Bhaskar Jadhav On Fadanvis: शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळुणातील घरावर मंगळवारी रात्री हल्ला झाला होता. त्यांची सुरक्षाव्यवस्था मागे घेतल्यानंतर दोन तासातच हा हल्ला झाला होता. यावरून आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून आरोप होऊ लागले आहेत. घरावर हल्ल्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनीच दिले असावेत, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझ्या मुंबईतील आणि गावातील घरी सुरक्षा दिली होती. मात्र, काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात केली गेली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असे काही करतील असे मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावेत आणि माझे सुरक्षा कवच काढले असावे.”
आमदार जाधव म्हणाले, ईडी, सीबीआय, पोलिसांचे छापे, एसीबीचे छापे, पक्ष फोडून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून तुम्ही विरोधी पक्षातील बोलणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असाल, तर निश्चितपणे मला मारा. मात्र, मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही.
ते म्हणाले, नारायण राणेंच्या मोठ्या कार्ट्याने माझ्या दिवंगत वडिलांबाबत, माझ्या पत्नी आणि मुलांबाबत अपशब्द वापरले. आज ते आम्हाला सुसंस्कृत राजकारण शिकवत आहेत. राज्याच्या सुसंस्कृत राजकीय परिस्थितीला कोणी तिलांजली दिली असेल, तर या तीन राणेंनी दिली आहे.
आदित्य ठाकरेंचीही टीका
राजकीय जीवनात आरोप प्रत्त्यारोप, टीका टीप्पणी होत असतात. पण घरावर आणि व्यक्तीशः हल्ले करणे योग्य नाही. पोलिस संरक्षण काढून घेणे म्हणजे कुठेतरी यंत्रणेचा गैरफायदा आणि दुरुपयोग करणे असा त्याचा अर्थ आहे. हा भ्याड हल्ला आहे. यामागे राजकीय पाठबळ आहे का? यामागे यंत्रणा आहे का? याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.