Enforcement Directorate Summon Actor Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्रिची येथील एका दागिन्यांच्या समूहाविरुद्ध पॉन्झी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 100 कोटी रुपयांच्या कथित पॉन्झी स्कीम प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
अलीकडेच, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार, 20 नोव्हेंबर रोजी ईडीने त्रिची येथील पार्टनरशिप फर्म प्रणव ज्वेलर्सशी संबंधित मालमत्तांचा शोध घेतला होता. या शोधानंतर प्रकाश राज यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. या छाप्यात विविध आपत्तीजनक दस्ताऐवज, 23.70 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 11.60 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते.
प्रकाश राज यांना बोलावणे हा प्रणव ज्वेलर्सने सुरु केलेल्या कथित बनावट सोने गुंतवणूक योजनेच्या व्यापक तपासाचा भाग असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. वास्तविक, 58 वर्षीय राज या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांना पुढील आठवड्यात चेन्नईतील (Chennai) फेडरल एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कथित पॉन्झी योजना प्रणव ज्वेलर्सद्वारे चालवली जात असल्याचा आरोप आहे. कथित आर्थिक अनियमिततांमध्ये गुंतलेल्या इतरांविरुद्ध त्रिची येथील आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही योजना ईडीच्या निदर्शनास आली.
EOW च्या म्हणण्यानुसार, प्रणव ज्वेलर्सने आकर्षक परताव्याच्या आश्वासनाच्या सोने गुंतवणूक योजनेच्या बहाण्याने लोकांकडून 100 कोटी रुपये गोळा केले. तथापि, कंपनी आपल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली, त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) अडचणीत आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.