NCP Maharashtra: ‘राष्ट्रवादी’त उभी फूट; शरद पवारांना धक्का देत दादांची युतीसोबत चूल

फडणवीसांसह अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री
Ajit Pawar
Ajit PawarDainik Gomantak
Published on
Updated on

NCP Maharashtra शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत अजित पवार यांनी बंड केले आणि राजकीय भूकंप घडवून आणला.

विश्वासू नेते आणि सुमारे चाळीस आमदारांची फळी घेऊन अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करत राज्यातील ‘पॉवर प्ले’मध्ये आपणच ‘दादा’ असल्याचे दाखवत त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला.

सकाळी अवघ्या दोन तासांच्या घडामोडीत राजभवनावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर, इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा या बंडाला पाठिंबा नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेसारखाच वाद उफाळून येण्याचे संकेत आहेत. अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, अमोल कोल्हे यांची साथ लाभल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सत्तास्थापनेच्या 2019 मधील नाट्यमय घडामोडींच्या आठवणी आजच्या घडामोडींमुळे ताज्या झाल्या. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार अजित पवारांसोबत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाला आहे, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शपथविधी समारंभानंतर स्पष्ट केले. तसेच सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रपणे लढविण्याची घोषणाही अजित पवार यांनी या शपथविधी नंतर केली. अजित पवार यांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते आज सकाळी जमा होत असल्याने राजकीय भूकंपाची कुणकूण लागली होती.

मात्र, अजित पवार थेट बंड करून थेट सत्तेत सहभागी होतील असा अंदाज कुणालाही नव्हता. सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन अजित पवार नेत्यांसह थेट राजभवनाकडे रवाना झाल्यानंतर त्यांच्या बंडखोरीची बातमी बाहेर आली.

तिकडे राजभवनामध्ये शपथविधीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. सरकारच्या राजशिष्टाचार विभागालाही याची काहीही माहिती नसल्याचे चित्र होते. कारण शपथविधीच्या प्रक्रियेत राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव सहभागी नव्हते. राजभवनाच्या वरिष्ठ अधिकारी श्वेता सिंघल यांनीच शपथविधीच्या शिष्टाचाराचे सोपस्कार पार पाडले.

राज्यपाल रमेश बैस यांनी या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला अजित पवार यांच्या कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार, पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते.

प्रतोदपद जितेंद्र आव्हाडांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोदपद अनिल पाटील यांच्याकडे आहे. मात्र, ते सत्तेत सहभागी झाल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रतोदपदावर जितेंद्र आव्हाड यांनी नियुक्ती केली आहे.

मी काढलेला व्हिपच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना लागू होईल, असे आव्हाड यांनीही स्पष्ट केले आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून हे पद रिक्त झाले आहे. या पदावर आव्हाड यांचीच नियुक्ती करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शपथविधीच्या कार्यक्रमानंतर दोन तासांत या घडामोडी घडल्या आहेत.

9 नेत्यांनी घेतली शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्याला ज्यावेळी महत्त्व दिले जात नाही, तेव्हा अशा घटना घडतात. म्हणून अजित पवार आमच्यासोबत आले असून त्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा होईल. राज्य सरकारला ‘ट्रिपल इंजिन’चे बळ मिळाले आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जे काही घडले ते महाराष्ट्राच्या हिताचे असून, त्यातून विकासाचा नवा अध्याय लिहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मी आणि नवे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राला पुढे नेऊ.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विकासासाठीच सत्तेत : अजित

‘देशात 1994 नंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी या एका सक्षम नेत्याच्या नेतृत्वाखाली एकहाती सरकार आले आहे. मोदींचे नेतृत्व खंबीर असल्यानेच परदेशातही त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या विकासाच्या कामावर जनता समाधानी आहे.

त्यामुळे अशा नेत्याच्या पाठीशी राहून महाराष्ट्राचा विकास करावा आणि जनतेला समाधानी करावे, यासाठी आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी होत आहोत,’ असे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते बोलत होते.

Ajit Pawar
Goa Excise Department: पेडणे घोटाळ्यानंतर अबकारी खाते अ‍ॅक्शनमोडवर; 'एवढ्या' मद्यालयांचे परवाने केले रद्द

जनतेच्या न्यायालयात जाणार

‘‘जे कोणी सोडून गेले, त्यांची मला चिंता नाही. माझा जनतेवर आणि युवकांवर विश्‍वास आहे,’’ असे सांगून उद्या कऱ्हाडला जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्यात जाऊन जास्तीत जास्त लोकांची भेट घेणार आहे, तेवढे एकच काम मी करणार आहे आणि हीच माझी पुढची रणनीती असणार आहे,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com