Gold Price Rally Forecast 2026 JP Morgan: यंदाच्या वर्षाचे (2026) पहिले सहा महिने संपत आले असून सोन्याच्या बाजारात सध्या मोठी शांतता पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव सध्या त्याच पातळीवर आहेत, जिथून या वर्षाची सुरुवात झाली होती. 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल 65 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ झाली होती, त्या तुलनेत यंदाचे वर्ष गुंतवणूकदारांसाठी संथ राहिले. असे असले तरी, जगप्रसिद्ध वित्तीय संस्था 'जे.पी. मॉर्गन ग्लोबल रिसर्च'ने सोन्याबाबत एक मोठा अंदाज वर्तवला.
त्यांच्या मते, 2026 च्या शेवटच्या तीन महिन्यांत सोन्याचे दर प्रति औंस 6000 डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात आणि 2027 च्या अखेरपर्यंत ते 6300 डॉलर्सचा टप्पा पार करतील. याचा अर्थ असा की, सध्याच्या 4300 डॉलर्सच्या पातळीवरुन गुंतवणूकदारांना या वर्षाच्या शेवटापर्यंत सुमारे 40 टक्के नफा मिळू शकतो.
वास्तविक, चालू वर्षात सोन्याच्या किमती घसरण्यामागे आणि त्यात चढ-उतार होण्यामागे इराण युद्ध हे मुख्य कारण ठरले. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे तसेच होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अचानक खूप वाढल्या. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली. परिणामी, अमेरिकन मध्यवर्ती बँक व्याजदर दीर्घकाळासाठी चढेच ठेवेल, अशी शक्यता निर्माण झाली. सोन्यावर थेट कोणतेही व्याज मिळत नसल्यामुळे, जेव्हा व्याजदर चढे राहतात, तेव्हा लोक सोन्याऐवजी इतर ठिकाणी गुंतवणूक करणे पसंत करतात. या भीतीने सोन्याचे दर फेब्रुवारीच्या अखेरीस सुमारे 20 टक्क्यांनी घसरले होते आणि बहुतांश गुंतवणूकदारांनी सोन्याकडे तात्पुरती पाठ फिरवली होती.
तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर सध्या सोने एका कोंडीत अडकले. जे.पी. मॉर्गनचे तज्ज्ञ ग्रेग शिअरर यांच्या मते, सोने सध्या ठराविक पातळीच्या मध्येच फिरत आहे. परंतु, सोन्याचे दिवस पुन्हा बदलू शकतात, कारण 19 जून रोजी अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंड येथे एक महत्त्वाचा शांतता करार होण्याची शक्यता आहे. या करारामुळे इराणवरील आर्थिक निर्बंध उठवले जातील आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होईल. या आशेने आतापासूनच बाजारात सकारात्मक बदल दिसत असून आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर आणि कच्चे तेल यांचे भाव घसरु लागले आहेत. डॉलर स्वस्त झाल्यामुळे इतर देशांतील खरेदीदारांसाठी सोने खरेदी करणे परवडणारे ठरत आहे, ज्यामुळे गेल्या तीन दिवसांत सोन्याने पुन्हा 4300 डॉलर्सचा टप्पा ओलांडला.
या सर्व परिस्थितीत 'मार्केटगेज'च्या मुख्य बाजार रणनीतीकार मिशेल श्नायडर यांनी गुंतवणूकदारांना महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांच्या मते, सोन्याच्या किमतीत झालेली ही घसरण खरेदीची एक चांगली संधी असू शकते. मात्र, गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजार पूर्णपणे स्थिर होण्याची वाट पाहावी. 2026 च्या उत्तरार्धात इराण शांतता करार, मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची मोठी खरेदी आणि जागतिक महागाई या घटकांमुळे सोन्यामध्ये मोठी तेजी येऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.