
Priya Marathe-Shantanu Moghe Love Story: मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे रविवारी वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सर या दुर्धर आजाराशी लढा देत होत्या, पण ही झुंज अखेर अपयशी ठरली. त्यांच्या अकाली निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'पवित्र रिश्ता', 'कसम से' आणि 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील.
प्रिया मराठे यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात 'या सुखांनो या' या मराठी मालिकेतून केली. त्यानंतर 'चार दिवस सासूचे' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी काम केले. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांना खरी ओळख 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून मिळाली, जिथे त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यासोबत काम केले. त्यांची 'वर्षा' ही भूमिका प्रचंड गाजली आणि देशभरातील प्रेक्षकांनी त्यांना पसंत केले.
प्रिया मराठे गेल्या काही वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर असल्या तरी, त्या सोशल मीडियावर सक्रिय होत्या. त्यांच्या निधनानंतर ऑगस्ट २०२४ मधील त्यांची पती शंतनू मोघेसोबतची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये ते दोघे जयपूरमधील आमेर किल्ल्याच्या भेटीत खूप आनंदी दिसत आहेत. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी याच पोस्टवर श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.
प्रिया आणि शंतनू मोघे यांची प्रेमकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. एका पार्टीत त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१२ साली त्यांनी एका साध्या समारंभात लग्न केले. ते नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या नात्यातील गोड क्षण अनेकदा शेअर करायचे.
प्रियाने एका मुलाखतीत शंतनूचे शांत आणि तार्किक व्यक्तिमत्त्व आवडत असल्याचे सांगितले होते. तर शंतनूने प्रियाचे मनमिळाऊ आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व सर्वांना आकर्षित करते असे म्हटले होते. त्यांच्या प्रेमळ नात्याची आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाची आठवण त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.