Sindhudurg Mining Projects: सिंधुदुर्गवर खाण प्रकल्पांचे सावट! पर्यावरणवाद्यांचा विरोध; 'जेएसडब्ल्यू' कंपनीला ड्रोन सर्वेक्षणास परवानगी

Sindhudurg Mining JSW drone survey permission: गोव्यात तीन मोठे खाणपट्टे लिलावात जिंकल्यानंतर जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीने आपली नजर शेजारील सिंधुदुर्गकडे वळवली आहे.
Sindhudurg Mining Projects
Sindhudurg Mining ProjectsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात तीन मोठे खाणपट्टे लिलावात जिंकल्यानंतर जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीने आपली नजर शेजारील सिंधुदुर्गकडे वळवली आहे. लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली वेतोबाची आरवली, कोट्यवधी रुपयांचा सुरंगीचा व्यवसाय करणारी सुगंधी आसोली, कांदाभजीसाठी प्रसिद्ध असलेले महत्त्वाचे जंक्शन मळेवाड. यासह आजगाव, धाकोरे, सोनसुरे, सखैलेखोल आणि बांध या बागायतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या निसर्गसुंदर गावांवर खाणीचे काळेकुट्ट ढग पुन्हा घोंगावू लागले आहेत.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीला लोहखनिज खाणी सुरु करण्याच्यासंदर्भात ड्रोनआधारित भू-चुंबकीय सर्वेक्षण करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मान्यता दिली आहे. एकीकडे पर्यटन विकासाचे ढोल वाजवणाऱ्या शासनाने निसर्गाचा विनाश करणाऱ्या या खाणप्रकल्पांना परवानग्या देणे, ही मोठी विसंगती आहे. यामुळे या सर्व गावांचे अस्तित्वच भविष्यात धोक्यात येणार आहे, अशी चिंता पर्यावरण क्षेत्रात काम करणारे ''घुंगुरकाठी'' स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी व्यक्त केली आहे.

या सातही गावांममध्ये काही अटींवर ड्रोनआधारित भू-चुंबकीय सर्वेक्षण करण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने १३ मे रोजी निर्गमित झाला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोरे, मळेवाड आणि वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, आसोली, सोनसुरे, सखैलेखोल आणि बांध या गावांमध्ये हे सर्वेक्षण ४ मे २०२६ ते ११ जून २०१६ या काळात पूर्ण करण्यास जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे सरकारला इथला निसर्ग, पर्यावरण राखून पर्यटन वाढवायचे आहे की या रमणीय आणि वेगवेगळ्या कारणांनी पर्यटनप्रिय असलेल्या भागात खाणींचे साम्राज्य उभारायचे आहे, याचे स्पष्टीकरण शासनाने करावे, अशी मागणी श्री. लळीत यांनी केली आहे.

Sindhudurg Mining Projects
Goa Drug Case: 61 व्या दिवशी आरोपपत्र संशयिताच्या पथ्यावर, ड्रग्स प्रकरणात साहील खानला 'डिफॉल्ट जामीन'

जिल्हा खनिकर्म अधिकारी, सिंधुदुर्ग यांचे ४ मे २०२६ रोजीचे पत्र आणि त्याच दिनांकाच्या जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड कंपनीच्या पत्राला अनुसरुन ही परवानगी काही अटींवर देण्यात असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

सर्वेक्षणादरम्यान फक्त ड्रोनचा वापर करण्यात यावा आणि स्‍थानिक नागरिक, शेती, पर्यावरण, वन्यजीव यांना कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

संबंधित ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी, ड्रोन वापराबाबतच्या कायद्याचे पालन करावे, प्रतिबंधित किंवा संवेदनशील क्षेत्रामध्ये सर्वेक्षण करताना संबंधित प्राधिकरणाची परवानगी घ्यावी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय राखावा, अशा अटी यासाठी घालण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ही परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल, असा इशाराही याच आदेशात देण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात खनिज चोरी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिकृत खनिज उत्खनन सध्या मर्यादित प्रमाणात सुरू असल्याने अनधिकृत खनिज चोरीचे पेव फुटले आहे. जिल्ह्यात सध्या साटेली परिसरातील अपवाद वगळता इतर अधिकृत खाणी बंद आहेत. तरीही रेडी बंदरातून बोटीमध्ये खनिज भरणा सुरूच आहे. जिल्ह्यात साटेली, कळणेसह तिरोडा परिसरात खनिज उत्खनन चालते.

यात सर्वाधिक प्रमाण कळणेचे आहे. यंदा मात्र साटेली परिसरात अधिकृत उत्खनन सुरू आहे. कळणेसह इतर खाणी बंद आहेत. असे असले तरी खनिज निर्यातीसाठीच्या बोटी रेडी बंदरात येतच आहेत. तेथे अधिकृतरित्या साटेली परिसरातील खनिज लोड केले जाते; मात्र दोडामार्ग तालुक्यात रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात खनिज चोरी चालते. जेसीबी, डंपर आदी मोठी यंत्रणा दिवसमावळतीला दाखल होते. रात्रभर खनिज ओरबाडून ते वेगवेगळ्या मार्गाने रेडीपर्यंत पोहोचवले जाते. यावर प्रशासनाचे कोणतेच लक्ष नसल्याचे चित्र आहे.

Sindhudurg Mining Projects
Goa Accident Death: कंटेनरच्या चाकाखाली संसाराचा चुराडा, बोरी येथील अपघातात महिलेचा मृत्यू; पती किरकोळ जखमी

पाणीप्रश्‍न गंभीर!

पाण्याचा गंभीर प्रश्नही भेडसावत आहे. अतिशय प्राचीन व प्रसिद्ध देवालये, संपन्न निसर्ग लाभलेल्या या आठही गावांमध्ये पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प आणण्याऐवजी खाणींचा विनाशक प्रकल्प शासन का आणत आहे, हे न सुटणारे कोडे आहे. ड्रोनआधारित भू-चुंबकीय सर्वेक्षण करण्यासाठी दिलेली ही परवानगी शासनाने त्वरित रद्द करावी, अशी विनंतीही लळीत यांनी शासनाला व पालकमंत्री नीतेश राणे यांना केली आहे.

नव्या भागावर नजर

दोडामार्ग तालुक्यात गेली दोन दशके खजिन उत्खनन क्षेत्र वाढवण्यासाठी मायनिंग लॉबीचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र अलीकडे यातील बराच परिसर इकोसेन्सिटीव्ह म्हणून केंद्राने जाहीर केला. त्यामुळे मायनिंग लॉबीने आपले लक्ष आता वेंगुर्ले तालुक्यातील आरवली, आसुर्ली आदी भागाकडे केंद्रीत केले आहे. तेथून रेडी बंदर जवळ आहे. हा भागही बागायतीने समृध्द असल्याने तेथे याला मोठा विरोध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com