प्रीमियम बाइक्ससाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या कावासाकी (Kawasaki) कंपनीने भारतीय तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आपली नवीन 'नियो-रेट्रो' बाइक 2026 Z650RS अधिकृतपणे लाँच केली आहे. ७.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी या बाइकची किंमत निश्चित करण्यात आली असून, जुन्या काळातील क्लासिक लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम या मॉडेलमध्ये पाहायला मिळत आहे.
तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, या नव्या मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे याचे इंजिन आता E20 इंधन (एथॅनॉल मिश्रित पेट्रोल) क्षमतेचे करण्यात आले आहे. यामुळे ही बाइक अधिक पर्यावरणपूरक झाली आहे. इंजिनमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे टॉर्कमध्ये किंचित घट झाली असली, तरी रायडिंगचा अनुभव मात्र पूर्वीसारखाच दमदार असणार आहे. यामध्ये ६४९ सीसीचे लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले असून, ते ८,००० आरपीएमवर ६८ बीएचपीची पॉवर निर्माण करते.
१९७० च्या दशकातील कावासाकीच्या गाजलेल्या बाइक्सची आठवण करून देणारे डिझाइन या Z650RS ला देण्यात आले आहे. १२ लिटरची स्लिम इंधन टाकी आणि फ्लॅट स्पोक कास्ट व्हील्स यामुळे या बाइकला एक वेगळी ओळख मिळते. विशेष म्हणजे, कंपनीने यावेळी 'मॅटालिक ब्लू' आणि 'गोल्ड' रंगाचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे, जो जुन्या ब्लॅक-गोल्ड रंगाची जागा घेईल. सोनेरी रंगाचे अलॉय व्हील्स आणि क्लासिक ग्राफिक्स बाइकच्या सौंदर्यात भर घालतात.
केवळ लूकच नाही, तर सुरक्षिततेच्या बाबतीतही कावासाकीने कोणतीही तडजोड केलेली नाही. यामध्ये 'कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल' (KTRC) देण्यात आले असून, ज्यामध्ये दोन मोड्स उपलब्ध आहेत. पावसाळ्यात किंवा निसरड्या रस्त्यांवर बाइकवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच, गिअर बदलताना रायडरला त्रास होऊ नये म्हणून 'असिस्ट आणि स्लिपर क्लच'चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासात थकवा जाणवत नाही.
या बाईकमध्ये ड्युअल-चेंबर डिझाइनसह गोल एलईडी हेडलाइट आणि कॉम्पॅक्ट टेललॅम्प देण्यात आला आहे. अनालॉग स्पीडोमीटर आणि टॅकोमीटरच्या मधोमध एक छोटी एलसीडी स्क्रीन आहे, जी आवश्यक माहिती पुरवते. ८२० मिमीची सीट हाईट असल्याने ही बाइक शहराच्या ट्रॅफिकमध्ये हाताळण्यास सोपी आहे. या हाय-स्पीड बाइकची डिलिव्हरी जानेवारी २०२६ च्या मध्यापासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.