लघुपट, माहितीपटांसाठी विशेष चॅनलची नितांत गरज..!

परिक्षक सुरेश शर्मा यांचे मत : सरकारने घ्‍यावा पुढाकार
IFFI 2021
IFFI 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही वर्षांत देशात मोठ्या प्रमाणात युवक सिनेमांकडे वळले आहेत. देशभरातील जवळपास सगळ्याच भाषांमध्ये लघुपट, माहितीपट बनवले जात आहेत. देश - विदेशांत विविध सिने महोत्सवांत हे लघुपट दाखवले जात आहेतच, तरीही प्रत्येक सिने महोत्सवात किंवा अगदी इफ्फीसारख्या (IFFI 2021) महोत्सवालादेखील प्रचंड मर्यादा आहेत. अशावेळी सरकारने पुढाकार घेऊन लघुपट आणि माहितीपटांसाठी विशेष चॅनल सुरू करण्याची नितांत गरज आहे. यामुळे देशभरातील लघुपटकर्त्यांना मोठा दिलासा आणि प्रोत्साहन मिळेल, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि यावर्षीच्या इंडियन पॅनोरमातील लघुपट विभागाचे परीक्षक सुरेश शर्मा यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना केली.

IFFI 2021
जाणून घ्या इफ्फीच्या ठिकाणाचा इतिहास..!

इफ्फीमध्ये वर्ल्ड पॅनोरमानंतर सर्वाधिक महत्व इंडियन पॅनोरमा विभागाला असते. कारण हा विभाग इफ्फीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. देशभरात त्या वर्षभरात निर्माण होणारे शेकडो सिनेमे, लघुपट आणि माहितीपटातून सर्वोत्तम 21 सिनेमे आणि 20 लघुपटांची निवड दरवर्षी इफ्फीसाठी होत असते. या सिनेमांतून देशाचे कलात्मक जनमानस टिपले जात असल्याचे मानले जाते. सुरेश शर्मा हे याच इंडियन पॅनोरमाच्या लघुपट विभागाचे परीक्षक सदस्य आहेत.

यावर्षी कोरोनामुळे मर्यादित संख्येत लघुपट आलेले असले, तरी ही संख्या 220 पर्यंत पोहोचली होती. आणि त्यातून 20 लघुपटांची निवड आमच्या समितीला करायची होती आणि ती देखील अवघ्या 10 दिवसांत. त्यामुळे सगळ्यांसाठीच ही परीक्षा होती, पण आम्ही सगळ्यांनी मिळून ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची जाणीव इंडियन पॅनोरामातील सिनेमे पाहिल्यावर होते, अशी भावना ते व्यक्त करतात.

सरकारच्यावतीने किंवा डीएफएफच्यावतीने आम्हाला सिनेनिवडीमध्ये पूर्णतः मोकळीक देण्यात आलेली होती. कोणतीही बंधने घालण्यात आलेली नव्हती. त्यांनी सांगितले होते की, ‘तुम्हाला जे लघुपट, माहितीपट योग्य वाटतात त्याची निवड करा. फक्त निवडीमध्ये संपूर्ण देशाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे.’ आम्हा सगळ्या परीक्षकांचेही तेच म्हणणे होते, की या वर्षभरात कोरोनाचे सावट डोक्यावर घेऊन देखील ज्यांनी आपल्यापरीने चांगल्या लघुपटांची निर्मिती केली आहे, त्यांना हा सिने मंच दिलाच पाहिजे. त्यानुसारच आम्ही निवड केली, असे सुरेश शर्मा यांनी नमूद केले.

IFFI 2021
पॅनोरमा विभाग परीक्षक मंडळ सदस्यांचा माध्यमांशी संवाद

नवे सिनेकर्मी अधिक तंत्रशुद्ध

गेल्या काही वर्षांत सिनेमाची भाषा आमूलाग्र बदललेली आहे. त्यातच आता गेल्या दोन वर्षांत ओटीटी माध्यमांमुळे सिनेमा आणि एकूणच मनोरंजन क्षेत्राची परिभाषादेखील बदलली आहे. तांत्रिकदृष्ट्या देखील आपल्याकडील सिनेमे आता अद्ययावत झालेले आहेत. या सगळ्यांचे प्रतिबिंब आम्हाला यावर्षीच्या लघुपटांमध्ये पाहायला मिळाले. हे नवे तरुण सिनेकर्मी अधिक तंत्रशुद्ध झालेले आहेत. गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत अधिक आधुनिक आणि तंत्रकुशल आहे. ते संपूर्ण सिनेमाचा विचार करत नाहीत, तर प्रेक्षकांसमोर येणाऱ्या प्रत्येक दृश्याचा विचार करतात. ते दृश्य अधिक आकर्षक कसे होईल याचा विचार करतात. पडद्यावर अनावश्यक तपशील देण्यापेक्षा प्रेक्षकांना काही गोष्टी विचार करण्यासाठी सोडून देण्याकडेही त्यांचा भर असल्याचे सुरेश शर्मा यांनी नोंदवले.

यावर्षीच्या इंडियन पॅनोरमातील लघुपटांवर प्रामुख्याने ग्रामीण, निमशहरी भागातील प्रादेशिक भाषांचा वरचष्मा दिसून येईल. कारण या भागातील नव्या सिनेकर्मींची गोष्ट सांगण्याची पद्धत आम्हा सगळ्यांना विशेष भावली. ते एकाचवेळी वैयक्तिक आणि जागतिक गोष्ट आपल्या लघुपटातून सांगत असतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती गोष्ट ते आपल्या स्वत:च्या स्थानिक भाषेत सांगत असतात. यामुळे एकाचवेळी सिनेमा आणि भाषा दोन्ही वृद्धिंगत होत असतात.

- सुरेश शर्मा,

परीक्षक, इंडियन पॅनोरमा

(लघुपट विभाग)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com