रीप गोव्याला करायच्याच, असं ठरवणारे काही परदेशी पर्यटक माझ्या ओळखीचे आहेत. इथे येऊन इथल्या उत्कृष्ट गोवन पद्धतीच्या माशाची चव जर नाही चाखली तर गोव्यात येऊन काय उपयोग? अशी अनेकांची धारणा आहे.

मघापासून आपण माशांबद्दल बोलतोय, तर तुम्हाला हेही माहीत असेलच की साधारण 90 दिवस राज्यात मासेमारी बंद असते..हो पावसाळ्याच्या कालावधीत  60 ते 90 दिवस मासेमारी व्यवसाय बंद असतो. मग तुम्ही म्हणाल की बाजारात मासे कुठून येतात?

खरंतर गोव्यात पारंपरिक मासेमारी वर्षाच्या बाराही महीने सुरूच असते. फक्त मासेमारी हंगाम जेव्हा बंद असतो तेव्हा व्यावसायिक मासेमारी बंद असते. याकाळात ट्रॉलर्सना मासेमारी करण्याची परवानगी नसते. त्यामुळेच रापणकरांना याकाळात व्यवसाय करण्याची चांगली संधी असते.

Goa's Traditional Fishing
Goa's Traditional FishingDainik Gomantak

रापणीचे मासे.. गोव्यातील मासेमारीची सर्वात जुनी पद्धत

रापण ही गोव्यातील मासेमारीची सर्वात जुनी पद्धत आहे. किनारी भागात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कॅनोच्या मदतीने रापणीचे जाळे पसरवले जाते. ज्याची दोन्ही टोके बांबूला बांधलेली असतात.

त्यानंतर दोन्ही बाजूने समुद्रातून हे बांबू ओढत किनाऱ्यावर आणले जातात. यासाठी प्रचंड मेहनत आणि मनुष्यबळही लागतं. याशिवाय पारंपरिक मासेमारीत खुटावणी, माग, कांटाळी असे विविध प्रकारही आहेत. माशाप्रमाणे जाळे आणि पद्धत बदलते. गोव्याचा किनारा हा या परंपरेने समृद्ध आहेच, फक्त आता गरज आहे ती म्हणजे आपल्या राज्याची खरी ओळख असलेली ही परंपरागत पद्धत टिकवून ठेवण्याची.

-  विनय तारी, मडगाव

मासेमारी का बंद असते?

पावसाळ्याच्या कालावधीत माशांना अंडी घालण्यासाठी, प्रजननासाठी सर्वात पोषक कालावधी असतो. त्यांचं उत्पादन जास्तीत जास्त वाढावे यासाठी ठरावीक दिवस मासेमारी बंद ठेवली जाते. वर्षातील इतर महिन्यातही मासे अंडी घालतात पण, पावसाळ्याचा कालावधी त्यांच्या वाढीसाठी सर्वात आवश्यक काळ असतो.

-  महेंद्र पराडकर, पत्रकार

Goa's Traditional Fishing
Goa's Traditional FishingRohan Fernandes

मासेमारी हंगाम बंद असल्यावर गोवेकरांच्या ताटात काय असतं?

इथं वर्षाच्या बाराही महीने रोजच्या जेवणात किमान एकदा तरी मासळी असतेच अशी अनेक घरे आहेत. मग मासेमारी बंद असल्यावर ते मासे कसे खातात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला, की याकाळात पारंपरिक पद्धतीची मासेमारी कमी-अधिक प्रमाणात सुरूच असते. त्यामुळे बाजारात ताजे मासे असतात पण यावेळी सुकी मासळी जरा जास्त भाव खात असते.

मासेमारी हंगाम बंद होण्याआधी साधारण जानेवारी ते मे या कालावधीत सुक्या मासळीची तयारी सुरू होते. मासळी सुकवण्याचीही एक अनोखी पद्धत असते. याकाळात सुकवलेली मासळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असते.

उन्हाळ्यातील पुरूमेंत....

पावसाळ्याची तसेच पूर्ण वर्षभराची तयारी म्हणून गोव्यात जागोजागी पुरूमेंत फेस्त भरतात. पुरूमेंत म्हणजेच साठवणूक. पावसाळ्यात स्वयंपाकघरात लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरूमेंत फेस्तमध्ये मिळतात.

यामध्ये प्रामुख्याने सुकी मासळी, विविध प्रकारचे मसाले, मिरची, आमसूल, वाळवणाचे पदार्थ अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. हे पुरूमेंत फेस्त मे महिन्यात भरत असले तरी याची तयारी आधीच काही महिन्यांपासून सुरू असते.

पावसाळ्यात ताज्या मासळीचे प्रमाण कमी असल्याने गोवेकरांच्या ताटात दिमाखात बसलेली सुकी मासळी तुम्हाला नक्कीच दिसेल. त्यामुळे मत्स्यप्रेमी असलेल्या गोवेकरांना पर्याय म्हणून का होईना सुकी मासळी भाव खाऊन जातेच. पूर्ण पावसाळ्याची सोय ही सुकी मासळी भरून काढते आणि जेवणाची चवही वाढवते.

Purument Fest
Purument FestDainik Gomantak

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

रापणकार आणि बदलत्या तंत्रज्ञानाचं आव्हान...

रापणीच्या मासेमारीत प्रचंड मेहनत लागते. यामध्ये मासेमारी बांधव एकमेकांना मदत करत आपला पारंपरिक व्यवसाय करत आले आहेत. खरंतर सध्या व्यावसायिक मासेमारी वाढल्याने एक ट्रॉलर्स एका ट्रिपमध्ये जितके मासे पकडतात तितके मासे आम्ही रापणकार हे आमच्या पूर्ण मासेमारी हंगामात पकडतो.

हा आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असून, आधी माझे आजोबा हे काम करायचे, मग माझे बाबा आणि आता मी. मागील दहा वर्षांमध्ये मासेमारीचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात बदलून गेलंय. व्यावसायिक मासेमारी वाढल्यामुळे पारंपरिक मासेमारांना पकडण्यासाठी माशांचं प्रमाणच सध्या कमी झाल्याचं चित्र आहे. आमच्यासारख्या रापणकारांचं पोट हे या मासेमारीवरच अवलंबून असतं त्यामुळे सरकारने पारंपरिक मासेमारीकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे जितकं लक्ष व्यावसायिक मासेमारीकडे दिलं जातं.

-    जोकी मेंडस, नेरूळ मासेमारी संघटना प्रमुख

ही झाली विषयाची सखोलता. आता पुन्हा आपल्या मूळ मुद्याकडे येऊया. मंडळी याकाळात ताजी मासळी जरी तुलनेत कमी असली तरीही तुम्ही यावेळी गोव्यात येत असाल तर सुकी मासळीही तुमच्या स्वागतासाठी सज्ज असेलच!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com