Restaurant Dainik Gomantak
ब्लॉग

Restaurant: चवीचा वारसा जपणारे 'आंगण'

फोंतेनिहासचा शेवटचा भाग आणि भाटले जिथून सुरू होते अशा कोपऱ्यावर सुंदरशा जुन्या देखण्या घरात ‘आंगण’ सुरू झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मनस्विनी प्रभुणे-नायक

आपल्या आवडत्या गोष्टी आपल्याजवळ असाव्यात असे प्रत्येकाला वाटते आणि हे खाण्यापिण्याबाबतही वाटू शकते. अचानक एखाद्या दिवशी अमुकतमुक भागातल्या विशिष्ट पदार्थाची आठवण येते. पण आपण मुद्दाम तिथे तो पदार्थ खायला जाऊ शकत नाही.

वास्कोतल्या ‘अनंताश्रम’ या प्रसिद्ध रेस्टोरंटबद्दल कायम असे वाटायचे की हे पणजीत हवे होते. इथले असे कितीतरी पदार्थ आहेत की त्याची चव सतत आठवत राहते. पणजीत ‘आंगण’ नावाचे नवे रेस्टोरंट सुरू होतेय, असा परवा मोबाइलवर मेसेज आला.

पणजीत सध्या दर महिन्याला नवे रेस्टोरंट सुरू होतेय. त्यामुळे असेल काहीतरी म्हणून सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण मग ‘आंगण’ चे अतिशय वेधक असे व्हिडिओ समोर आले तेव्हा लक्षात आले की अरे हे तर संजय आणि विनोद शेट्ये यांचे ‘आंगण’ आहे.

या दोघा बंधूंची ओळख जुनी. सिनेमा - जाहिरात - वैद्यकीय असे कोणतेच क्षेत्र त्यांना वर्ज्य नाही. सगळ्या क्षेत्रात यशस्वी छाप त्यांनी सोडली आहे. रेस्टोरंट व्यवसाय हा तर त्यांचा पिढीजात व्यवसाय. संजय आणि विनोद यांचे वडील आणि काका यांनी १९६१ साली वास्कोमध्ये ‘अनंताश्रम’ सुरू केले.

वास्कोमध्ये गेल्यावर कुठे जेवायचे असा प्रश्‍न कधीच पडत नाही. पाय आपोआप ‘अनंताश्रम’कडे वळतात. आता शेट्ये बंधूंच्या ‘आंगण’च्या माध्यमातून तीच चव पणजीकरांना अनुभवायला मिळतेय.

नुकतेच पणजीत ‘आंगण’ सुरू झाले. फोंतेनिहासचा शेवटचा भाग आणि भाटले जिथून सुरू होते अशा कोपऱ्यावर सुंदरशा जुन्या देखण्या घरात ‘आंगण’ सुरू झाले आहे. अगदी पक्की खूण सांगायची झाली तर भाटले सुरू होताना सेंट फ्रान्सिस झेव्हिअर कपेल आहे, या कपेलच्या अगदी समोर ‘आंगण’ सुरू झालेय.

राजधानी ही सर्वांना खुणावते. गोव्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजणांनी इथे येऊन आपला व्यवसाय यशस्वी करून दाखवला. त्यात रेस्टोरंट व्यवसाय महत्त्वाचा. पणजीत ‘फिशकरी राइस’ थाळीला सर्वांत जास्त मागणी असते आणि अशा वातावरणात ‘आंगण’ची सुरुवात होणे हा खवय्यांसाठी शुभसंदेश म्हणावा लागेल.

वास्कोमधील ‘अनंताश्रम’चा करिष्मा इतका मोठा आहे की तिथे बाराही महिने खवय्यांची रेलचेल असते. ‘अनंताश्रम’ यशस्वी होण्यामागे तिथले खात्रीलायक पदार्थ, उत्तम चव हे सारे असले तरी शेट्ये बंधूंची प्रचंड मेहनत हेदेखील मुख्य कारण आहे.

ही सगळी भावंडे एकत्र मिळून ज्या पद्धतीने प्रत्येक व्यवसाय वाढवतात ते बघून या सर्वांनी अगदी योग्य वेळी पणजीत ‘आंगण’ सुरू केले असे वाटतेय. कोणतीही मोठी जाहिरातबाजी न करता सोशल मीडियातून, जवळच्या मित्रमंडळींना ‘आंगण’ सुरू होतेय, असा थेट संदेश पाठवला आणि नुसत्या या संदेशावरून अनेकांनी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला.

संजय, विनोद आणि बाकीची सर्व भावंडे आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करण्यात, प्रत्येकाशी संवाद साधण्यात व्यग्र होती. या गडबडीतदेखील त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. ‘पणजीतून मुद्दाम वास्कोला ‘अनंताश्रम’मध्ये येणारे अनेकजण आहेत.

पणजीत रेस्टोरंट कधी सुरू करताय? अशी विचारणा कायम व्हायची. या सगळ्यांकडून वारंवार होणाऱ्या मागणीतून ‘आंगण’ आकाराला आलं.’ असे संजय शेट्ये यांनी गप्पा मारताना सांगितले.

गोमंतकीय घरांची शैली बघता यात अंगणाला अतिशय महत्त्व आहे. गोमंतकीय स्वयंपाकघर आणि अंगण यांचे नाते छान रुजलेय. अंगणातील अनेक गोष्टी थेट स्वयंपाकघरात प्रवेश करतात.

गोमंतकीय घरांमध्ये शिजणाऱ्या चविष्ट पदार्थांचे रहस्य इथल्या अंगणात लपलेले असते, असेदेखील म्हणता येईल. लहानपणापासून घरातील अंगणाशी असलेले हृद्य असे नाते जपून ठेवता यावे म्हणून शेट्ये बंधूंनी आपल्या नव्या रेस्टोरंन्टला ‘आंगण’ असे नाव दिले.

गोव्यातील, विशेषतः इथल्या खाद्यसंस्कृतीची प्रतीके दर्शवणारी सजावट केली आहे. रेस्टोरंट देखणे व्हावे यासाठी शेट्ये बंधूंनी घेतलेले कष्ट तिथल्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात दिसून येतात. ‘आंगण’च्या सजवटीचे काम गेले वर्षभर चालू होते. कल्पक मन असणाऱ्या शेट्ये बंधूंनी वेगवेगळ्या कलाकारांच्या मदतीने इथली सजावट करून घेतली आहे.

घरात पूर्वी वापरले जाणारे जाते इथल्या भिंतीवर टांगलेले बघून जरा आश्चर्य वाटले. वजनाने एवढे जड असणारे जाते कसे काय भिंतीवर टांगले गेले असेल, असा प्रश्‍न पडला. पण हे जाते ‘फायबर’ पासून बनवलेले आहे.

तुम्हाला ते बघताना अजिबात वाटणार नाही की ते दगडाचे नाही. कलाकाराच्या कलेला दाद द्यायला हवी आणि फक्त जातेच नाही तर ताजेताजे छान भाजलेले ‘पाव’, ‘पोयी’, ‘काकणा’ या साऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या वाटतील अशा प्रतिकृतींनी इथल्या भिंती सजवल्या आहेत. पणजीत येणारे पर्यटक आणि त्यांची आवड बघता ‘आंगण’मध्ये त्यापद्धतीने मेन्यू तयार करण्यात आला आहे.

गोवा म्हटले की पर्यटकांना मासळी आणि फिश थाळी खाऊन बघण्यात उत्सुकता असते आणि इथल्या स्थानिक मंडळींनादेखील ‘नुस्तें’ हवेच असते. ही मागणी लक्षात घेऊन ‘आंगण’ मधील फिश करी राइस थाळी तयार करण्यात आली आहे.

प्रत्येक पदार्थाची चव, त्याचा दर्जा उत्तम असला पाहिजे याकडे शेट्ये बंधू स्वतः लक्ष घालत आहेत. पदार्थांची चव त्याच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये आणि वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांवर अवलंबून असते. इथे तर कटाक्षाने घरगुती मसालेच वापरले जातात. या घरगुती मसाल्यांशिवाय गोमंतकीय घरांमध्ये बनवल्या जाणाऱ्या तोंडीलावणे, डांगर यांना ती खास अशी चव येणार नाही.

‘आंगण’मध्ये गोमंतकीय खाद्यपदार्थ तर आहेच आणि गोमंतकीय पदार्थ बनवण्यातील यांचा हातखंडा सर्वांना माहीत आहे. इथले सर्व गोमंतकीय पदार्थ अप्रतिम आहेत. आम्ही अनंताश्रममध्ये गेल्यावर ‘कुल्ल्यांचे तोणाक’ खातोच. कुर्ल्यांचे तोंडीलावणे ही त्यांची खासियत आहे आणि म्हणूनच ‘आंगण’मध्ये देखील आम्ही मुद्दाम ‘कुल्ल्यांचे तोणाक’ आणि रोटी मागवली.

घरच्या मसाल्यामुळे या कुर्ल्यांच्या तोंडीलावण्याला आपल्याला म्हणजेच गोवेकरांना हवी तशी चव आहे. रात्रीची फिश करी थाळी घेणे आणि त्यातले सगळे पदार्थ संपवणे शक्य नव्हते. पण ‘फिशकरी’ थाळी खायला लवकरच जावे लागणार.

’आंगण’मधील मेन्यूमध्ये फ्युजन पदार्थांना एक वेगळे स्थान देण्यात आले आहे. कॉंटिनेंटल, उत्तर भारतीय, चायनीज आणि खास गोमंतकीय स्वयंपाकघरात तयार होणारे खास पदार्थ अशी भली मोठी यादी मेन्यूमध्ये दिसून येईल. हे सारे पदार्थ बनवण्यासाठी तसे अनुभवी शेफदेखील इथे आहेत. शेट्ये बंधूंच्या या ‘आंगणा’त घडीभर निवांत बसायला आणि चविष्ट पदार्थ खायला आता लवकर गेलेच पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT