

Gold Silver Rate Today: भारतीय बाजारपेठेत सध्या सोन्या-चांदीच्या किमतींनी एक वेगळाच इतिहास रचला. हिंदू पंचांगानुसार सध्या 'खरमास' सुरु आहे. खरमास हा असा काळ असतो, ज्यामध्ये लग्नसराई किंवा इतर कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही. मागणी नसल्यामुळे साधारणपणे या दिवसांत सोन्या-चांदीचे भाव स्थिर राहतात किंवा त्यात घट पाहायला मिळते. मात्र, यंदा हे चित्र पूर्णपणे बदलले असून मागणी नसतानाही मौल्यवान धातूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक घडामोडींमुळे दररोज नवे रेकॉर्ड प्रस्थापित होत असून सामान्य नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर आज सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली. फेब्रुवारी कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सोन्याच्या दरात दुपारी 2:23 वाजेपर्यंत 360 रुपयांची वाढ होऊन तो 138245 रुपये प्रति 10 ग्रॅम या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. केवळ सोनेच नाही, तर चांदीनेही गुंतवणूकदारांना थक्क केले. मार्च कॉन्ट्रॅक्ट असलेल्या चांदीचा दर 1.30 टक्क्यांनी म्हणजेच 2845 रुपयांनी वधारुन 222498 रुपये प्रति किलोग्राम या स्तरावर पोहोचला. सव्वा दोन लाखांच्या घरात गेलेली चांदी ही भविष्यातील मोठ्या महागाईचे संकेत देत आहे.
दुसरीकडे, या अवाढव्य दरवाढीमागे प्रामुख्याने 'फेड फॅक्टर' कार्यरत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेतील (America) महागाईचा दर हळूहळू कमी होत असून रोजगाराची स्थितीही काहीशी नरम पडत आहे. यामुळे 2026 मध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात किमान दोन वेळा कपात करेल, अशी अपेक्षा बाजार व्यक्त करत आहे. व्याजदर कपातीच्या या आशेने गुंतवणूकदारांचा कल सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे.
याशिवाय, जागतिक राजकारणातील वाढता तणाव देखील या दरवाढीला खतपाणी घालत आहे. विशेषतः अमेरिका आणि वेनेझुएला यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. अमेरिकेने वेनेझुएलाचे तेल टँकर्स ब्लॉक केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून अशा अस्थिर वातावरणात गुंतवणूकदार 'सेफ-हेवन' म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
त्याचवेळी, अमेरिकन डॉलरची होत असलेली घसरण सोन्यासाठी फायदेशीर ठरली आहे. डॉलर इंडेक्स 0.20 टक्क्यांनी घसरुन गेल्या तीन महिन्यांतील नीचांकी स्तरावर आला आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे परकीय चलनात सोने खरेदी करणे स्वस्त होते, परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची खरेदी जोमाने सुरु आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत स्पॉट गोल्डच्या किमतीत तब्बल 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 145 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक कलही असाच असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या वर्षात सोने 72 टक्क्यांनी तर चांदी 149 टक्क्यांनी महागली आहे. एकीकडे देशात लग्नसराईचा हंगाम नसतानाही ही भाववाढ झाल्यामुळे जेव्हा पुन्हा मागणी वाढेल, तेव्हा सोन्याचे (Gold) भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.