पणजी: कोविड (Covid-19) संकटामुळे यंदाचा इफ्फीही (IFFI 2021) ‘हायब्रिड’ पद्धतीनेच आयोजित करण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सव संचालनालयाने 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) तारीख जाहीर केली असून त्यासाठी सदस्य नोंदणीही ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे.
यासंदर्भात, गोवा (Goa) मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, यंदाचा चित्रपट महोत्सव हा 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. कोविड संकट अजूनही कायम आहे. पुढील स्थिती काय असेल हे निश्चित सांगता येणार नाही. चित्रपटगृहात 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश असेल. इतरांना ऑनलाईन पद्धतीने चित्रपट पाहता येतील. तरी देखील महोत्सवाबाबतीच्या साऱ्या बाबींवर आम्ही विचार करून पुढे निर्णय घेणार आहोत. या चित्रपट महोत्सवात 200 हून अधिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. चित्रपट समिक्षक मिना कर्णिक म्हणाल्या, कोविड संकटात हायब्रिड पद्धतीने महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना चांगली आहे. मी गेल्या वर्षी प्रत्यक्ष हजर राहून चित्रपट पाहिले. परंतु, ऑनलाईन चित्रपट पाहणाऱ्यांना दर्जेदार चित्रपट पाहायला मिळावेत. गेल्या वर्षी मात्र अशा लोकांची निराशा झाली होती.
इफ्फीचे वेध सुरू
अर्थपूर्ण सिनेमा पाहणाऱ्या रसिकांना ज्या महोत्सवाची आतुरता असते त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाल्यामुळे गोमंतकीय चित्ररसिकांना यावर्षी या महोत्सवात असणाऱ्या चित्रपटांबद्दल उत्सुकता लागली आहे. सध्या इटली येथे व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. या महोत्सवातील किती चित्रपट गोव्यात पाहायला मिळतील, तसेच इतरही महोत्सवातील दर्जेदार किती चित्रपटांना संधी मिळेल, याबाबतही रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
हॉटेल बुकिंग सुरू
इफ्फी काळात हॉटेल आरक्षणाचे दर प्रचंड वाढतात हा अनेक वर्षांचा रसिकांचा अनुभव आहे म्हणून नोंदणीबरोबर काही रसिकांनी हॉटेल आरक्षणाला प्राधान्य दिले आहे. पणजीतील काही हॉटेल्समध्ये बुकिंगची विचारपूस सुरू झाली असून काहींनी बुकिंगही केले आहे.
"चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने फिल्म मेकर्स,चित्रपट रसिक, अभ्यासक एकत्र येतात. ते विविध व्यासपीठांवर विचारांची आदानप्रदान करीत असतात. त्यातूनच बरेच चित्रपट दिग्दर्शक, समीक्षक तयार झाले आहेत. ऑनलाईन चित्रपट महोत्सवातून हे शक्य होणार नाही. त्यामुळे मी प्रत्यक्ष चित्रपट महोत्सवात उपस्थित राहण्यास प्राधान्य देईल."
- रेखा देशपांडे, ज्येष्ठ समिक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.