Movie Based on Chandryaan 3 : भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावरची आपली यशस्वी मोहिम पूर्ण केली. 23 ऑगस्टच्या सायंकाळी चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि समस्त भारतीयांच्या अभिमानाने उसळी घेतला.
या मोहिमेनंतर भारत हा जगातला 4 था असा देश ठरला आहे ज्याने चंद्रावर यशस्वी स्वारी केली आहे. आता या मोहिमेवर बॉलीवूडचे फिल्ममेकर्स चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत. चला पाहुया या संदर्भातले सविस्तर वृत्त
भारताच्या 'चांद्रयान 3' मोहिमेच्या यशानंतर आता चित्रपटसृष्टीत वेगळीच स्पर्धा सुरू झाली आहे. या ऐतिहासिक मिशनच्या यशोगाथेवर चित्रपट बनवण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते मैदानात उतरले आहेत.
काही निर्मात्यांनी तर त्यांच्या चित्रपटांची नावं नोंदवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, मिशन मंगलचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी 'चांद्रयान 3' वर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.
अक्षय कुमारच्या मिशन मंगल या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी एका मीडिया संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते मिशन मंगलच्या टीमसोबत 'चांद्रयान 3' वर चित्रपट बनवणार आहेत. मात्र, अक्षय कुमार या चित्रपटाचा भाग असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
मिशन मंगलच्या दिग्दर्शकाने ही संधी सोडणार नसल्याचे सांगून म्हटले की, "सध्या मी चित्रपटाच्या कथेचा विचार करत आहे.' कथेवर निर्णय घेण्यापूर्वी माझ्या मोठ्या बहिणीकडून माहिती घेईन. त्या इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, असेही दिग्दर्शक पुढे म्हणाले.
केवळ जगन शक्तीच नाही तर इतर अनेक चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊस देखील चांद्रयान-3 मोहिमेवर चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसने इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPAPA), प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स कौन्सिल (IFTPC) च्या मुंबई कार्यालयात चित्रपटाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, यापैकी काही निर्मात्यांनाच त्यावर चित्रपट बनवण्याची परवानगी असेल.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत IMPALA च्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'पुढच्या आठवड्यात आम्ही या सर्व अर्जांचे पुनरावलोकन करू आणि त्यानंतर काही निर्मात्यांना चित्रपट बनवण्याची परवानगी देऊ, ज्यांना आम्हाला खरे वाटेल त्यांना ही परवानगी दिली जाईल.'