

सावंतवाडी : ओंकार हत्तीचा माग काढण्यासाठी जंगलात गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गांधील माशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील जंगलात घडलेल्या या घटनेत दोन वन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार हत्तीचा माग काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी कोनशी येथील जंगल परिसरात गेले होते. याचदरम्यान ओंकार हत्तीचा पाय जमिनीतील गांधील माशांच्या बिळावर पडला. त्यामुळे हजारो गांधील माशांनी अचानक हल्ला केला. हत्तीच्या मागावर असलेले वन कर्मचारीही या माशांच्या तावडीत सापडले.
गांधील माशांचा अचानक हल्ला झाल्याने जंगलात एकच धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तेथून धाव घेत सुरक्षित ठिकाण गाठले. मात्र, या हल्ल्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गांधील माशांनी ओंकार हत्तीवरही हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या हा हत्ती कोनशी-असनिये दरम्यानच्या जंगल परिसरात असल्याची माहिती बांदा वनपाल श्री. खोराटे यांनी दिली आहे. वन विभागाचे कर्मचारी हत्तीचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, पुढील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.