

Tukaram Mundhe Action On Bollywood Celebrities: महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्रे हाती घेताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ बनवणारे आणि अवैध गुटखा माफियांविरुद्ध अत्यंत आक्रमक आणि कठोर पवित्रा घेतला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, आता केवळ गुटखा उत्पादक किंवा विक्रेतेच नाही, तर या घातक पदार्थांची जाहिरात करुन जनतेची दिशाभूल करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींवरही कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. मुंढेंच्या या इशाऱ्यामुळे बॉलिवूड आणि जाहिरात क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गुटखा माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांच्यावर थेट 'मकोका' सारखा अत्यंत कडक कायदा लागू करण्यात आला. या निर्णयामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, खरी खळबळ आता सरोगेट ॲडव्हर्टायझिंग करणाऱ्या कलाकारांमध्ये निर्माण झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी थेट इशारा दिला की, कायद्यासमोर कोणीही लहान किंवा मोठा नसतो. जर एखादा मोठा स्टार जनतेला भ्रमित करत असेल आणि ते उत्पादन नियमांनुसार नसेल, तर कोणत्याही भेदाभेदाशिवाय त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि अशा चेहऱ्यांना लवकरच कायदेशीर नोटिसाही पाठवल्या जातील.
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात धडक धाडसत्रांचा सपाटा सुरु झाला आहे. एफडीएच्या आकडेवारीनुसार, राज्यात बंदी असलेल्या गुटख्याविरुद्ध आतापर्यंत तब्बल 12.59 कोटी रुपयांचा बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला. याशिवाय राज्यभरात 439 एफआयआर नोंदवण्यात आल्या असून 598 आरोपींना तुरुंगात धाडण्यात आले. राज्यात दररोज सरासरी 20 हून अधिक ठिकाणी अचानक छापे मारले जात आहेत. अवघ्या दोन महिन्यांत 1500 हून अधिक यशस्वी कारवाया करण्यात आल्या. रोज येणाऱ्या 500 ते 1100 तक्रारींवर कागदी घोडे न नाचवता तातडीने प्रत्यक्ष कारवाई केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.