केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीची (DR) घोषणा केली आहे. मात्र, आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. या आयोगाच्या शिफारशींचा परिणाम केवळ नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच नव्हे, तर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेन्शनच्या सध्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनधारकांच्या संस्थांकडून करण्यात येत आहे.
आठव्या वेतन आयोगासमोर पेन्शनवाढीसंदर्भात विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. भारत पेंशनर्स समाजाने किमान मासिक पेन्शन 45 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. याशिवाय कुटुंब निवृत्तीवेतन म्हणजेच फॅमिली पेन्शन 50 टक्के करण्याची मागणीही या संस्थेने केली आहे. सध्याच्या पेन्शन व्यवस्थेत बदल झाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.
नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) ने कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या 67 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची मागणी केली आहे. सध्या लागू असलेल्या नियमांनुसार पात्र कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्क्यांपर्यंत पेन्शन मिळते. ही मर्यादा 67 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते.
दरम्यान, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशननेही निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पेन्शनसंबंधी अशाच प्रकारच्या मागण्या मांडल्या आहेत. तर ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉईज फेडरेशनने सर्व पेन्शनधारकांसाठी संरक्षण दलाच्या धर्तीवर 'वन रँक वन पेन्शन' लागू करण्याची मागणी केली आहे.
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी फॅमिली पेन्शनची सामान्य गणना शेवटच्या मूळ वेतनाच्या 30 टक्के दराने केली जाते. कर्मचाऱ्याच्या निधनानंतर पात्र कुटुंबीयांना ही पेन्शन दिली जाते. मात्र, वाढता महागाईचा खर्च आणि कुटुंबाच्या आर्थिक गरजा लक्षात घेता फॅमिली पेन्शनचा दर 50 टक्के करण्याची मागणी होत आहे.
ही मागणी मान्य झाल्यास कर्मचाऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाला मिळणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होईल.
समजा, एखाद्या कर्मचाऱ्याचे निवृत्तीच्या वेळी शेवटचे मूळ वेतन 1 लाख रुपये आहे. सध्याच्या 50 टक्के दरानुसार त्याची मूळ पेन्शन 50 हजार रुपये होईल. मात्र, NC-JCM ची 67 टक्के पेन्शनची मागणी मान्य झाल्यास ही रक्कम 67 हजार रुपये होऊ शकते. म्हणजेच दरमहा 17 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
फॅमिली पेन्शनच्या बाबतीतही मोठा बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ, शेवटचे मूळ वेतन 1 लाख रुपये असल्यास सध्याच्या 30 टक्के दरानुसार सामान्य फॅमिली पेन्शन 30 हजार रुपये होते. हा दर 50 टक्के केल्यास ती 50 हजार रुपये होऊ शकते. म्हणजेच पात्र कुटुंबीयांना दरमहा 20 हजार रुपये अधिक मिळण्याची शक्यता आहे.
या सर्व मागण्या आठव्या वेतन आयोगासमोर मांडण्यात आल्या असून, त्या स्वीकारल्या जातीलच असे नाही. आयोग या मागण्यांचा विचार करून केंद्र सरकारला शिफारशी करेल. त्यानंतर सरकारच्या निर्णयानुसार पेन्शनमध्ये बदल होऊ शकतात. त्यामुळे सध्या 45 हजार रुपये किमान पेन्शन, 67 टक्के पेन्शन आणि 50 टक्के फॅमिली पेन्शन या मागण्या आहेत; त्यांची अंमलबजावणी झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.