स्मार्टफोन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शाओमी (Xiaomi) कंपनीने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात खळबळ माजवली आहे. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक सेडान 'Xiaomi SU7' चे नवीन अपडेटेड मॉडेल जागतिक बाजारपेठेत उतरवले आहे. ही केवळ एक कार नसून चालकांसाठी एक 'ड्रीम कार' ठरावी, या उद्देशाने तिची निर्मिती करण्यात आली आहे. वेगवान कामगिरी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा मेळ घालत शाओमीने प्रस्थापित प्रीमियम ब्रँड्सना थेट आव्हान दिले आहे.
व्हेरिएंट्स आणि किंमत Xiaomi SU7 प्रामुख्याने तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे – स्टँडर्ड (Standard), प्रो (Pro) आणि मॅक्स (Max). या कारची सुरुवातीची किंमत साधारणपणे २९ लाख रुपये (RMB 219,900) असून टॉप मॉडेल ४१ लाख रुपयांपर्यंत (RMB 303,900) जाते. मध्यमवर्गीय आणि प्रीमियम अशा दोन्ही ग्राहकांचा विचार करून या किमती ठरवण्यात आल्या आहेत.
लूक आणि डिझाइन या कारची लांबी ५ मीटर आणि रुंदी २ मीटर आहे, ज्यामुळे रस्त्यावर धावताना ती अत्यंत भव्य दिसते. कंपनीने यात 'वॉटरड्रॉप' हेडलाईट्स आणि अतिशय आकर्षक टेललाईट्स दिल्या आहेत. ग्राहकांना स्वतःच्या आवडीनुसार कार निवडता यावी यासाठी एकूण ९ रंग देण्यात आले आहेत, ज्यात कोस्टल ब्लू आणि ब्लेझिंग रेड यांसारख्या नवीन शेड्सचा समावेश आहे. कारची पुढची ग्रील आता अधिक स्पोर्टी करण्यात आली असून त्यात ४डी रडार (4D Radar) सिस्टीम बसवण्यात आली आहे, जी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
लक्झरी इंटीरियर आणि भन्नाट फीचर्स गाडीच्या आत पाऊल ठेवताच तुम्हाला एखाद्या आलिशान विमानासारखा अनुभव येतो. यात नप्पा लेदर स्टिअरिंग आणि सॉफ्ट टच मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. कारमध्ये १०५ लिटरचा फ्रंट ट्रंक दिला आहे, जो उघडण्यासाठी कंपनीने ८ वेगवेगळे पर्याय दिले आहेत. विशेष म्हणजे, कारमध्ये छोटा फ्रिज आणि सुवासिक वातावरण राखण्यासाठी 'फ्रेगरन्स सिस्टीम' देखील देण्यात आली आहे. प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी म्युझिकनुसार बदलणारी ॲम्बियंट लायटिंग केबिनमध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण करते.
सुपरफास्ट परफॉर्मन्स आणि रेंज कामगिरीच्या बाबतीत ही कार कोणत्याही स्पोर्ट्स कारपेक्षा कमी नाही. यात बसवलेले हायपर इंजिन (HyperEngine V6s Plus) कारला केवळ ३.०८ सेकंदात १०० किमीचा वेग पकडण्यास मदत करते. या कारचा टॉप स्पीड २६५ किमी प्रति तास इतका असून, प्रो व्हेरियंट एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ९०२ किमीपर्यंतची अविश्वसनीय रेंज देण्यास सक्षम आहे.
एआय आणि स्मार्ट सुरक्षा शाओमीने यात स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ (Snapdragon 8 Gen 3) आणि एनव्हीडीया (NVIDIA) चे शक्तिशाली चिप्स वापरले आहेत. यामुळे कारचे सर्व फंक्शन्स अतिशय वेगाने काम करतात. 'XLA' आर्किटेक्चरमुळे ड्रायव्हिंग आणि पार्किंग करणे आता अधिक सोपे आणि सुरक्षित झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर, Xiaomi SU7 ही कार भविष्यातील वाहतूक व्यवस्थेची एक झलक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.