Anil Sharma on Oscar : अभिनेता सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट रिलीजच्या दिवसापासुन कमाईचे उच्चांक गाठत आहे. चित्रपटाने आतापर्यंत 450 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. सर्वत्र गदर 2 चर्चा असताना आता गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एक मोठा दावा केला आहे. गदर 2 च्या संभाव्य ऑस्कर वारीबद्दल अनिल शर्मा काय बोलले चला पाहुया.
सनी देओलचा गदर 2 हा सिनेमा रिलिज होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. गदर 2 हा 2023 चा आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट झाला आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर गदर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कमाईसोबतच प्रेक्षकांकडून गदर 2 ला प्रेक्षकांनी कौतुकाची थापही दिली आहे.
सध्या चित्रपटाची टिम टित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर 2 बद्दल काही दावे केले आहे.
गदरची ऑस्करवारी?
सनी देओल गदर 2 च्या प्रचंड यशाचा आनंद घेत आहे. आतापर्यंत, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुढील वर्षी हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले.
आपल्या दाव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, " हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात यावा यासाठी लोक मला वारंवार फोन करत आहेत. गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा त्यावेळी चालला नाही , त्यामुळे गदर 2 कसं काम करेल हे मला माहीत नाही, मात्र आम्ही ते करतोय ."
'गदर 2' ऑस्करला जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर दिग्दर्शक म्हणाले की, "गदर 2 सिनेमा ऑस्करसाठी गेला पाहिजे, चित्रपट त्यासाठी पात्र आहे. गदरही यासाठी पात्रच होता. गदर हा चित्रपट 1947 च्या फाळणीवर आधारित होता.
त्याची कथा अगदी वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली होती. ही एक नवीन आणि मूळ कथा होती आणि गदर 2 देखील नवीन आणि ओरिजनल कथा आहे."
पुरस्कारबद्दल बोलताना अनिल शर्मांनी सांगितले की, "असे वाटते की मी अजिबात काम केलेले नाही. मला माहित नाही की पुरस्कार मिळेल की नाही. कोणी आम्हाला पुरस्कार देत नाही. गदर 2 द्वारे आम्ही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
मात्र मी खोटं बोलणार नाही. आम्हाला पुरस्कारही हवे आहेत. मी ऐकलं आहे की या गोष्टींमध्ये बरच लॉबिंग आणि पीआर गुंतलेले असतात. मी राजकीय व्यक्ती नाही. मी कधीही पुरस्कारांसाठी लॉबिंग केलेले नाही.
त्यामुळे मला कोणताही पुरस्कार मिळणार नाही. त्यामुळे आता त्यांनी काही धक्कादायक खुलासा करत अनेक दावे केले आहेत."