JUNE: मैत्री आणि प्रेमच्या पलीकडील नात्यांतील ‘हिरवळ’ टिकण्यासाठी...

नात्यात संवाद झाल्यावर नाती फुलतात, अगदी जून (June) महिन्यात सृष्टी पुन्हा एकदा बहरून येते तशी
Poster of June Marathi Movei
Poster of June Marathi Movei Dainik Gomantak
Published on
Updated on

नात्यांमध्ये संवाद हवा असतो. एकमेकांना समजून घ्यावं लागतं...तरच ती टिकतात. अन्यथा ही नाती कायमची दुरावतात, तुटतात, अगदी टोकाच्या निर्णयापर्यंत जातात. नात्यात संवाद आल्यावर ती फुलून येतात, अगदी जून (June) महिन्यात सृष्टी पुन्हा एकदा बहरून येते तशी...निखिल महाजन लिखित व सुहृद गोडबोले व वैभव खिस्ती यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘जून’ हा चित्रपट नेमका हाच धागा पकडून एक कथा सांगतो. नेमकी कथा, संवाद, कलाकारांचा अभिनय व ओटीटी प्लॅटफॉर्म बहरात आल्यानंतरची बदललेली सिनेभाषा व औरंगाबाद शहराचं देखणं चित्रण घेऊन आलेला हा चित्रपट प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारा, मैत्री आणि प्रेम यांच्या पलीकडील नातं सांगणारा आहे.(JUNE: Relationship beyond friendship and love)

Poster of June Marathi Movei
स्वत: मधील महाराणीला शोधा : हुमा कुरेशीचा नवा फोटोशूट

जूनची कथा आहे नील (सिद्धार्थ मेनन) या मूळच्या औरंगाबादच्या व पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या युवकाची. काही कारणानं तो नापास होतो व आपल्या घरी औरंगाबादेत दाखल होतो. त्याच्या येण्यानं त्याचे वडील (किरण करमरकर) रागावलेले असतात. त्याचवेळी पुण्यातीलच एक युवती नेहा (नेहा पेंडसे) नवरा अभिजितशी (जितेंद्र जोशी) संबंध बिघडल्यानं आपल्या औरंगाबादच्या घरी, नीलच्याच सोसायटीत राहायला येते. नील व नेहाची अपघातानंच भेट होते व दोघांनाही आपलं दुःख समान असल्याचं जाणवू लागतं. नात्यातील संवाद हरपल्यानं, त्याला गृहित धरल्यानं दोघांचंही आयुष्य पालापाचोळ्यासारखं उडून चाललेलं असतं. ते पुन्हा बहरवता येईल, या विवंचनेत दोघंही असतात. त्यानंतर अशा काही घटना घडतात, की दोघांनाही आपापल्या आयुष्याची दिशा मिळते, नाती टिकवण्याचं गमक सापडतं.

Poster of June Marathi Movei
इरफान खानचा 2005 साली शूट झालेला चित्रपट पडद्याआडचं

चित्रपटाच्या कथेला एक निश्चित दिशा असून, लेखक- दिग्दर्शकाला नातेसंबंधांसंदर्भात काही सांगायचं आहे. यासाठी त्यानं निवडलेल्या दोन्हीही पात्रांची आयुष्य एकमेकाला समांतर असली, तरी ती एकत्र आणत दिग्दर्शकानं छान परिणाम साधला आहे. चित्रपटातील संवाद व प्रसंग अगदी थेट आहेत. नीलच्या होस्टेलवरील मित्राचं आयुष्य नील त्याच्याशी संवाद साधत नसल्यानं, किंबहुना तो चुकीच्या पद्धतीनं साधत असल्यानं संकटात सापडतं. हे प्रसंग अत्यंत थेट पद्धतीनं सादर केले गेले आहेत. नेहाच्या आयुष्यातील गुंतागुंत दाखवणारे प्रसंगही टोकदार झाले आहेत. यासाठी निवडलेल्या आजच्या पिढीच्या भाषेमुळं कथा अधिक परिणामकारपणे पोचते. याच्या जोडीला औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळांचं देखणं चित्रण चित्रपट सुसह्य बनवतं.

Poster of June Marathi Movei
आमिर खानच्या भाच्यानं बॉलिवूड केला रामराम

अभिनयाच्या आघाडीवर सिद्धार्थ मेननला संधी आहे व त्यानं घरच्यांच्या अपेक्षांनी दबलेला, नापास झाल्यानं नैराश्यात बुडालेला युवक छान साकारला आहे. नेहा पेंडसे नेहाच्या भूमिकेत ग्लॅमरस व बोल्ड दिसण्याबरोबर नेहाचं आयुष्यातील सल, दुःख दाखवण्यात यशस्वी झाली आहे. छोट्या भूमिकेत जितेंद्र जोशी छाप पाडतो. किरण करमरकर, संस्कृती बालगुडे, नीलेश दिवेकर, रेशम श्रीवर्धन आदी कलाकारांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. या चित्रपटाला शाल्मली खोलगडेनं संगीत दिलं आहे. गायिका म्हणून नावलौकिक मिळविल्यानंतर संगीतकार म्हणून तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तिनं चांगली कामगिरी केली आहे. क्वेस वासीक यांची सिनेमॅटोग्राफी छान झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस, निखिल महाजन आणि पवन मालू यांनी केली आहे.

प्लॅनेट मराठी आणि प्लॅनेट एन्टरटेन्मेंटची ही प्रस्तुती असून, हा चित्रपट प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com