पणजी: ‘द स्पेल ऑफ पर्पल’ (The Spell of Purple) या लघुपटातून महिलांच्या धाडसाला सलाम करणारा, त्यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करणारा चित्रपट आहे. त्याचवेळी पितृसत्ताक पद्धतीशी सतत लढा देताना महिलांना आलेला शारीरिक, मानसिक शीण देखील या चित्रपटातून मांडला असल्याचे दिग्दर्शक प्राची बजानिया यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी त्यांच्यासोबत सिनेमॅटोग्राफर राजेश रंजन यांची उपस्थिती होती.
काही महिला चेटकीण, करणी करणाऱ्या असल्याचा समज आपल्या समाजात विनाकारण पसरवला जातो. कधी त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी तर कधी त्यांना विनाकारण त्रास देण्यासाठी अशा अफवा पेरल्या जातात. या चित्रपटात हाच विषय हाताळण्यात आला असून, गुजरातच्या एका छोट्या आदिवासी पाड्यातल्या महिला एकत्रित येऊन या पितृसत्ताक व्यवस्थेतील अन्यायाशी कसा लढा देतात याची ही कथा असल्याचे प्राची यांनी नमूद केले.
जांभळा रंग हा जादू आणि गूढ गोष्टींशी संबंधित आहे. या रंगाचा उपयोग चित्रपटाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तर करायचा होताच, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे अनेक संकटे झेलूनही महिला आजही तेजस्वी आहेत, बहरत आहेत, त्या संकटातून तावून-सुलाखून निघत आहेत, हेही त्यांना सुचवायचे होते. म्हणूनच या सिनेमाला ‘द स्पेल ऑफ पर्पल’ हे शीर्षक दिल्याचे त्यांनी नमूद केले. गुजराती भाषेत असलेल्या या मूळ चित्रपटाचे नाव ‘खिलशे तोह खरा’ (त्या नक्की बहरतील) असे होते. काहीही संकटे आली, त्यांच्याविरुद्ध कोणत्याही दुष्ट शक्ति उभ्या राहिल्यात तरीही, स्त्रिया पुन्हा बहरतील, असा विश्वास या शीर्षकातून व्यक्त करण्यात याला होता. यावेळी माहितीपटाचे छायादिग्दर्शक राजेश अमारा रंजन, इतर कलाकार, सृजना अडुसुमाली, (संकलक) जिक्कू जोशी (ध्वनिमुद्रक) आणि शिखा बिश्त (प्रोडक्शन डिझायनर) यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.