Monsoon Impact: पावसाने उडवली दाणादाण, जनजीवन विस्कळीत
रत्नागिरी, नागपूर, औरंगाबाद: राज्याच्या (Maharashtra) अनेक भागांत पावसाने (Rain) चांगलाच जोर धरला असून मेघगर्जना आणि विजांसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आले आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. तर मराठवाडा, विदर्भातही गेल्या चार दिवसांपासून पाऊस परसत आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.
रायगड, रत्नागिरीत
रत्नागिरीमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन चिपळूण येथे एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसामुळे रस्ते वाहून गेले आहे. रायगडमध्येही जोरदार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. बोरली मांडला परिसरातील पूल वाहून गेला असून साळाव तपासणी नाक्याजवळ दरड कोसळली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडला.
मराठवाड्यात खरीपाचे नुकसान
मराठवाड्यात बीड, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना जिल्ह्यांमध्ये पावसाचा दिवसभर चांगला जोर होता. काही जिल्ह्यांमध्ये गेले चार दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होऊन रब्बीची आशा वाढली असली तरी बहुतांश गावातील खरीप पिकांसह भाजीवर्गीय पिके पाण्यात गेली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उमरगा-डिग्गी मार्गावरील बेडगा गावाजवळील फरशी पूल वाहून गेल्याने येथील वाहतूकही बंद आहे. मांजरा, दुधना, तेरणा, बाणगंगा, मन्याड या नद्यांना पूर आल्याने त्यांच्यावर बांधलेले काही पूल वाहून गेले आहेत.
विदर्भात जोर
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीमध्ये गेले 24 तासात पावसाचा जोर वाढला आहे. कारंजा तालुक्यात सर्वाधिक 138 मिमी पाऊस पडला असून पूर्णा नदीला पूर आला असल्याने अकोला-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वऱ्हाडातील काटेपूर्णा, खडकपूर्णा या प्रकल्पांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.