Mohan Bhagwat On Cast: वर्ण आणि जाती (Cast System) या व्यवस्थांना आता विसरून गेले पाहिजे. आजही जर कुणी याबाबत विचारत असेल तर समाजातील विचार करणाऱ्या सर्वांनी सांगितले पाहिजे की, या जुन्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या विसरून जायला हवे, असे मत राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केले.
नागपुरात 'वज्रसुची टंक' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील आधीच्या पिढ्यांनी विविध ठिकाणी अनेक चुका करून ठेवल्या आहेत. त्या चुका मान्य करण्यात कसलीही अडचण असायला नको.
आपल्या पुर्वजांच्या चुकांमुळे आपल्याला कमीपणा वाटता कामा नये. कारण अशा चुका प्रत्येकाच्याच पुर्वजांनी केल्या आहेत. भेदभावास कारणीभूत असलेल्या सर्व गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत.
दरम्यान, विजयादशमीच्या दसऱ्याच्या कार्यक्रमात भागवत म्हणाले होते की, काँग्रेस रा. स्व. संघावर समाजात फुट पाडण्याचा आणि परस्परात भांडणे लावण्याचा आरोप करत आहे. अल्पसंख्यांकांमध्ये अफवा पसरवली जाते की, त्यांना आमच्यापासून आणि हिंदूंपासून धोका आहे.
भूतकाळात हे कधीही झालेले नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही. हा संघाचा किंवा हिंदूंचा स्वभाव नाही. आम्हाला अशा हिंदू समाजाची गरज आहे, जो कुणाविरूद्ध नाही. बंधुभाव, मिळून मिसळून राहणे आणि शांततेच्या बाजूने उभे राहण्याचा संघाचा संकल्प आहे. या वेळी भागवत यांनी देशाला एका व्यापक लोकसंख्या नियंत्रण धोरणाची गरज असल्याचेमत व्यक्त केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.