Director Mahesh Bhatt 75 th Birthday : अर्थ, सारांश, नाम, सडक, जख्म, क्रिमिनल यांसारख्या माईलस्टोन चित्रपटांना भारतीय प्रेक्षक कसा विसरेल?
नाम चित्रपटातला बिघडलेला तरुण, सारांशमधला व्यवस्थेला कंटाळलेला अस्वस्थ म्हातारा, जख्म चित्रपटात धार्मिक द्वेषाला पाहुन सैरभर झालेला संगीत दिग्दर्शक अशी विलक्षण पात्रं ज्यांनी 80 आणि 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आणली अशा महान दिग्दर्शकाचा आज वाढदिवस.
बरोबर आम्ही बोलताय द ग्रेट डिरेक्टर महेश भट्ट यांच्याबद्दल. आपल्या अनोख्या दिग्दर्शनाच्या शैलीने महेशजींनी प्रेक्षकांना कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांचे दर्शन घडवले.
एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना नाट्यात्मक अनुभव देताना महेश भट्ट (Mahesh Bhatt) स्वत:ही एक विलक्षण आयुष्य जगले.
कुटूंब, नातेसंबंध, वादग्रस्त प्रेमप्रकरणं, विवाहानंतरचं प्रेम अशा अनेक गोष्टी प्रसिद्धी आणि यशासोबतच महेशजींच्या वाट्याला आल्या.
आज त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पाहुया त्यांच्या आयुष्यातले काही किस्से ज्यांनी त्यांच्या आयुष्याला एक दिशा दिली.
महेश भट्ट हे हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या काही चित्रपटांनी आजही प्रेक्षकांच्या मनात स्मृती ठेवल्या आहेत. इंडस्ट्रीत येऊन स्वत:ची वेगळी शैली निर्माण करुन ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवायला लावणं ही गोष्ट त्या काळात सोपी नव्हती.
महेश भट्ट हे नानाभाई भट्ट आणि शिरीन मोहम्मद अली यांच्या पोटी जन्मले. अगदी लहान वयात त्यांना आपल्या घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. महेशजींनी कल्पनाही केली नव्हती की लहान वयात त्यांना स्वतःचे नशीब लिहिण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये 'अर्थ' आणि 'जख्म' 'डॅडी' आणि 'नाम' या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. आज माईलस्टोन ठरलेल्या या चित्रपटांचा प्रवास सोपा नव्हता. या संघर्षाची सुरूवात त्यांच्या घरापासून झाली होती.
जेव्हा महेश भट्ट दिग्दर्शक होण्यासाठी घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या आईनेही त्यांना सांगितले की, पैसे कमावल्यावरच घरी परत ये, नाहीतर येऊ नकोस.
महेश भट्ट यांचा संघर्षाची सुरूवात त्यांच्या घर सोडण्यापासून होते जेव्हा त्यांच्या आई शिरीनने त्यांना घराबाहेर काढले होतं.
या मोठ्या धक्क्यानंतरही महेशजी आपल्या ध्येयापासून जराही विचलित न होता आपला रस्ता चालत राहिले.
महेश भट्ट यांचे वडील कधीही त्यांच्यासोबत राहत नव्हते. त्याच्या आई-वडिलांचे लग्न झालेले नव्हते. वास्तविक महेश भट्ट यांचे वडील आधीच विवाहित होते. म्हणूनच त्यांनी कधीही महेशजींच्या आईला पत्नीचा दर्जा दिला नाही.
यामुळे महेश भट्ट यांनाही खूप त्रास सहन करावा लागला. लोक त्याला अनौरस मूल म्हणायचे. महेश भट्ट यांनी ETimes ला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
महेश भट्ट यांचे वडिल कधी कधी त्यांच्या घरी यायचे ;पण घरी आल्यावर ते साध्या चपलाही काढायचे नाहीत कारण तो त्यांच्यासोबत राहायला यायचे नाहीत. असं असलं तरीही त्याच्या आई-वडिलांमध्ये खूप प्रेम होते. कदाचित यामुळेच त्यांनी जख्म चित्रपटात नागार्जुन आणि पूजा भट्टच्या नात्याचा नाजुक पदर उलगडून दाखवला.
महेशजींचे वडील त्यांना आणि त्यांच्या आईला केवळ आर्थिक आणि इतर गोष्टींद्वारे मदत करायचे. महेश भट्टही जगण्यासाठी शालेय काळात छोटी-मोठी नोकरी करून पैसे कमवत असत. संघर्षाच्या काळात त्यांनी काही उत्पादनांच्या जाहिरातीही केल्या.
जेव्हा महेश भट्ट यांच्या आईने पैसे कमावल्याशिवाय घरी परतण्यास नकार दिला तेव्हा त्यांची कोंडी झाली. ही गोष्ट 1968-1969 सालची. तेव्हा महेश भट्ट 19 वर्षांचे होते.
महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते आणि त्यांच्या प्रभावामुळेच महेश भट्ट यांनीही हाच मार्ग निवडला. महेश भट्ट यांना चित्रपट पाहण्याची आवड होती. या छंदामुळेच त्यांची चित्रपटसृष्टीकडे वाटचाल झाली.
घरातून बाहेर पडल्यानंतर महेश भट्ट थेट मेहबूब स्टुडिओत गेले. मात्र त्यांना येथे पाहताच सुरक्षा रक्षकाने त्यांना थांबवले . तेव्हा महेश भट्ट म्हणाले की, मी राज खोसला यांना भेटायला आलो आहे.
सुरक्षा रक्षकाने नकार दिला आणि कोणत्याही परवानगीशिवाय राज खोसला यांना भेटू देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर महेश भट्ट यांनी चौकीदाराला राज खोसला यांनी भेटायला बोलावल्याचे खोटे सांगितले.
अशातच महेश भट्ट राज खोसला यांच्या कार्यालयात घुसले. तिथे राज खोसला यांनी महेश भट्ट यांना विचारले की तुम्हाला चित्रपट निर्मितीबद्दल माहिती आहे का? यावर महेश भट्ट यांनी नकारार्थी उत्तर दिले.
राज खोसला महेशजींचा खरेपणा पाहून प्रभावित झाले आणि म्हणाले की शून्यापासून सुरुवात करणे चांगले आहे. त्याच दिवसापासून राज खोसला यांनी महेश भट्ट यांना आपला सहाय्यक बनवले.
महेश भट्ट यांनी राज खोसला यांना काही चित्रपटांमध्ये असिस्ट केले आणि त्यानंतर वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी 'मंजिलें और भी हैं' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
या चित्रपटात कबीर बेदी आणि प्रेमा नारायण होते. नंतर त्यांनी 'लहू के दो रंग', 'आशिकी', 'सर', 'डुप्लिकेट' आणि 'दस्तक' सारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आणि पुरस्कार मिळवले.
आज महेश भट्ट हे नाव कुठल्याही सिनेरसिकांसाठी नवीन नाही ;पण यासाठी त्यांनी केलेला संघर्ष नव्या फिल्ममेकर्ससाठी प्रेरणादायी आहे.