अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट OMG 2 काल (11 ऑगस्ट रोजी) सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र तो प्रदर्शित होताच काही हिंदू संघटनांनी विरोध सुरु केला. या चित्रपटाविरोधात राष्ट्रीय हिंदू परिषद भारतच्या कार्यकर्त्यांनी आग्रा येथे निदर्शने केली. यावेळी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. जो कोणी अक्षय कुमारला थप्पड मारेल त्याला दहा लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले.
राष्ट्रीय हिंदू परिषद भारतचे अध्यक्ष गोविंद पाराशर म्हणाले की, 'या चित्रपटात भोले बाबांचा ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला आहे, तो अत्यंत लज्जास्पद आहे. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये दाखवल्यास राष्ट्रीय हिंदू परिषद तीव्र निषेध तर करेलच, शिवाय सिनेमागृहांनाही आग लावण्यात येईल.'
गोविंद पराशर पुढे म्हणाले की, या चित्रपटामध्ये भगवान शिवाचा अपमान करण्यात आला आहे. पराशर म्हणाले की, सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु.
त्याचबरोबर, देशातील इतर शहरांमध्येही चित्रपटाविरोधातील नाराजी वाढत आहे. वृंदावनच्या साध्वी रिथंबरा, दुर्गा वाहिनीच्या संस्थापक, यांनी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर जोरदार टीका केली.
वात्सल्य ग्राम आश्रमातील एका भाषणात, साध्वी रिथंभरा म्हणाल्या की, “हिंदू धर्माची उदारता ही बॉलीवूडला पुन्हा पुन्हा असा उद्धटपणा करण्यास प्रवृत्त करते. ते हिंदू धर्म सोडून इतर कोणत्याही धर्मावर भाष्य करायला घाबरतात.''
याआधीही, रुपेरी पडद्यावर हिंदू देव-देवतांचा अपमान झाला आहे, हिंदूंच्या भावनेशी खेळू नका अशी तंबीही यावेळी रिथंबरा यांनी दिली. रिथंबरा यांनी हिंदूंना बॉलीवूडचा तीव्र निषेध करण्याचे आवाहन केले आहे, कारण "भगवान शिव आणि त्यांच्या अलौकिक रुपाची कोणीही निंदा करु नये".
दुसरीकडे, उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनीही मंदिराच्या आवारात चित्रित केलेली काही सीन्स ‘अश्लील’ असल्याचे सांगत ते काढून टाकण्याची मागणी केली आहे. चित्रपटाचे कथानक उज्जैनमध्ये राहणारा प्रखर शिवभक्त कांती शरण मुद्गल (पंकज त्रिपाठी) यांच्याभोवती विणलेले आहे.
दरम्यान, हा चित्रपट 2012 च्या रिलीज झालेल्या OMG चा सीक्वल आहे, ज्यात परेश रावल आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते, ज्यांनी त्यावेळी भगवान कृष्णाची भूमिका केली होती. सेन्सॉर बोर्डाने OMG 2 ला "A" प्रमाणपत्र दिले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.