पेडणे : महाराष्ट्र व गोवा सरकारने अद्यापही समन्वय साधून सीमा खुली करण्याबाबत निर्णय न घेतल्याने उद्या, एक दिवसाची मुदत भाजपच्या वतीने देण्यात आली आहे. भाजपच्या भूमिकेला बांदा बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या सीमेलगतच्या गोव्यातील ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिला आहे. दोन्ही शासनांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या शनिवार सकाळी 10 वाजता बांदा-पत्रादेवी सीमेवर वाहतूक रोखत जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बांदा (महाराष्ट्र) सरपंच अक्रम खान यांनी दिली आहे. जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दोन्ही प्रशासनांना निर्णय घेणे गरजेचे आहे. (Open Maharashtra Goa border immediately)
याबाबत तोडगा काढावा; अन्यथा गोव्यात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या सर्व गाड्या रोखण्यात येतील, असे निवेदन भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना चार दिवसांपूर्वी दिले होते. त्यावेळी याबाबत गोवा राज्य प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, याबाबत अद्यापपर्यंत सकारात्मक तोडगा न निघाल्याने सरपंच खान यांनी दोन्ही प्रशासनांना उद्यापर्यंत मुदत दिली आहे; अन्यथा भव्य जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे खान यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील 20 हजार युवक-युवती रोजगारासाठी दररोज ये-जा करतात. त्यांचे कुटुंब या नोकरीवर अवलंबून आहे. मात्र, कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्र-गोवा सीमेवर नोकरदार तरुणांची अडवणूक करण्यात येत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गोव्यातील लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा
सीमेवरील पेडणे तालुक्यातील जनता ही बांदा बाजारपेठेवर अवलंबून आहे. मात्र, सीमेवर अडवणूक होत असल्याने तेथील लोकांना बांदा बाजारपेठेत येणे देखील मुश्कील आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाला पेडणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी व जनतेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे बांदा सरपंच अक्रम खान यांनी सांगितले. शनिवारी सकाळी छेडण्यात येणाऱ्या जनआंदोलनात गोव्यातील सरपंच, लोकप्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.