NPCI Defers UPI MDR Charges Diwali 2026: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा दिला. युपीआय पेमेंटवर मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआर शुल्क लागू करण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्यात आला.
मंगळवारी (13 ऑक्टोबर) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात एनपीसीआयने स्पष्ट केले की, युपीआय व्यवहारांवरील हे शुल्क दिवाळी संपल्यानंतरच लागू केले जाईल. तसेच, या निर्णयाच्या अंमलबजावणीची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
विशेष म्हणजे, पूर्वीची योजना यापूर्वीच्या नियोजनानुसार याच आठवड्यात गुरुवारी हा निर्णय लागू करण्याची होती. सध्या देशात सणासुदीचा आणि ऐन दिवाळीचा काळ सुरु असल्याने खरेदीचा वेग प्रचंड वाढला आहे. अशा वेळी नवीन शुल्क लागू केल्यास खरेदीवर आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती मर्चंट संघटना, फिनटेक कंपन्या आणि पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या संस्थांनी व्यक्त केली होती.
त्यांनी एनपीसीआयला हा निर्णय काही काळासाठी स्थगित करण्याची विनंती केली होती. या सर्व बाबींचा विचार करुन युपीआय स्टीअरिंग कमिटीच्या बैठकीत दिवाळीच्या सणात कोणताही आर्थिक ताण पडू नये म्हणून हा निर्णय पुढे ढकलण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
एमडीआर शुल्काच्या पार्श्वभूमीबद्दल बोलायचे तर, गेल्या महिन्यात युपीआय स्टीअरिंग कमिटीने 2000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या मर्चंट व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर शुल्क आकारण्याचे निश्चित केले होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, 2000 रुपयांच्या पेमेंटवर 8 रुपये आणि 10,000 रुपयांच्या पेमेंटवर 40 रुपये शुल्क डिजिटल व्यवहार प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुकानदारांना आकारले जाणार आहे. हे शुल्क दुकानदारांवर असले तरी ते याचा भार अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर टाकतील अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देखील स्पष्ट केले होते की युपीआयवरील एमडीआरबाबतचा अंतिम निर्णय हा पेमेंट इकोसिस्टिमशी संबंधित संस्थांनीच घ्यायचा आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात डिजिटल खरेदी करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.