Jitendra Awhad Arrested: विवियाना मॉलमध्ये एका थिएटरमध्ये 'हर हर महादेव' या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, असे समजते. यावेळी काही प्रेक्षकांना मारहाणीचा प्रकारही घडला होता. या मारहाण झालेल्या प्रेक्षकांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला गेला होता, असा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
मला पोलिसांनी बोलावून घेतले होते. मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीजीपी तिथे आले. ते हतबल दिसत होते. आणि मग मला कळले की मला अटक करण्यात आली आहे. पोलिस यात हतबल आहेत, असे आव्हाडांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांना जे करायचे आहे ते करू दे. मी जामिन घेणार नाही, असा पवित्रा आमदार आव्हाडांनी घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासासाठी आंदोलन केल्याबद्दल अटक होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आमदार आव्हाडांना अटक केल्यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. अटकेची बातमी समजताच आव्हाडांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी जमा होत आहे. जोपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना मुक्त केले जात नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचा पवित्रा या समर्थकांनी घेतला आहे. आव्हाडांची थिएटरमधील शो बंद पाडण्याची कृती योग्यच होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे आमदार अतुल भातळखर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी मात्र आव्हाडांना केलेली अटक योग्य असल्याचे म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.